नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात कार्यक्रम जाहीर होणार?
नाशिक : प्रतिनिधी
महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून, अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनाकडे लक्ष लागले आहे. जानेवारी महिनाअखेर निवडणुका घेण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने प्रक्रिया गतिमान केली आहे. दिवाळी होताच प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनाचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
महापालिकेची अंतिम प्रभागरचना झाल्यानंतर येत्या काही दिवसांत प्रभागनिहाय मतदारयादी विभाजनाचा कार्यक्रम आयोगाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. 31 प्रभागांत सर्वसाधारणपणे 40 ते 45 हजार मतदार याप्रमाणे 13 लाख 60 हजार मतदारांचे विभाजन होईल.
दिवाळीनंतर प्रभागनिहाय विविध प्रवर्गांसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने आरक्षणाकडे अनेकांचे लक्ष लागून आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रभागनिहाय यादीचा कर्यक्रम जाहीर होऊ शकतो. विधानसभा निवडणूक 2024 साठी निश्चित केलेली मतदारयादी अंतिम करण्यात आली आहे. 1 जुलैपर्यंतच्या अद्ययावत याद्यांचे प्रभागनिहाय विभाजन केले जाणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी 2017च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागांची प्रभागरचना केली आहे.
चार सदस्यीय 29, तर तीन सदस्यीय दोन प्रभाग आहेत. गेल्याच आठवड्यामध्ये नाशिक महापालिकेची प्रभागरचना अंतिम झाली आहे. इच्छुक उमेदवारांना प्रभागाच्या सीमा माहिती झाल्यामुळे प्रचाराला वेग आला आहे.
आता प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने विधानसभा निवडणुकीच्या मतदारयादीचे प्रभागनिहाय विभाजन कधी होते, याकडे लक्ष लागले आहे. चालू महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने सद्यःस्थितीत 45 हजारांपर्यंत मतदारसंख्या एका प्रभागासाठी निश्चित होऊ शकते. मतदारसंख्या वाढल्यामुळे इच्छुकांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे. दरम्यान, दिवाळीनिमित्त प्रत्येकापर्यंत पोहोचण्याची इच्छुकांना संधी आहे. महापालिकेने निवडणुकीसाठी 25 कोटींच्या निधीची तरतूद केली असून, आठ ते दहा हजार कर्मचार्यांची आवश्यकता निवडणुकीत
लागणार आहे.
तीन महिन्यांत निवडणूक घेण्याचे आव्हान
महापालिका निवडणूक 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. दरम्यान, महापालिकेच्या निवडणुकीसाठी तीन महिन्यांचाच कालावधी शिल्लक असल्याने आयोगाकडून तयारी कशी होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.