जिल्ह्यात पीककर्ज वसुलीत तालुका अव्वल असतानाही दुजाभाव
चांदवड ः वार्ताहर
जिल्ह्यात पीककर्ज वसुलीत अव्वल असूनही जिल्हा बँकेकडून चांदवड तालुक्यातील शेतकर्यांना कर्जवाटपात अन्याय होत असल्याचा आरोप होत आहे. पावसाळा तोंडावर असताना भांडवलासाठी शेतकर्यांना कर्ज मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. 24) सकाळी चांदवड येथील जिल्हा बँकेच्या मुख्य शाखेसमोर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
जिल्हा बँकेने नियमित कर्जदार सभासदांना पीककर्ज वाटपात जाचक अटी घातल्या आहेत. ज्या येथील सभासद आणि सोसायटी पदाधिकार्यांना मान्य नाहीत. विशेष म्हणजे, इतर तालुक्यांमध्ये याच अटी शिथिल करून कर्ज वाटप सुरू आहे. त्यामुळे चांदवड तालुक्यावर जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. यासंदर्भात चार दिवसांपूर्वी वडाळीभोई आणि धोडांबे परिसरातील सोसायटी पदाधिकार्यांनी जिल्हा बँकेला निवेदन दिले होते. त्यानंतर सोमवारी (दि. 21) धोडंबे येथे कर्ज विभागाचे व्यवस्थापक, वरिष्ठ मुख्याधिकारी आणि चांदवड विभागीय अधिकार्यांसोबत बैठक झाली. मात्र, या बैठकीनंतर तीन दिवस उलटूनही बँकेकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. यामुळे तालुक्यातील कर्जधारक आणि संचालक मंडळ अधिक संतप्त झाले आहे.
चांदवड वगळता इतर काही तालुक्यांमध्ये वजनदार नेते आणि मंत्री असल्याने तेथे मोठी थकबाकी आणि कमी वसुली असूनही कर्ज वाटप होत असल्याचा आरोप होत आहे. याउलट, चांदवड तालुक्याची रोख वसुली राज्यात प्रथम क्रमांकाची आहे आणि थकबाकीचे प्रमाणही कमी आहे. असे असतानाही कर्जवाटपात दुजाभाव का केला जात आहे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
दुष्काळी परिस्थितीतही संचालक मंडळ आणि सचिवांनी शेतकर्यांना कर्ज भरण्यास प्रवृत्त केले आणि लोकांनी उधारी करून कर्जाची परतफेड केली. आता त्यांना तातडीने कर्ज मिळणे अपेक्षित असताना, बँकेच्या भूमिकेमुळे शेतकरी भविष्यात कर्ज भरण्यास कचरतील, अशी चिंता व्यक्त होत आहे. सन 2024-25 च्या हंगामात चांदवड तालुक्यात केवळ 27 कोटी 32 लाख रुपयांचे कर्ज वाटप झाले आहे. तालुक्यातील 33 विकास सोसायट्यांची 100 टक्के वसुली आहे. तालुक्यातील सर्व संस्थांचे भागभांडवल एकत्रित केल्यास, जवळपास 45 कोटी रुपये जिल्हा बँकेकडे जमा आहेत. असे असताना, केवळ 20 ते 25 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले जात
आहे. याचा अर्थ, जमा ठेवींच्या 50 टक्क्यांपेक्षाही कमी कर्ज वाटप होत आहे. जनतेच्याच ठेवी घ्यायच्या आणि त्यांना गरजेच्या वेळी पुरेसे कर्जही द्यायचे नाही, यामुळे या ठेवींचा तालुक्यातील जनतेला काय फायदा, असा प्रश्न विचारला जात आहे.
चांदवड तालुक्यातील संस्थांची एकत्रित आर्थिक स्थिती
(जिल्हा बँकेकडे असलेली रक्कम)
चालू खाते 6 कोटी 85 लाख रुपये
बचत खाते 3 कोटी 44 लाख रुपये
बँक शेअर्स 12 कोटी 39 लाख रुपये
राखीव निधी 9 कोटी 47 लाख रुपये
मुदत ठेवी 12 कोटी 57 लाख रुपये
एकूण रक्कम 44 कोटी 74 लाख रुपये
व्याजाच्या परताव्याची माहिती गुलदस्त्यात
शेतकर्यांनी वेळेत पीककर्ज भरल्यास केंद्र आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी तीन टक्के, असा एकूण सहा टक्के व्याज परतावा मिळतो. मात्र, मागील दोन वर्षांपासून या परताव्याची माहिती सोसायट्यांना मिळत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांना व्याज परतावा मिळाला की नाही, हे समजू शकत नाही.