लोह स्त्री

स्वातंत्र्य मिळवण्याच्या लढाईत जिथे अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तिथे शूर वीरांगनाही होत्या. ह्या अनेक स्त्रियांनी आपल्या जिवाचे रान करून आपल्या देहाला समिधा केले. अशाच काही स्त्रिया होत्या ज्या प्रचारापासून अलिप्त राहून आपले काम करत होत्या. त्या सत्तालोलुप मुळीच नव्हत्या. ज्यांनी महात्मा गांधींसोबत खादी विणली, रस्त्यावर सत्याग्रह केला आणि तुरुंगातही गेल्या. स्वतंत्र भारताच्या संसदेत, आपल्या वैचारिक दृढनिश्चयाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. अशाच सर्वगुणसंपन्न स्त्रियांपर्यंत आपल्या स्वातंत्र्य इतिहासाची लेखणी पोहोचली तेव्हा त्यांच्या कर्तृत्वावर आम्हा स्त्रियांनाही खूप अभिमान वाटला.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीची कथा जितकी वीरगाथांनी भरलेली आहे तितकेच ती मौन आत्मबलिदानी सावल्यांनी ही प्रकाशित झालेली आहे. त्या सावल्यांनी प्रकाशाला अवरुद्ध केले तर नाहीच याउलट त्याला एक दिशा दाखवली. सरदार पटेल यांना आपण ’लोहपुरुष’ म्हणून ओळखतो, त्याच लोहपुरुषाची कन्या ’मणिबेन पटेल’ हे असे नाव आहे जे एका स्थिर, संयमित आणि निर्णायक व्यक्तिमत्त्वाला शोभते. ती फक्त एका राजनेत्याची मुलगी नव्हती, तर ती त्या परंपरेला चिन्हीत करत होती, जिथे राजनीतीत कीर्तीपेक्षा कर्तृत्वावर जास्त भर दिला जातो. त्यांना कधीच कुठल्याही पदाचा मोह नव्हता आणि कुठलीच महत्त्वाकांक्षा नव्हती. त्यांचे जीवन एक साधकाचे जीवन होते, ज्यात विचार, त्याग आणि शिस्तबद्धता होती. मणिबेन काही स्थापित नायिका नव्हती. त्यांनी स्त्रीच्या अनादि काळापासून चालत आलेल्या कमकुवत, त्यागमूर्ती स्त्रीच्या चारित्र्याला तडा घातला होता. कुठल्याही स्त्री चळवळीत उघडपणे भाग न घेणारी, नारेबाजी न करणारी अशी शांत स्त्री होती. त्या प्रत्येक जागेवर, जिथे शांत राहून निर्णय घेतात तिथे त्यांची वजनदार उपस्थिती राहत होती. त्यांची मौन उपस्थितीत त्यांचे मुखर बोलके चैतन्य होते. त्या असे व्यक्तिमत्त्व होत्या जे शब्दातून व्यक्त न होता कार्यातून व्यक्त होत होत्या. आपल्या वडिलांच्या हाताखाली राहून त्या वडिलांच्या सेक्रेटरीचे कामच करत होत्या. त्या देशाटनही करायच्या, कपडे विणायच्या, आपल्या वडिलांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायच्या…खर्‍या अर्थाने त्या वडलिांच्या उत्तराधिकारी होत्या. त्या काँग्रेस पक्षातही स्वायत्त होत्या. नेहरूंशी त्यांचे वैचारिक मतभेद त्यांना राजकीय असहमतच करत नव्हते, तर त्यालाच त्यांनी आपले नैतिक हत्यार म्हणूनही पाजळले. त्यांचा संसदेत हस्तक्षेप, पत्रव्यवहार आणि समाजसेवा त्यांच्या ह्या गोष्टींची साक्षी आहेत की, त्या वडिलांच्या नावाने नव्हे, तर आपल्या आत्मबळ आणि सेवानिष्ठ स्वभावामुळे अस्तित्वात होत्या. साधे-सरळ जीवन, खादीची जाड साडी आणि खांद्यावरच्या लटकणार्‍या कापडी पिशवीत जुजबी वस्तू. पायात साधी चप्पल. वर्षानुवर्षे कुठलीही सरकारी सुविधा, गाडी किंवा रेस्टहाउसची गरज त्यांना भासली नाही. संसदेत असूनही त्यांनी नेहमीच सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा वापर केला आणि आपला खर्चही अगदीच किरकोळ ठेवला. महावीर त्यागी यांनी ठिगळं लागलेली त्यांची साडी पाहून त्यांच्यावर व्यंग केले तेव्हा त्या म्हणाल्या, ’बेइमान लोकांना चरित्र फाटल्याची लाज असावी. संघर्षाच्या काट्यात अडकून साडी फाटली तर नैतिकतेचे ठिगळ लागणारच…’
1942 च्या भारत छोडो चळवळीत मणिबेन यांना अटक करण्यात आली. त्यांना येरवडा येथील तुरुंगात ठेवण्यात आले. तीन वर्षांनंतर त्यांची सुटका झाली. त्यानंतर दिल्लीत होणार्‍या अनेक घडामोडींच्या साक्षीदार त्या झाल्या. हे सर्व त्यांच्या वासरीत (डायरीत) मिळाले. काँग्रेसच्या कार्य समितीच्या बैठकीत एकदा सरदार पटेल यांनी सुभाषचंद्र बोस यांना बैठक सोडून जाण्यास सांगितले होते. कारण त्यांचे वैचारिक मतभेद होत होते.
सरदार पटेल यांच्या मुलाचे निवासस्थान, मुंबई येथील फ्लॅट 1930 च्या शेवटपर्यंत मणिबेन यांचे निवासस्थान होते. इथे प्रसिद्ध उद्योजक वालचंद हिराचंद, रामेश्वरदास बिडला, घनःश्यामदास बिडला, पत्रकार आणि नेते नियमित येत होते. 1988 नंतर मणिबेन यांनी सार्वजनिक जीवनातून विश्राम घेण्यास सुरुवात केली. स्मरणशक्ती क्षीण होत होती, पण आत्मबळ अक्षुण्ण होते. 1990 मध्ये त्यांच्या निधनानंतर संसदेत त्यांना श्रद्धांजली वाहताना अध्यक्षांनी त्यांना ’एक आदर्श सांसद, स्वतंत्रता सेनानी आणि सेवाभावी’ हे शब्द अर्पित केले.

iron woman

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *