नाशिक ः देवयानी सोनार
संकटात आठवतो तो देव. आयुष्य जगतांना येणार्या अडचणी दूर व्हाव्या ,सुसह्य व्हाव्या, मार्ग निघावा यासाठी समाजमन भक्तीमार्गाचा,श्रद्धा, आस्थेचा आसरा शोधत असते. मालेगावला पार पडलेल्या शिवपुराण कथेनंतर जिल्ह्यातील शिवालयांमध्ये गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. एरव्ही दर सोमवारीच शिवालयांमध्ये जाणारे भाविक आता नित्य सकाळ, सायंकाळ जात असल्याने शिवालये गजबजून गेली आहेत.
सिहोरचे प्रदिप मिश्रा यांनी भगवान महादेवाची भक्ती,पूजा,आरती जीवनातील विविध समस्यांवर क शा प्रकारे मात करू शकतात, मार्ग कसे काढता येतो याबाबत मालेगाव येथील शिवपुराण कथेमध्ये मार्गदर्शन केले. मालेगावला झालेल्या या शिवपुराण कथेला उत्तर महाराष्ट्रातील भाविक-भक्तांनी गर्दी केल्याने कधीकाळी दंगल, कोरोनामुळे बदनाम झालेले मालेगाव शहर भक्तीमार्गामुळे संपूर्ण राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
हेही वाचा: माझा ‘बाप्पा’ मीच साकारणार!
या शिवपुराण कथेमुळे मालेगावला तर मिनी कुंभमेळ्याचीच अनुभूती आली होती. या शिवपुराण कथेचा समारोप झाला असला तरी आता टीव्हीवर ही शिवपुराण कथा ऐकण्याचा आनंद भाविक घेत आहेत. या कथेचा परिणाम म्हणून शिवालयांमध्ये सद्या महिलांचा मोठा राबता वाढला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यासह शहर आणि उपनगरातील शिवमंदिरांमध्ये महिला पुरूष आणि लहान मुलांचाही पूजनासाठी सहभाग वाढला आहे. पंडीत प्रदीप मिश्रांच्या प्रवचनात वारंवार एक लोटा जल सारे समस्यां का हल असा उल्लेख केला आहे.त्यामुळे भाविकांनी दर्शन आणि अभिषेकासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे.
भजन कीर्तन अध्यात्माद्वारे आत्मिक समाधान शोधण्याचे काम केले जाते. जनजागृती प्रबोधन मार्गदर्शन यातून भाविकांच्या अंतरीचा ठाव घेता येतो. त्यामुळे भाविकही अशा कार्यक्रमांना गर्दी करतात. कोरोना संकटामध्ये अनेकांनी साखळी पारायण,साखळी मंत्र जपणे आदी आपआपल्या रुढी परंपरेप्रमाणे संकटातून मुक्ती वा अध्यात्मीक मार्गातून मनशांती मिळविण्याचे प्रयत्न केले होते.
त्यामुळे देवाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे असो वा संकटकाळात मानसिक शांती,अडचणीतून बाहेर पडण्यासाठीची आराधना असो एक ठराविक देवाचे भजन पूजनाद्वारे अध्यात्मिक मार्ग शांतता मिळविली जाते.
नर्सरीत बेलाच्या रोपांना मागणी
नर्सरीमध्ये बेलाच्या रोपांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. फुलझाडे, शोभीवंत वृक्षांच्या रोपांबरोबरच आता बेलाच्या रोपालाही मोठी मागणी वाढली असल्याचे चित्र नर्सरींमध्ये पाहावयास मिळत आहे.