गोदापात्राजवळ स्मार्ट सिटीने लावलेल्या फरशांच्या कामाची चौकशी करा

कॉँग्रेस सेवादलाची मनपा आयुक्तांकडे मागणी

नाशिक : प्रतिनिधी
गोदावरी नदीपात्राजवळ स्मार्ट सिटीने 16 कोटी 39 लाख रुपये खर्च करून लावलेल्या फरशांच्या अपूर्ण कामाची चौकशी करावी, अशी मागणी करणारे निवेदन काँग्रेस सेवादलातर्फे मनपा आयुक्त मनीषा खत्री यांना देण्यात आले.
नाशिक शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून अनेक कामे हाती घेण्यात आली होती. त्याअंतर्गत गोदावरी नदीकिनार्‍यावर बाजूच्या रस्त्याला स्मार्ट सिटीअंतर्गत दगडी फरशा लावण्याचे काम करण्यात आले. या कामाला सुमारे 16 कोटी 39 लाख रुपये खर्च करण्यात आला. चार महिन्यांपूर्वी होळी सणानिमित्त नदीकिनारी बसवण्यात आलेल्या दगडी फरशांवर होलिकादहन करण्यात आले. त्यामुळे फरशांना मोठे खड्डे पडले. यातून फरशा कमकुवत व निकृष्ट दर्जाच्या असल्याचे उघड झाले आहे.
दगडी फरशा बसवण्याचे काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्ष अपूर्ण स्थितीतच स्मार्ट सिटीने काम सोडून दिले आहे. गौरी पटांगण येथे अर्धवट स्थितीत फरशी बसवण्याचे काम केल्याने अनेक वेळा तिथे अपघाताचे प्रसंग निर्माण होतात. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अमृतस्नानाची मिरवणूक याच गौरी पटांगणातून जाते. याच पार्श्वभूमीवर या अर्धवट स्थितीत लावलेल्या फरशांमुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता लक्षात घेता ते काम त्वरित पूर्ण करावे. या निकृष्ट दर्जाच्या दगडी फरशांवर खरंच 16 कोटी 39 लाख रुपये एवढा खर्च झाला आहे का? याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष डॉ. वसंत ठाकूर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *