पंचवटी, म्हसरूळ हद्दीत 10 घरफोड्या करणारा सराईत जेरबंद

सीसीटीव्ही फुटेजचा झाला फायदा; 13 लाखांचा ऐवज हस्तगत

पंचवटी : प्रतिनिधी
गणेशोत्सव बंदोबस्ताचा ताण असतानाही पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने शहरातील पंचवटी व म्हसरूळ परिसरात घरफोड्या करणारा सराईत गुन्हेगार सीसीटीव्ही फुटेजचा अभ्यास करून शिताफीने जेरबंद केला आहे. फारूक रज्जाक काकर (वय 48, रा. लोहारी बुद्रुक, ता. पाचोरा, जि. जळगाव) असे त्या सराईताचे नाव असून, त्याच्याकडून 11 तोळे सोने व एक किलो 52 ग्रॅम चांदी असा 13 लाख 6 हजार 754 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून, घरफोडीचे 10 गुन्हे उघडकीस आले असल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (परिमंडळ 1) मोनिका राऊत यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त (परिमंडळ एक) मोनिका राऊत, सहायक आयुक्त (पंचवटी विभाग) संगीता निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील, पवार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ, सहायक उपनिरीक्षक संपत जाधव, हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, महेश नांदुर्डीकर, जयवंत लोणारे, युवराज गायकवाड, अंकुश काळे, वैभव परदेशी, सचिन बाहिकर, योगेश वायकंडे, विनोद चितळकर, नितीन पवार, तनुजा शिंदे यांनी ही कामगिरी बजावली आहे.
याबाबतची माहिती अशी की, पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत 23 ऑगस्ट रोजी कल्पेश पार्क बी, फ्लॅट नं. 8, राधानगर ड्रिम कॅसलच्या मागे, मखमलाबाद रोड येथे घरफोडी झाली होती. या गुन्ह्याच्या तपासाबाबत व वाढत चाललेल्या घरफोड्यांबाबत वरिष्ठांनी मार्गदर्शक सूचना पथकाला केल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचवटी पोलीस स्टेशनकडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या सर्व घरफोड्यांचे सीसीटीव्ही
फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपीचे गुन्हा करण्याची मोड्स ऑपरेंडी व घरफोडी करण्याची वेळ यांचा सखोल व बुद्धी कौशल्याचा वापर करून सदर आरोपीला पकडण्यासाठी वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी सूचना दिल्या.
त्याप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक निरीक्षक सतीश शिरसाठ यांनी दोन पथके तयार करून पंचवटी हद्दीत ज्या परिसरात वारंवार घरफोड्या झाल्या आहेत, अशा ठिकाणी आरोपी रात्री येण्याच्या मार्गावर मखमलाबाद रोड, ड्रिम कॅसल, गणेशनगर परिसरात एक टीम व दुसरी टीम औदुंबरनगर, अमृतधाम परिसर या भागात रात्री 11 ते पहाटे 4 वाजेदरम्यान 3 ते 4 दिवस सापळा लावून बसले. यादरम्यान 26 ऑगस्टला रात्री 11.30 वाजता हवालदार कैलास शिंदे, अमोल काळे, सचिन बाहिकर, वैभव परदेशी, अंकुश काळे, नितीन पवार या पथकाने सीसीटीव्ही
फुटेजमधील वर्णनाच्या संशयितास शिताफीने ताब्यात घेतले. सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाव फारूक रज्जाक काकर असे सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ घरफोडीचे साहित्य व मुद्देमाल मिळून आला. त्यावरून त्यास अटक करण्यात आली. पोलीस कोठडीदरम्यान अटक आरोपी फारूक रज्जाक काकर यास अधिक विचारपूस केली असता त्याने पंचवटी व म्हसरूळ पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण 10 गुन्हे केल्याची कबुली दिली. तसेच मुद्देमालही काढून दिला. त्याच्यावर यापूर्वी अंबड पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. पुढील तपास हवालदार अमोल काळे
करीत आहेत.

10 घरफोड्या करणार्‍या संशयितावर अंबड पोलीस ठाण्यात 2 आणि पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.संशयित 48 वर्षांचा असून, तो जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लोहारी बुद्रुक येथील असून, तो रात्री ट्रेनने नाशिकमध्ये येऊन घरफोड्या करत होता. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सीएसआर फंडातून मिळवलेल्या सीसीटीव्हीचा चांगला फायदा होऊ लागला आहे.
– मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त, परिमंडळ (एक)

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *