अकरा महिन्यांत पाच हजार 650 कोटींची परकीय कमाई, अन्न धोरणात बदल
लासलगाव : वार्ताहर
जगात डाळींचा सर्वांत मोठा उत्पादक व निर्यातदार म्हणून ओळखल्या जाणार्या भारताने डाळींच्या निर्यात क्षेत्रात मोठी भरारी घेतली आहे. एप्रिल 2024 ते
फेब्रुवारी 2025 या अकरा महिन्यांत भारताने 6 लाख 17 हजार 970 मेट्रिक टन डाळींची निर्यात केली. देशाला पाच हजार 650 कोटी रुपयांचे परकीय चलन मिळालेे. ही आकडेवारी केवळ उत्पादनक्षमता नव्हे, तर भारताच्या अन्नधोरणात बदलाचेही सूचक ठरत आहे.
भारत हा डाळींचा जागतिक पातळीवर सर्वांत मोठा उत्पादक देश असून, 2022 मध्ये देशाने 25 दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक डाळींचं उत्पादन केले होते. हे जागतिक उत्पादनाच्या जवळपास 25 टक्के आहे. याचबरोबर भारत हा डाळींचा सर्वार्ंत मोठा ग्राहकही आहे. देशातील आहारसंस्कृती, शाकाहारी लोकसंख्या आणि आरोग्य जागरूकता यामुळे डाळींची मागणी देशांतर्गत मोठ्या प्रमाणावर असते. डाळ उत्पादनात राज्यनिहाय मध्य प्रदेशचा 25 टक्के वाटा असून, महाराष्ट्राचा 17 टक्के वाटा आहे. या उत्पादनाचा काही भाग देशांतर्गत वापरासाठी राखून ठेवला जातो, तर उरलेला मोठा हिस्सा परदेशी बाजारपेठेत निर्यात केला जातो.
निर्यात क्षेत्रातील अडथळे
डाळींच्या निर्यातीतील वाढ लक्षवेधी असली तरी काही आव्हाने अजूनही कायम आहेत. त्यात हवामानातील अनिश्चितता, अनावृष्टी, अतिवृष्टी, रोगराईमुळे उत्पादनात घट, साठवणुकीच्या मर्यादा, ग्रामीण भागात अद्याप पुरेशा साठवण सुविधा उपलब्ध नाहीत. लॉजिस्टिक अडथळे, वाहतूक खर्च, बंदरांवरील विलंब यामुळे निर्यात खर्च वाढतो. नियामक आव्हानं, विविध देशांचे आयात नियम, कीटकनाशकांचे प्रमाण व गुणवत्ता मानकांमुळे अडथळे निर्माण होतात.
पोषण, पर्यावरणस्नेही पर्याय
मसूर, हरभरा, वाटाणे, उडीद, मूग आणि सोयाबीन यांसारख्या डाळींमध्ये प्रथिने, फायबर, लोह, जस्त आणि विविध जीवनसत्त्वे आढळतात. जागतिक आरोग्य ट्रेंडनुसार, वनस्पती आधारित प्रथिनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. ग्लूटेन-मुक्त, लो-कार्ब आणि पर्यावरणपूरक आहार निवडणार्यांसाठी डाळी आदर्श पर्याय मानल्या जात आहेत.
निर्यातवाढीची कारणे
* वनस्पती आधारित प्रथिनांबद्दल जागरूकता
* शाश्वत शेती व पर्यावरणपूरक आहाराची निवड
* वाढती शाकाहारी लोकसंख्या
* भारतीय डाळींची गुणवत्ता, स्पर्धात्मक किमती
डाळी निर्यात आलेख (मेट्रिक टन)
2020-21 2 लाख 76 हजार 863
2021-22 3 लाख 88 हजार 403
2022-23 7 लाख 62 हजार 852
2023-24 5 लाख 94 हजार 164
डाळी निर्यात आलेख (कोटीमध्ये)
2020-21 1977 कोटी
2021-22 2680 कोटी
2022-23 5312 कोटी
2023-24 5333 कोटी
सरकारची भूमिका अन् धोरणं
भारत सरकार आणि इतर यंत्रणांमार्फत डाळींच्या निर्यातीला चालना देण्यासाठी : सुबक पॅकेजिंग आणि ब्रँडिंगला प्रोत्साहन, नवीन बाजारपेठांमध्ये प्रवेशासाठी व्यापार प्रतिनिधी मंडळ, शेतकर्यांना गुणवत्तापूर्ण बियाणे, साठवण सुविधा आणि उत्पादन तंत्रज्ञान पुरवणे.