क्रिकेटविश्वात भारताचा दबदबा रविवारी (दि. 8) रंगपंचमीला उठून दिसला. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव करून तिसर्यांदा टी-20 विश्वचषकावर नाव कोरले, त्यावेळी जवळपास 90 हजार प्रेक्षक उपस्थित होते. कोट्यवधी भारतीयांनी हा विजयाचा क्षण आपल्या दूरचित्रवाणीच नव्हे, तर स्मार्टफोन व इतर इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मदतीने अनुभवला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहासाची पुनरावृत्ती केली. टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारताने न्यूझीलंडचा 96 धावांनी फडशा पाडताना सलग दुसर्यांदा टी-20 विश्वचषक उंचावला. मुख्य म्हणजे, भारत हा सलग दोन टी-20 विश्वचषक जिंकणारा, तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. मोदी स्टेडियमवर 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकातील अंतिम फेरीत भारताला पराभव पत्करावा लागला होता. भारताने न्यूझीलंडला आजवर टी-20 विश्वचषकात एकदाही नमवलेले नव्हते. मात्र, यावेळी तीसुद्धा मालिका भारताने खंडित केली. भारताचा हा पाचवा विश्वचषक आहे. भारताने दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक (1983, 2011), तर तीन वेळा टी-20 विश्वचषक (2007, 2024, 2026) आपल्या नावे केला आहे. या स्पर्धेत साखळी फेरीसाठी प्रत्येकी पाच संघांचा एक असे चार गट बनवण्यात आले होते. मग सुपर-8 फेरीत दोन गट तयार करण्यात आले. पहिल्या गटातून दक्षिण आफ्रिका व भारत यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला, तर दुसर्या गटातून इंग्लंड व न्यूझीलंड यांनी आगेकूच केली होती. बुधवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. मग भारताने इंग्लंडला नमवून एकंदर चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली होती. भारताने साखळी फेरीत सलग चार सामने जिंकताना अमेरिका, पाकिस्तान, नेदरलँड्स व नामिबिया या संघांना नमवले. सुपर-8 फेरीत भारताला पहिल्याच लढतीत आफ्रिकेकडून दारुण पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यातून सावरत भारताने झिम्बाब्वे व वेस्ट इंडिज यांना पराभूत केले. नंतर इंग्लंडला नमवून भारताने चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. भारताने 2007 व 2024 मध्ये टी-20 विश्वचषक उंचावलेला होता. 2014 मध्ये त्यांना अंतिम
फेरीत पराभव पत्करावा लागला होता. मायदेशात विश्वचषक जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला, तसेच एकंदर तीन वेळा टी-20 विश्वचषक जिंकणारा भारत पहिला संघ ठरला. संजू सॅमसनने टी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम स्वत:च्या नावे केला. जसप्रीत बुमराने या विश्वचषकात सर्वाधिक 14 बळी मिळवले. स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणार्यांच्या यादीत त्याने वरुण चक्रवर्तीसह संयुक्तपणे अग्रस्थान काबीज केले. भारताने एकंदर पाचव्यांदा विश्वचषक जिंकला. यात दोन एकदिवसीय व तीन टी-20 विश्वचषकाचा समावेश आहे. जगभरात फुटबॉल या खेळाला सर्वाधिक लोकप्रियता लाभलेली असली, तरी आशिया खंडात क्रिकेट हाच सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता हळूहळू युरोप व अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. पाच दिवसांच्या कसोटी सामना हेच क्रिकेटचे मूळ रूप असले, तरी मर्यादित 50 षटकांच्या एकदिवसीय सामन्यात जागतिक स्पर्धा आयोजित करण्यात येत होती. पाच दिवसांचा कसोटी सामना कंटाळवाणा ठरत असल्याने एकदिवसीय झटपट सामन्यांची लोकप्रियता वाढत गेली. क्रिकेट सामन्याचा निकाल
फुटबॉल सामन्यासारखा दीड-दोन तासात लागावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाऊ लागली. भारताचा विक्रमवीर सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय सामन्याचे स्वरूप दोन भागांत म्हणजे 25-25 षटकांचे असावे, अशी कल्पना मांडली होती. त्यानंतर भारताचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी इंडियन क्रिकेट लीगचा प्रयोग करून कमी षटकांच्या सामन्यांची स्पर्धा भरवली होती. तिला भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मान्यता दिली नाही, तर जलद निकाल लागेल अशी 20 मर्यादित षटकांची इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) स्पर्धा भारतात भरविण्यास सुरुवात केली. चौकार, षटकारांचा पाऊस पाडणार्या या अतिजलद क्रिकेटला अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता लाभली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला या स्पर्धेची दखल घ्यावी लागली आणि टी-20 क्रिकेट स्वरूपात विश्व स्पर्धा भरविण्यासाठी मान्यता दिली. त्यानुसार पहिली टी-20 विश्वचषक स्पर्धा 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत भरविण्यात आली. पहिल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत आशिया खंडातील पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत व पाकिस्तान अंतिम
फेरीत आमनेसामने आले. ही स्पर्धा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने जिंकली होती. तेव्हापासून टी-20 स्पर्धेला लोकप्रियता लाभत केली. दर दोन वर्षांनी आयोजित केली जाणारी ही दुसरी स्पर्धा 2019 मध्ये इंग्लंडमध्ये भरविण्यात आली, तेव्हा अंतिम फेरीत आशिया खंडातील पाकिस्तान व श्रीलंका हे दोन देश आमनेसामने आले. पाकिस्तानने ही स्पर्धा जिंकली, तरी भारताने आयपीएलच्या माध्यमातून टी-20 क्रिकेटचा थरार जगभर पोहोचविला. त्यामुळे या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची लोकप्रियता वाढत गेली. आशियातील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशमध्ये टी-20 क्रिकेट हा सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. या खेळाची लोकप्रियता श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, अफगाणिस्तान, आखातातील संयुक्त अरब अमिरात, ओमान अशा अनेक देशांतही वाढलेली असताना दहाव्या टी-20 विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भारत आणि श्रीलंका यांना संयुक्तपणे मिळाले. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत असल्याने भारतात बांगलादेशी लोकांविरुद्ध संताप व्यक्त होत आहे. भारतात आपल्या खेळाडूंच्या जीवितास धोका पोहोचू शकतो, हे लक्षात घेऊन बांगलादेश सरकारने त्यांच्या संघाविरुद्धचे सामने श्रीलंकेत घेण्याची मागणी केली होती. ती नाकारण्यात आल्याने बांगलादेशने स्पर्धेतून अंग काढून घेतले. बांगलादेशऐवजी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला. दुसरीकडे, पाकिस्तानने बांगलादेशच्या मागणीला पाठिंबा दिला होता. पाकिस्ताननेही भारताविरुद्धच्या श्रीलंकेतील सामन्यावर बहिष्कार टाकला होता. नंतर पाकिस्तानने माघार घतली. भारत व पाकिस्तान एकमेकांच्या देशात जाऊन क्रिकेट खेळत नाहीत. त्रयस्थ देशात मोठ्या स्पर्धांत हे देश आमनेसामने येतात. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला या स्पर्धेत सहभाग घेता यावा म्हणून ही स्पर्धा संयुक्तपणे भरवण्यात आली. नाहीतर ही स्पर्धा फक्त भारताच्या मैदानांवरच खेळवली जाणार होती. पाकिस्तानची सोय व्हावी म्हणून श्रीलंकेला सहयजमान करण्यात आले होते. असे असतानासुद्धा बांगलादेशला पाठिंबा देताना पाकिस्तानने क्रिकेटच्या मैदानात राजकारणाचा आखाडा भरवला. सध्या भारत व बांगलादेश यांच्यातील संबंध चांगले नाहीत, या पार्श्वभूमीवर आयपीएलमधील लिलावात एका बांगलादेशी मुश्तफिजूर रहमान या वेगवान गोलंदाजाला आयपीएलमध्ये खेळण्यास विरोध झाला होता. त्याला शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सने घेतले होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला विरोध दर्शवला होता. या खेळाडूला त्या लिलावातून आणि आयपीएलमधून बाहेर काढण्यात आले होते. त्यानंतर किंवा प्रत्युत्तर म्हणून बांगलादेशने आम्ही भारतात टी-20 विश्वचषक स्पर्धा खेळायला जाणार नाही, अशी घोषणा केली. सुरक्षेच्या कारणावरून आम्ही भारताचा दौरा करणार नाही, आमचे सामने इतरत्र नियोजित करावेत. अशी बांगलादेशची मागणी होती. पण ऐनवेळी ते शक्य नसल्याने आयसीसीने बांगलादेशला या स्पर्धेतूनच बाजूला काढले आणि त्यांच्या जागी दुसर्या देशाला संधी दिली.खरेतर हा विषय येथेच संपत असताना पाकिस्तानने बांगलादेशला पाठिंबा देत आम्हीसुद्धा भारताविरुद्धचा फेब्रुवारीचा सामना खेळणार नाही, अशी घोषणा केली होती. सामना न खेळल्यास होणार्या गंभीर परिणामाची दखल घेऊन पाकिस्तानने माघार घेतली. भारत आणि श्रीलंकेत कोणताही व्यत्यय न येता स्पर्धा पार पडली. ऑस्ट्रेलियासारखा दमदार संघ साखळीतच बाद झाला होता. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, भारत आणि इंग्लंडने धडक मारली होती. उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती, तर दक्षिण आफ्रिकेला नमवून न्यूझीलंड अंतिम फेरीत पोहोचला होता. टी-20 प्रकाराचे विश्वविजेतेपद पटकावताना नव्या खेळाडूंच्या पिढीने भारताचे क्रिकेटविश्वात भारताचा डंका वाजवला.
India’s dominance in the cricket world
पुरवठा विभागाच्या छाप्यात 26 लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक/सिडको ः प्रतिनिधी देशात गॅसची टंचाई असताना नाशिक…
मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी लगबग नाशिक ः प्रतिनिधी अवघ्या एक दिवसावर आलेल्या मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या सणासाठी…
आज जागतिक पुनर्वापर दिन : पर्यावरण रक्षणाची गुरुकिल्ली नाशिक : देवयानी सोनार वाढती लोकसंख्या तितक्याच…
स्थायी सदस्य गामणेंचा गंभीर आरोप, मनपा आयुक्तांचे चौकशीचे आदेश नाशिक : प्रतिनिधी महापालिका हद्दीत पुन्हा…
धरण समूहात 55 टक्के साठा नाशिक : प्रतिनिधी मार्च महिन्याच्या मध्याला उन्हाचा झळा अधिक तीव्र…
पिढ्यान्पिढ्या ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली बारामतीची सुप्रसिद्ध सुवर्णपेढी ‘चंदुकाका सराफ’ यांनी यंदाच्या लग्नसराईसाठी ‘विवाह तस्मै’ हे…