नाशिक

अनियमित पाणीपुरवठा अन् रस्त्यांची दुरवस्था

मूलभूत सोयींच्या बोजवार्‍याने नागरिक त्रस्त

अनियमित व कमी दाबाने होणारा सततचा पाणीपुरवठा, कोट्यवधी खर्चूनही उद्यानाची असलेली दुरवस्था, सार्वजनिक ठिकाणांसह कॉलनी परिसरातील अस्वच्छता आणि रस्त्यांची झालेली कमालीची दुरवस्था यांसह इतर मूलभूत सुविधांच्या बोजवार्‍यामुळे नाशिकरोड विभागात येणार्‍या जेलरोडमधील प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी या सर्वांचे प्रतिबिंब नाशिक महापालिका निवडणुकीत उमटण्याची शक्यता आहे.
गेल्या 11 नोव्हेंबर रोजी मनपा निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण जाहीर झाले. मात्र, तत्पूर्वी आरक्षण जाहीर कसे होणार याकडे सर्वपक्षीयांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, प्रभागरचना 2017 प्रमाणेच निघाल्याने गतवेळेस निवडून येणार्‍यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
सर्वसाधारण, अनुसूचित जातीसाठी पुरुष, तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) व सर्वसाधारण महिला याप्रमाणे प्रभाग आरक्षण सोडत निघाली. आरक्षण सोडत निघताच इच्छुक प्रभागात कमालीचे सक्रिय झाले आहेत. सध्याच्या घडीला भाजपचे तीन व शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत. साडेतीन वर्षे प्रशासक राजवट असल्याने प्रभागात मूलभूत सोयीसुविधांचा अभाव दिसत असल्याने नागरिक वैतागले आहेत. प्रशासन दरबारी नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी लोकप्रतिनिधीच नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसल्याचे चित्र आहे

प्रभागातील विकासकामे

• दसक गाव येथील सभामंडप.
• चंपानगरीत वीस लाख लिटरचा जलकुंभ.
• भीमनगर येथे बुद्धविहार.
• दुभाजकामुळे वाहतूक सुरळीत.
• उपनगर येथे सामाजिक हॉल.
• ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका.
• दसक गावठाणात सर्व रस्त्यांचे काँक्रीटीकरण करून उद्यान व शाळेचे नूतनीकरण पूर्ण.
• ओमनगर, सिद्धेश्वरनगर, आढावनगर, पिंटो कॉलनी, चंपानगरी, निसर्ग गोविंद सोसायटी, श्रीरामनगर, सप्तशृंगीनगर, हनुमंतनगर यांच्यासह प्रभागातील कॉलनी रस्ते, पिण्याच्या पाण्याची नवीन पाइपलाइन, दसक गाव व्यायामशाळा नूतनीकरण कामे पूर्णत्वास नेली.
• गोसावीनगरला अभ्यासिका. चंपानगरी, भीमनगर येथे नवीन जलकुंभ. नवीन बुद्धविहार, उपनगरला रामजी आंबेडकर सभागृह. चंपानगरीत माता रमाई स्मारक कॉलनी रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण. पाण्याच्या नवीन पाइपलाइनचे काम.

विद्यमान नगरसेवक

                                                               दिनकर आढाव

                                                                      प्रशांत दिवे

                                                     मंगला आढाव

                                                  अनिता सातभाई

 

या समस्या कायम

छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरापासून ते दुर्गा मंदिर ते नारायणबापू चौकापर्यंतचा रस्ता जैसे थे आहे. या मुख्य रस्त्यावरून दररोज हजारो वाहनधारक ये-जा करतात. मात्र, खराब रस्त्यामुळे अनेक अडचणीना तोंड द्यावे लागते. गोदावरी सोसायटी, सह्याद्री कॉलनी, नारायण बापूनगर, सप्तशृंगीनगर परिसरातील रस्त्यांची बिकट अवस्था झाल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. रामेश्वरनगर, सिद्धेश्वरनगर, पिंटो कॉलनी, गुरुदत्तनगर या भागात पाण्याचा प्रश्न बिकट आहे. घंटागाडी वेळेवर न येणे, झाडांच्या वेड्यावाकड्या वाढलेल्या फांद्या, उद्यान, समाजमंदिरांची झालेली दुरवस्था, मोकळ्या जागेत व रस्त्याच्या कडेला वाढलेले गाजरगवत यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत. अनेक ठिकाणी ट्रॉन्स्फॉर्मर उघडे असल्याने नागरिकांच्या जीवाला धोका आहे. असे असूनही याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.

प्रभागातील समस्या

• भटक्या कुत्र्यांचा उपद्रव.
• अवजड वाहनांची वाहतूक
• दुर्गंधी सुटलेला इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकचा नाला.
• कमी दाबाने पाणीपुरवठा.
• प्रभागात विविध ठिकाणी पावसाळी पाणी तुंबते.
• प्रभागात घंटागाडी वेळेवर न येणे.

खालील कामाची होतेय मागणी

इंगळेनगर सिग्नल ते उपनगर नाका, आढाव मळा-आगर टाकळी रोड रस्ता रुंदीकरण व डांबरीकरणाचे काम मार्गी न लागल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. अपघातालादेखील आमंत्रण मिळते. इंगळेनगर चौफुली ते उपनगर नाका कॅनॉल रोड रुंदीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी होत आहे.

प्रभागाचा परिसर

नारायण बापूनगर, विठ्ठल मंगल कार्यालय परिसर, पिंटो कॉलनी, दसक गावठाण, इंगळेनगर, ब्रह्मगिरी सोसायटी, आम्रपाली झोपडपट्टी, भीमनगर, मंगलमूर्तीनगर, चंपानगरी, इच्छामणी मंदिर परिसर, महसूल कॉलनी, गोसावीनगर.

साडेसात कोटींचे क्रीडासंकुल धूळखात

जेलरोड प्रभाग 17 मधील आढावनगर येथे आठ वर्षांपूर्वी साडेसात कोटी रुपये खर्च करून छत्रपती शिवाजी महाराज क्रीडासंकुल इनडोअर स्टेडियमची इमारत उभारण्यात आली होती. पण सुरुवातीपासूनच या क्रीडा संकुलाकडे दुर्लक्ष झाले. जेलरोड परिसरात एवढे मोठे क्रीडासंकुल कुठेही नाही. मात्र, माजी नगरसेवक व
महापालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही इमारत धूळखात पडली आहे. धक्कादायक म्हणजे, टवाळखोरांचा हा अड्डा बनला असून, नागरिकांना यामुळे त्रास होतो आहे.

इच्छुक उमेदवार

मंगला आढाव, अनिता सातभाई, प्रशांत दिवे, दिनकर आढाव, शैलेश ढगे, सुनीता चव्हाण, राजेश आढाव, कैलास आढाव, शिला पवार, धनंजय लोखंडे, मंगेश मोरे, योगेश कपिले, राहुल कोथमिरे, गणेश गडाख, प्रवीण पवार, अर्चना जाधव, प्रमोद साखरे, मयूर आढाव, प्रशांत भालेराव, अनिल बहोत, अ‍ॅड. अरुण माळोदे, बाबूराव आढाव, ओमकार चव्हाण, संगीता लोखंडे, विजेता डावरे, वनिता लोखंडे, हर्षल दाणी, संजय भालेराव.

नागरिक म्हणतात…

प्रभागात स्वच्छतेसह रस्ते आणि पाण्याची परिस्थिती बिकट झाली आहे. याकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाही. वर्षानुवर्षे त्याच समस्या कायम आहेत. स्वच्छ प्रभाग- सुरक्षित प्रभाग होणे आवश्यक आहे. महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. प्रभागातील नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांसाठी जॉगिंग ट्रकची आवश्यकता असून, या सर्व सुविधा फक्त कागदावर आहेत. मात्र, प्रत्यक्षात यास मुहूर्त केव्हा लागेल आणि अंमलबजावणी केव्हा होईल याबाबत कोणाकडेही उत्तर नाही.
– रोशन पवार, सामाजिक कार्यकर्ते

 

प्रभाग 17 मधील इंगळेनगर, चंपानगरी भागात सतत अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. ठिकठिकाणी कचर्‍याचे ब्लॅक स्पॉट असून, यामुळे दुर्गधी तर होतेच. शिवाय आरोग्याचा प्रश्न उद्भवू शकतो. मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट असून, येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांवर ते तुटून पडतात. महापालिकेने त्यांचा त्वरित बंदोबस्त करावा. कचर्‍याचे ढीग कुठेही साचणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
– तुळशीदास इंगळे, सामाजिक कार्यकर्ते

 

दसक परिसरातून जाणार्‍या गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात गटारीचे सांडपाणी जाऊन मिसळत असल्याने जेलरोड परिसरात दुर्गंधी येते. शिवाय डासांचा प्रादुर्भाव सर्वाधिक याच भागात असतो. यातून आरोग्याचा प्रश्न उद्भवतो. ही नेहमीचीच समस्या झाली आहे.
– ऋषिकेश कदम, नागरिक

 

 

 

2011 नुसार लोकसंख्या

• लोकसंख्या ः 50,509
• अनुसूचित जाती- 16,119
• अनुसूचित जमाती- 2,406

 

 

 

 

Editorial Team

Recent Posts

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या

फरार भूषण लोंढेच्या मुसक्या आवळल्या त्याच्यासह सहकार्‍याला नेपाळ सीमेजवळून अटक सिडको : विशेष प्रतिनिधी सातपूर…

17 hours ago

थेटाळेजवळ वाहनाच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

लासलगाव : वार्ताहर निफाड तालुक्यातील थेटाळे शिवारात मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत…

19 hours ago

वृक्षतोड साधूंसाठी की संधिसाधूंसाठी?

हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या…

21 hours ago

सिन्नर नगरपरिषदेसाठी सरासरी 67.65 टक्के मतदान

मतदान यंत्रात किरकोळ तांत्रिक बिघाड; धक्काबुक्की, शाब्दिक बाचाबाची आणि तणावाचे वातावरण सिन्नर : प्रतिनिधी सिन्नरला…

21 hours ago

नाशिक जिल्ह्याची ओळख आता ‘बिबट्यांची पंढरी’?

देवगाव, रुई, गोंदेगाव, मरळगोई परिसरात बिबट्यांचा वाढता वावर लासलगाव : वार्ताहर द्राक्ष उत्पादनामुळे जागतिक ओळख…

21 hours ago

रासायनिक खतांच्या दरात पुन्हा वाढ

शेतकरी मेटाकुटीस; गोणीमागे 200 ते 250 रुपये अधिक मोजावे लागणार लासलगाव : वार्ताहर गेल्या काही…

21 hours ago