सिन्नरला मालवाहू टॅम्पोसह एक लाख 22 हजारांचा मुद्देमाल जप्त
सिन्नर : प्रतिनिधी
वीज वितरण कंपनीचे काम सुरू असताना घोडेवाडी ते पास्ते रस्त्यावरून चोरीला गेलेले साहित्य व संशयितास सिन्नर पोलिसांनी गजाआड केले. संशयितांकडून पोलिसांनी एक लाख 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज मल्हारी भगत (वय27, रा. पास्ते, ता. सिन्नर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत घोडेवाडी ते पास्ते या रोडवर वीज वितरण कंपनीचे 14 ट्रान्स्फॉर्मर लाइन टाकण्याचे काम चालू होते. या कामासाठी वीज वितरण कंपनीने घोडेवाडी ते पास्ते रोडवर लोखंडी खांब व अॅल्युमिनियमच्या तारा टाकलेल्या होत्या. 7 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सात वाजता काम संपल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्याने हे साहित्य चोरून नेले होते. त्याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी गुन्हेशोध पथकातील अंमलदार यांना सदरचा गुन्हा उघड करण्यासाठी तपास करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. सिन्नर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध पथकातील अंमलदार हा गुन्हा उघड करण्यासाठी पाठपुरावा करत असताना घटनास्थळाच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यात भारत गॅस नाव असलेली तीनचाकी मालवाहू टॅम्पो जात असतानाचे निदर्शनास आले. या वाहनाचा सिन्नर पोलीस ठाणे हद्दीत शोध घेतला असता, तो पास्ते गावातील राज मल्हारी भगत यांचा असल्याचे समजले.त्याप्रमाणे राज मल्हारी भगत (वय 27, रा. पास्ते, ता. सिन्नर, जि. नाशिक) यास ताब्यात घेऊन या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता, त्याने गुन्हा केल्याची कबुली
दिली.
त्याच्याकडून 22 हजार रुपये किमतीचे लोखंडी खांब व गुन्ह्यात वापरलेला तीन चाकी मालवाहू टॅम्पो असा एकूण एक लाख 22 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक अदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. नीलेश पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी दिलेल्या सूचनांवरून सिन्नर पोलीस ठाण्याकडील गुन्हेशोध पथकाचे हवालदार समाधान बोराडे, कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड यांच्या पथकाने ही कारवाई केली. हवालदार माया गाडे पुढील तपास करत आहेत.