शिधापत्रिकांची होणार तपासणी
सिन्नर प्रतिनिधी
तालुक्यात तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत बोगस व अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम हाती घेण्यात आली असून या महिनाभरात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार सुरेंद्र देशमुख यांनी दिली.
शहरासह तालुक्यातील सर्व अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजना, केशरी (एनपीएच) व शुभ्र शिधापत्रिका धारकांनी शिधापत्रिका तपासणी फॉर्म भरुन हमीपत्र, वास्तव्याचा पुरावा व आवश्यक कागदपत्र स्वस्तधान्य दुकानात जमा करणे अनिवार्य आहे. शिधापत्रिका तपासणी फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारकांनी ते ज्या भागात वास्तव्यास असल्याचा कोणताही एक पुरावा देणे आवश्यक आहे. यात भाडेपावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दलचा पुरावा, एलपीजी जोडणी क्रमांक बाबत पावती, बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन अथवा मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स, ओळखपत्र (कार्यालयीन/इतर), मतदार ओळखपत्र, आधार कार्ड यांचा समावेश असून यापैकी कोणताही एक पुरावा जोडणे आवश्यक आहे. दिलेला वास्तव्याचा पुरावा हा एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपेक्षा जुना नसावा. तसेच हमीपत्र भरताना कुटुंबामधील सर्व सदस्यांचे मिळून एकूण वार्षिक उत्पन्न नमूद करावे. हमीपत्र भरताना सर्व रकाने पूर्ण भरावे. फॉर्म मध्ये परिपूर्ण माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे जोडून ते फॉर्म संबधित रास्तभाव दुकानदार,अधिकृत शिधावाटप दुकानदार यांच्याकडे जमा करून त्यांची पोहोच घ्यावी.
संबंधित गावाचे ग्राम महसूल अधिकारी यांचेमार्फत सर्व शिधापत्रिका तपासणी फॉर्मची तपासणी होणार असून आवश्यकता असल्यास ग्राम महसूल अधिकारी यांना गृहभेटी करण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. शासन नियमानुसार ज्या शिधापत्रिका अन्नसुरक्षा योजेनेमधून अपात्र आढळून येतील त्या शिधापत्रिका रद्द करून त्यांच्या उत्पन्नानुसार त्यांना अन्य अनुज्ञेय शिधापत्रिका देण्याची कार्यवाही पुरवठा विभागामार्फत करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी तपासणी फॉर्मसह हमीपत्र व आवश्यक कागदपत्रे आपल्या अधिकृत स्वस्तधान्य दुकानात एप्रिल-2025 या महिन्यात जमा करण्याचे आवाहन तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांनी केले आहे.
क्यूआर कोडवरुन फॉर्म
सिन्नर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार्या अपात्र शिधापत्रिका शोध मोहिमेकरिता शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिका फॉर्म व हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील क्युआर कोड उपलब्ध करुन देण्यात आला असून हा क्युआर कोड स्कॅन करुन शिधापत्रिका फॉर्म व हमीपत्र डाऊनलोड करुन भरावयाचा आहे.