मार्च अखेर काम पूर्ण करण्याचे आदेश
नाशिक : प्रतिनिधी
महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी ( दि. 24 ) नाशिक पूर्व, पंचवटी, नाशिकरोड आणि नवीन नाशिक या चार विभागातील स्मशानभूमींची पाहणी केली. या ठिकाणची दुरुस्तीची कामे 31 मार्च अखेर पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले.
अमरधाममध्ये सुशोभिकरण, उद्यानाचे काम करणे तसेच काही ठिकाणी बेड्स वाढविण्याची सुचना केली आहे. सीएसआर अंतर्गत कोणाला देणगी द्यायची असल्यास ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देण्याचीही सुचना आयुक्तांनी केली. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम (एन-कॅप) अंतर्गत मिळालेल्या निधीतून ही सर्व कामे होणार आहेत.
सर्वप्रथम आयुक्तांनी पूर्व विभागातील अमरधामची पाहणी केली. तेथील पारंपरिक, गॅस, विद्युत या तिन्ही पद्धतींची पाहणी करुन दुरुस्तीच्या काही सुचना केल्या. त्यानंतर पंचवटीतील अमरधाम मध्ये नव्याने सुरु होणा-या विद्युत दाहिनीची पाहणी केली. तसेच गोसावी, लिंगायत समाजाच्या दफनभूमिचीही पाहणी करुन दुरुस्तीची सुचना केली. त्यानंतर नाशिक रोड येथील दसक स्मशानभूमिची पाहणी केली. पारंपरिक आणि नवीन विद्युतदाहीनीच्या कामाचा आढावा घेतला. नवीन नाशिक विभागातील उंटवाडी स्मशानभूमिचीही पाहणी केली. बेड्सची संख्या वाढवण्याबरोबरच टाईल्स, पिलर्सची त्वरीत दुरुस्ती करण्याची सुचना केली. कोणत्याही अमरधाममध्ये प्रवेशद्वार तसेच आतील परीसराचे उद्यानासह सुशोभिकरण करुन वातावरण चांगले ठेवावे, अशी सुचना आयुक्तांनी यावेळी केली.
या पाहणी दौ-यात आयुक्तांबरोबर शहर अभियंता शिवकुमार वंजारी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड, बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता जितेंद्र पाटोळे, उपअभियंता प्रकाश निकम उपस्थित होते. आयुक्तांनी सोमवारीही पंचवटी विभागात मनपातर्फे सुरु असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली होती. हिरावाडी येथील नाट्यगृह, आडगाव येथील कबड्डी स्टेडीयम, स्मार्ट सिटीमार्फत सुरु असलेली मनपाच्या भांडारातील पाण्याची टाकी, पंडीत पलुस्कर सांस्कृतिक भवन या कामांची पाहणी करुन दिलेल्या मुदतीत आणि गुणवत्तापूर्ण काम करण्याची सुचना केली होती.