सिडको : विशेष प्रतिनिधी
दरोड्याच्या तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून, त्यांच्याकडून तलवार, कोयता, मिरची पूड आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार तसेच पोलीस उपआयुक्त परिमंडळ-2 मोनिका राऊत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली.
दि. 7 जून 2025 रोजी पहाटेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याचे रात्रगस्त पथक जेलरोड, ब्रह्मगिरी परिसरात गस्त घालत असताना नर्मदा दर्शन सोसायटीच्या मागील जागेत काही संशयित अंधारात लपून बसलेले आढळले. पोलीस पथकाने संशयितांकडे जाताच ते पळून जाऊ लागले. पथकाने पाठलाग करून दीपक भाऊसाहेब जाधव उर्फ डेमू (27), वैभव बाबाजी पाटेकर उर्फ बुग्या (22), साहिल राजू मांगकाली उर्फ पोश्या (25), अनिकेत नितीन गिते उर्फ अंड्या (20) या चार संशयित आरोपींना अटक केली.
अंधाराचा फायदा घेत देवीदास मधुकर तोरणे हा फरार झाला आहे. तपासादरम्यान आरोपींच्या ताब्यातून लोखंडी तलवार, लोखंडी कोयता, नायलॉन दोरी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पूड हे साहित्य जप्त करण्यात आले. हे साहित्य पाहता संशयित दरोड्याच्या तयारीत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलीस अंमलदार सूरज रामनाथ गवळी यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अटक आरोपींपैकी साहिल मांगकाली व अनिकेत गिते यांना पूर्वीच दोन वर्षांसाठी नाशिक शहर व ग्रामीण हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. ही कारवाई उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोनि संजीव फुलपगारे, पोउनि प्रभाकर सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस पथकात पोहवा विनोद लखन, पोशि सूरज गवळी, सौरभ लोंढे, पंकज कर्पे, संदेश रगतवान आदींनी
केली आहे.