*इंडिया… की भारत?*
डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732
गेल्या दोन-चार आठवड्यापासून हा प्रश्न सर्वत्र विचारला जातो आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने याचे उत्तर देत आहे, आणि आपल्या उत्तराचे समर्थन करत आहे. अचानकपणे, “इंडिया” हे नाव परके वाटू लागले आहे, त्यास आक्षेप घेतला जातो आहे. असं कसं झालं, का झालं? “इंडिया” नावात काय गैर आहे? अचानकच “भारत” नावाबद्दल अप्रूप का वाटू लागले आहे. सगळीकडेच “इंडिया” च्या ऐवजी “भारत” म्हणावे, असा आग्रह धरला जातो आहे. अगदी, आंतरराष्ट्रीय बैठकांमध्येही “भारत”च म्हणावे, अशा प्रकारच्या हालचाली सुरू झाली आहे, आणि तसे बदलही करण्यात आलेले आहे. “भारत” नावाला माझा अजिबात आक्षेप नाही, विरोध तर नाहीच नाही. शेवटी, पुरातन काळापासूनच, म्हणजे महाभारताच्या आधीच्या काळातील शकुंतला-दुष्यंत पुत्र “भरत” राजाच्या नावाने आपला देश आणि उपखंड ओळखला जावा, असे मलाही वाटते. ज्या भरत राजाचे या भूमीवर अधिराज्य होते, त्याच्या नावाने आपली ओळख असावी, ही भूषणावह बाब आहे. त्याच कुळात नंतर कौरव आणि पांडव जन्मले, त्यांच्यात जे घडले, त्यावर महा”भारत” घडले. अर्थ एकच, “भारत” नाव आपल्या देशासाठी अगदी समर्पक आहे, आणि तसा इतिहास ही आहे. मग, प्रश्न आलाच कुठे? आणि “इंडिया” नाव आले कुठून?
असे म्हणतात की, ब्रिटिशांनी या देशाचे “इंडिया” असे नामकरण केले आहे. असेल ही, आणि आहे देखील. इंग्रजीत आपल्या देशाला “इंडिया” असे संबोधतात. तसे आपल्या संविधानात ही म्हंटलेलं आहे. “द रिपब्लिक ऑफ इंडिया” असे या देशाला संविधानाने दिलेले टायटल आहे. तिथून पुढे संविधान सुरू होते. इतकंच काय तर, “द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया” असे भारतीय संविधानाला इंग्रजीतून म्हंटले जाते. याचा अर्थ असा की, “इंडिया” हे नाव तत्कालीन सर्वच राजकीय पक्ष, नेते, राष्ट्रपती, पंतप्रधान, सरकारातील मंत्री, प्रशासन आणि सर्वसामान्य जनता, यांना मान्य होते. त्याला फारसा कुणी विरोध केला नाही, आक्षेपही नव्हता. ज्याला जसे वाटले त्याने तसे संबोधले. अगदी आत्ता आत्तापर्यंत कुणालाही “इंडिया” नावात गैर वाटत नव्हते. मग आत्ता असे काय झाले, की यावर इतका खल केला जातो आहे. खरंच सर्वसामान्य जनतेला असे वाटते आहे का? की उगाच कुणीतरी टिमकी वाजवली, आणि संधीसाधूंनी त्याचा फायदा घेण्यासाठी हा विषय उचलून धरला आहे? की फक्त ०.००१ टक्के लोकांना असे वाटते, परंतु मीडियात असे दर्शवले जाते की ही एक जनभावना असून, आता “इंडिया”चे रूपांतर “भारत” व्हावे.
काही महिन्यांपूर्वी, भारतीय राजकारणात झालेल्या घडामोडींमध्ये एक महत्वाची घटना म्हणजे, सर्व प्रमुख विरोधीपक्ष एकत्र येऊन त्यांनी “इंडिया” नावाची आघाडी स्थापन केली होती. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली एकूण २६ विरोधी पक्षांनी मिळून “इंडियन नॅशनल डेवलपमेंटल इंक्लुसिव अलायन्स” या नावाने आघाडी बनवली आहे, ज्याचा शॉर्ट फॉर्म “इंडिया” असा होतो. सुरवातीला याची खिल्ली उडवली गेली, असे इंडिया नाव ठेवल्याने काही होत नसते, नावात काय आहे… वगैरे वगैरे. परंतु, जस जसे “इंडिया” ची लोकप्रियता आणि या नावाचा वापर वाढला तसतसे सत्ताधाऱ्यांना या नावाची धास्ती वाटू लागली. मग आता यावर उपाय काय करायचा, यावर खल करण्यात आले. तर, “इंडिया” नावाच्या ऐवजी “भारत” नावाला प्राधान्य द्यायचे. भारतीयांच्या अस्मितेला हात घालून, “इंडिया” नाव इंग्रजांजी दिलेले आहे. आपण आता इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झालेलो आहोत, तर आता त्या काळ्या काळाची आठवणच नको, म्हणून आजपासून “इंडिया” न म्हणता “भारत” म्हणावे. असे म्हणण्यासाठी काही सेलिब्रिटी, काही मिडीयावाले, काही सोशल मिडीयावाले, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांची फौज बनवून हा बदल घडवून आणण्याचा केविलवाणा प्रयत्न होतांना दिसतो आहे.
राग आणि द्वेष नेमका कशाचा आहे, कुणाचा आहे? हे समजण्याइतपत जनता भोळी नाहीए. इंग्रजांचा नाही आणि इंग्रजीचा नाही, हेही स्पष्ट आहे. खरं तर विरोधी पक्षांच्या आघाडीचे आहे, हे अगदी कुणीही सांगेल. परंतु, याचे दूरगामी पडसादांचा विचार केला आहे का? आत्तापर्यन्त “इंडिया” नाव असलेल्या कितीतरी योजना आणि चळवळी सुरू केल्या आहेत. मेक इन इंडिया, स्किल इंडिया, फिट इंडिया, स्टॅण्ड अप इंडिया, स्टार्ट अप इंडिया, क्लीन इंडिया, शायनिंग इंडिया अशा घोषणा देत कितीतरी योजना आणि अभियान गेल्या ९ वर्षांत सुरू करण्यात आलेले आहे. तेव्हा “इंडिया” म्हंटल्याने छाती दोन इंचांनी अधिक फुगली जायची. आता का हवा गेली आहे. सध्या दिल्लीत होऊ घातलेल्या “जी२०” सारख्या जागतिक परिषदेत “इंडिया” च्या ठिकाणी देशाचे नाव “भारत” असे लिहून जणू आपण आपले हसू करून घेतलेले आहे. प्रेसिडेंट ऑफ भारत, यात प्रेसिडेंट आणि ऑफ हे दोन्ही शब्द इंग्लिश आहेत. प्राईम, मिनिस्टर आणि ऑफ हे तीनही शब्द इंग्लिशच की? न्यू दिल्लीतला न्यू पण इंग्लिशच… अरे काय हे, किती ना!
इंग्लिश आणि इंग्रजांबद्दल इतकाच संताप असेल तर, इंग्रजांनी दिलेली प्रत्येक गोष्ट या देशातून हद्दपार करा, फेकून द्या, नष्ट करा. इंग्रजांनी या देशात रेल्वे आणली, ती उचकटून फेकून द्या, आपली सायकल आणि बैलगाडीच बरी. पोस्ट आणले तेही बंद करा, कबुतर पाळा. सीएसटी स्टेशन, चर्चगेट स्टेशन, गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हायकोर्ट, इंडिया गेट, राष्ट्रपती भवन, सुप्रीम कोर्ट, संसद भवन या सर्व इमारती जमीनदोस्त करा. जे हजारो पुलं आणि शेकडो धरणे बांधली तेही फोडून टाका. हिम्मत असेल तर, त्यांची इंग्रजी भाषाच भारतातून हद्दपार करा ना…! रशिया, चीन, जर्मनी, फ्रांस, जपान यांनी जशी आपल्या राष्ट्रभाषेची अस्मिता जपलेली आहे, तशी आपणही हिंदी / संस्कृत / उर्दू यापैकी एखादी भाषा राष्ट्रभाषा म्हणून जाहीर करून त्याची अस्मिता जतन करावी. सर्व व्यवहारातून, दस्तऐवजातून, ऑनलाइन आणि ऑफलाईन संचाराच्या भाषेतून इंग्रजी वगळून टाका. जेव्हा इंग्रजी भाषाच राहणार नाही, तेव्हा “इंडिया” म्हणण्याचा सवालच कुठे उरतो… नाही का? खरंच असे काही करणार असाल तर, मी खात्रीने सांगतो की, यात कुणाचीही हरकत असणार नाही. खऱ्या अर्थाने “भारतीय” अस्मिता जपली जाईल.
मी या मताचा आहे की, “भारत” देशाची खासियत यातच आहे. गेल्या पाच हजार वर्षांत भारताने परकीय भूमीवर हल्ला करून कुठलाही प्रदेश काबीज केलेला नाही. परंतु, हजारो वर्षांपासून या भूमीवर झालेले आक्रमणं यशस्वीपणे रोखले आहेत, परतवून लावलेले आहे. याउपर, ज्या ज्या परकीय शक्तींनी आक्रमण करून इथे राज्य केले आहे, त्यांचा स्वीकार करून, नंतर त्या शक्तींना उलथवून लावलेले आहे. त्या शक्ती इथून गेल्यानंतरही त्यांच्यातील काही दुवे आणि त्यांच्या संस्कृच्या पाऊलखुणा इथे आजही जतन केलेल्या आहेत. गुप्ता आणि मौर्य काळापर्यंत तर आपल्याच राज्यकर्त्यांनी राज्य केले आहे. अकराव्या आणि बाराव्या शतकात मुघल आले, त्यांनी जवळपास पाच शतके राज्य केले. नंतर इंग्रज आले, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, आफ्रिकन सिद्धी आले. त्यांनाही इथे राज्य केले. आज भारतात त्या सर्व परकीय राज्यकर्त्यांच्या आठवणी म्हणून किल्ले, राजवाडे, चर्च, मशिदी, थडगे, मिनारे, समाधीस्थळे, बागबगीचे, भाषा, संस्कृती, सणवार, रीतिरिवाज, पेहराव, शहरांचे नावे आणि धर्म यासारख्या गोष्टींना भारतीयांनी स्वीकारून त्या जतन केल्या आहे. हीच तर आपल्या देशाची खरी महानता आहे. त्यामुळेच इतक्या सगळ्या वैविधता असतांनाही इतक्या वर्षांपासून हा देश अखंडपणे उभा आहे.
आता या अशा वेळी, आपल्याला इंग्रजी भाषा नाकारून चालणार नाही. ती आपल्या नसानसात भिनलेली आहे. आपले सर्वच व्यवहार इंग्रजीत होतात. एज्युकेशन आणि कम्युनिकेशनचे माध्यमच इंग्रजी झाले आहे. नवी पिढी तर याशी पुरती एकरूप झालेली आहे. ते इंग्रशी शिवाय जीवनाची कल्पनाच करू शकत नाही. अहो, हीच एक भाषा आहे, जी उत्तर आणि दक्षिण भारताला एकमेकांशी जोडून ठेवते आहे. उत्तरवाल्यांना दक्षिणी भाषा येत नाही, आणि दक्षिणवाले उत्तरेच्या भाषेचा स्वीकार करत नाही. आज भारतीयांच्या राष्ट्रभावना उत्तेजित करण्यासाठी “इंडिया” नाव जास्त जोश भरते. क्रिकेट स्टेडियम मध्ये “इंडिया… इंडिया” चे नारे लावल्याने एक वेगळीच ऊर्जा संचारते. “चक दे… इंडिया” म्हंटले तरी शहारे येतात. संघभावना निर्माण होण्यासाठी “टीम इंडिया” असे म्हणतात. आज आपले पंतप्रधान जेव्हा विदेशात जातात, तिथेही “इंडिया.. इंडिया” चाच नारा होतो. नुकतेच चांद्रयान-३ चंद्रावर पोहोचले, त्यावरही “इंडिया”च लिहिलेले आहे. जगभरात आपल्या देशाला “इंडिया” नावानेच संबोधले जाते आणि आता आपली तशी ओळख झालेली आहे, हे नाकारून चालणार नाही. इंडियन आर्मी, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फोर्स, एअर इंडिया, इंडियन रेल्वे, इंडियन करन्सी, इंडियन नॅशनल किव्हा इंडियन सिटीझन असेच म्हंटले जाते. शहाण्यांनी ते बदलण्याचा प्रयत्न करू नये. कारण आज प्रत्येकात एक “इंडियन” संचारलेला आहे. तो आता बाहेर निघणे नाही.
शेवटी एक गोष्ट सांगतो. तुम्ही एका काचेच्या बाटलीत लाल मुंग्या टाका, व त्यात वरून काळ्या मुंग्या सोडा. बाटलीचे झाकण बंद करा आणि बघा काय होतेय. तुम्हाला दिसेल की काहीच होत नाहीए. सगळ्या मुंग्या आपापल्या परीने फिरत असतात. त्यांची धावपळ सुरू असते, नेहमी प्रमाणे च. आता ती बाटली उचलून जोरजोरात हलवा, आणि पुन्हा खाली ठेवा. आता बघा काय होतंय. मुंग्याची वर्तणूक बदलते. त्या एकमेकांना मारतात, चावतात, एकमेकांशी लढतात. कारण, लाल मुंग्यांना वाटते की काळ्यामुंग्यांमुळे आपल्याला धोका आहे, आणि काळयांना वाटतं की लाल मुंग्यांमुळे धोका आहे. असा समज (गैरसमज) झाल्याने त्या मुंग्या एकमेकांच्या दुष्मन बनतात, किंबहुना त्यांना तसे वाटते. नीट विचार केला तर लाल आणि काळ्या मुंग्या एकमेकांच्या वैरी नव्हत्या, त्यात मुंग्यांचा काही दोषही नव्हता, आणि जे घडले त्यासाठी त्या कारणीभुतही नव्हत्या. ज्यामुळे वाद झाले, भांडण झाले, लढाई झाली, यासाठी बाटलीबाहेरील शक्ती कारणीभूत होती. अनंत काळापासून घडत आलेले युद्ध, लढाया, यादवी, भांडणं, मारामारी, वाद, विविध गुन्हे हे बाहेरील शक्ती (व्यक्ती) मुळे घडत असते. सर्वसामान्य जनतेला त्यातील काहीच घेणेदेणे नसते, परंतु ज्यांचे देणे-घेणे असते, तेच सर्वकाही घडवून आणतात. शहाणे असाल तर हे ओळखा. या निरर्थक वादात न पडता, आपापल्या कामात लक्ष द्या, विधायक कामे करा. तरुणाईला द्वेष आणि तिरस्काराचे संस्कार घालू नका. “इंडिया” म्हंटले काय आणि “भारत” म्हंटले काय, आपल्या जीवनात काही फरक पडणार आहे का…?
*डॉ. संजय धुर्जड.*
सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक.
9822457732