अन्यायाविरोधात संघटनेचा एल्गार
नाशिक : प्रतिनिधी
निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी रात्रंदिवस जीवाची बाजी लावणार्या महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना अत्यल्प भत्ता देऊन अपमानित करण्यात आल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेने केला आहे. या संदर्भात पोलीस बॉईज चॅरिटेबल ट्रस्ट संचालित महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष राहुल अर्जुनराव दुबाले यांनी राज्य निवडणूक आयोगाला 16 जानेवारीला निवेदन सादर दिले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, निवडणुकीदरम्यान विविध विभागांतील कर्मचार्यांना वेगवेगळ्या प्रमाणात भत्ते देण्यात आले असून, पीआरओ यांना 2000 रुपये, शिपाई व चपराशी यांना 1500 रुपये, तर प्रत्यक्ष निवडणूक बंदोबस्ताची संपूर्ण जबाबदारी सांभाळणार्या पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना केवळ पाचशे रुपये भत्ता देण्यात आला. हा भेदभावपूर्ण निर्णय असून, पोलिसांवर अन्याय करणारा असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून मतदान प्रक्रिया, मतदान यंत्रांंची वाहतूक, मतमोजणी व निकाल जाहीर होईपर्यंत संपूर्ण काळात पोलीस अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस पहारा देत असतात. दंगल, गोंधळ अथवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीव धोक्यात घालून बंदोबस्त ठेवणारा पोलीसच असतो. निवडणूक अधिकार्यांपासून मतदारांपर्यंत सर्वांची सुरक्षा पोलिसांच्या खांद्यावर असते, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही अशा महत्त्वपूर्ण सेवेसाठी केवळ पाचशे रुपयांचा भत्ता देणे म्हणजे पोलिसांच्या मेहनतीचा अपमान असल्याची तीव्र भावना पोलिसांच्या कुटुंबीयांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रत्येक पोलीस अधिकारी व कर्मचार्यांना किमान पाच हजार रुपयांचा वाढीव भत्ता देऊन त्यांचा सन्मान राखावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. ही मागणी मान्य न झाल्यास सोमवारनंतर निवडणूक आयोगाच्या मुख्य कार्यालयावर हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.