पालिका मृत्यूची वाट पाहतेय का?

राजराजेश्वरी चौकातील मुख्य रस्त्यावरच भरतोय भाजीबाजार
नाशिक : प्रतिनिधी
जेलरोड येथील राजराजेश्वरी चौक परिसरात गेल्या काही दिवसांपासून भाजीपाला थेट मुख्य वाहतूकीच्या रस्त्यावर भरत असल्याने येथे कधीही अपघाताची भीती आहे. दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमन विभागाकडून हाताची घडी तोंडावर बोट हे धोरण अवलंबले असल्याने भाजी विक्रेते थेट मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावर म्हणजे राजराजेश्वरी चौकात दुकाने थाटत आहे. त्यामुळे येथे कधीही दुदैवी घटना होण्याची सतत भीती आहे.
मागील काही वर्षापासून जेलरोड येथील पंचक शिव रस्त्यावर भाजीबाजार भरत आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या रस्त्यावरील भाजी विक्रेते थेट राजराजेश्वरी चौकातील मुख्य रस्त्यावरच येउन बसत आहे. सायंकाळी कामावरुन घरी जात असताना भाजीपाला घेण्यास रस्त्यावरच थांबतात. म्हणूनच आता थेट मुख्य वाहतुकीच्या रस्त्यावरच भाजीबाजार भरु लागला आहे. या भाजीबारामुळे जेलरोडकडून पवारवाडी, भैरवनाथ नगर, ब्रीज नगर, पंचक, जागृती नगर, मराठा नगर या परिसरात जाताना मोठी कसरत करुन वाहनधारकांना जावे लागत आहे. रस्त्यावरच भाजीबाजार असल्याने मुख्य रस्ता पूर्णत: बंद होतो आहे. एखाद्या वेळी चारचाकी किंवा दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले तर अशावेळेस अपघात होउ शकतो. भाजीबाजाराला स्थानिकांचा किंवा वाहनधारकांचा विरोध नसून केवळ मुख्य चौकातच भाजीबाजार थाटला जात असल्याने सर्वाना याचा फटका बसतो आहे. पालिका प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देउन येथे कार्यवाही करावी अशी मागणी स्थानिक करत आहे.चौकट….

विभागीय कार्यालय करतेय काय
महापालिकेच्या नाशिकरोड विभागीय कार्यालयाचे अधिकारी याकडे दूर्लक्ष करत आहे. या भाजीबाजारामुळे अपघात झाल्यास याची जबाबदारी महापालिका घेइल का असा संतप्त सवाल केला जातोय. मुख्य चौक असलेल्या व एन वाहतुकीच्या रस्त्यावर कोणताही विक्रेता बसणार नाही याकरिता नाशिकरोड येथील विभागीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी आणि अतिक्रमण विभाग कोणतीही कारवाइ करताना दिसत नाहीये. त्यामुळे अधिकारी अपघाताची वाट पहात बसलेय का अशीही चर्चा होते आहे.
…..
…तर पालिका जबाबदारी घेइल का
मुख्य चौकातच हा भाजीबार भरत असल्याने याचा येथील नागरिकांना प्रचंड त्रास होतो आहे. तसेच दररोज मोठी वाहतूक कोंडी होती आहे. जेव्हापासून हा भाजीबाजार भरु लागला आहे. तेव्हापासूनच वाहतूक कोंडीचा प्रश्न उदभवतो आहे. पालिकेकडून याकडे का दूर्लक्ष केले जातेय. यापूर्वी त्यांच्याकडे याप्रश्नी वारंवार मागणी केली आहे. या भाजीबाजारामुळे जिवीतहानी होउ शकते. अशी घटना घडल्यास पालिका जबाबदारी घेइल का,
निलेश गांगुर्डे, सामाजिक कार्यकर्ते, जेलरोड
……..
दुसरीकडे बसण्याच्या सूचना
राजराजेश्वरी परिसरात भाजीबाजार बसणार नाही. याकरिता अतिक्रमन विभागाचे वाहन याठिकाणी जाते. विक्रेत्याना पंचक येथे जागा उपलब्ध आहे तेथे त्याना बसावण्यासाठी सांगितले जात आहे.
सुनील आव्हाड, विभागीय अधिकारी, ना. रोड विभाग
…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *