भाजप आक्रमक; कोंडवाडा उभारण्याची नगरपंचायतीकडे मागणी
कळवण : प्रतिनिधी
कळवण शहरात मोकाट जनावरांमुळे होणारे अपघात आणि त्यामुळे निष्पाप नागरिकांचा बळी जात असल्याच्या गंभीर समस्येवर भारतीय जनता पार्टीने आवाज उठवला जात आहे. याबाबत तहसीलदार रोहिदास वारुळे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवला यांना निवेदन देण्यात आले. शहरात तातडीने कोंडवाडा उभारून मोकाट जनावरांच्या त्रासातून नागरिकांची सुटका करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, कळवणमध्ये मोकाट जनावरे, विशेषतः गायी आणि म्हशी रस्त्यांवर फिरत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी (दि. 23) जुना ओतूर रोड, शिवाजीनगरात मोकाट जनावरांच्या हल्ल्यात भालचंद्र मालपुरे यांचा मृत्यू झाला, तर आबा मोरे जखमी झाले आहेत. यापूर्वीही गणेशनगरमध्ये पावसाळी अंधारात रस्त्यावरील जनावरे न दिसल्याने प्रवासी रिक्षाचा अपघात झाला होता.
शहरातील चौक, मुख्य रस्ते आणि आठवडी बाजारातही मोकाट जनावरांमुळे अनेक वयोवृद्ध, महिला आणि वाहनधारकांना गंभीर दुखापती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर समस्येकडे नगरपंचायत प्रशासन आणि संबंधित अधिकार्यांचे दुर्लक्ष असल्याचा आरोप भाजप आणि जागरूक नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे जनतेत तीव्र असंतोष पसरला असून, ‘याला जबाबदार कोण?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. निवेदनावर भाजप कळवणचे दीपक खैरनार, सुधाकर पगार, डॉ. अनिल महाजन, विकास देशमुख, गोविंद कोठावदे, नंदकुमार खैरनार, निंबा पगार, अशोक बोरसे, हेमंत रावले, संदीप अमृतकार, आशुतोष आहेर, दीपक वेढणे, चेतन निकम यांच्यासह कळवण शहरातील अनेक जागरूक नागरिकांच्या स्वाक्षर्या आहेत.
भाजपने केलेल्या प्रमुख मागण्या
कळवण शहरात मोकाट जनावरांना पकडून ठेवण्यासाठी आणि त्यांच्या योग्य देखभालीसाठी तातडीने कोंडवाड्याची उभारणी करावी. या समस्येकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि निष्काळजीपणा दाखवल्याबद्दल संबंधित प्रशासकीय अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी. हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले भालचंद्र मालपुरे व जखमी झालेले आबा मोरे यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी. सार्वजनिक ठिकाणी मोकाट फिरणार्या मोकाट जनावरांच्या मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. जनावरांच्या मालकांना जनावरांची योग्य काळजी घेण्याबाबत आणि त्यांना मोकळे न सोडण्याबाबत जनजागृती मोहीम राबवावी.
मोकाट जनावरे पकडून ते बेज येथील गोशाळेत पाठवले आहेत. आजूबाजूच्या गोशाळांशी संपर्क करून उर्वरित मोकाट जनावरे पकडून पाठवले जातील. ज्या गायी मालकीच्या आहेत, त्यांना पोलिस प्रशासनाच्या मदतीने गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. मागे दोन वेळा नगरपंचायतीने जनावरे पकडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही नागरिकांनी अडचण निर्माण केली होती. आता कोणी अडचण निर्माण केल्यास कारवाई केली जाईल.
– नागेश येवले, मुख्याधिकारी, नगरपंचायत, कळवण