हवेची शुद्धता राखण्यासाठी 33 टक्के वृक्ष, झाडी आणि बगीचा असणे गरजेचे आहे, पण झाडांची संख्या कमी होऊ लागल्याने दिवसेंदिवस वातावरणामध्ये सतत बदल होत आहे. तापमान वाढत आहे. विविध आजारांना आमंत्रण मिळत आहे. हे जर बदलायचे असेल तर झाडांची संख्या वाढविणे गरजेचे आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी शासन, प्रशासन कोणतीही ठोस पावले उचलत नसल्याने विविध शहरांची परिस्थिती बिकट होत आहे.
शेवटी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, ’वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती’ आणि हे सत्य आजच्या घडीला नाकारून चालणार नाही. मात्र, 2027 मध्ये नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा भरतो आहे. त्याच पार्श्वभूमीवर साधू- महंतांच्या निवासव्यवस्थेसाठी 1,800 झाडे तोडण्याचा घाट महापालिकेने घातल्याचे वृत्त समोर आले आहे. तपोवनात साधुग्राम साकारण्यासाठी हा सारा खटाटोप असल्याचे बोलले जात आहे. दर बारा वर्षांनी येणारा हा सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये होत आहे. आज सरकार वृक्षलागवडीसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीचा चुराडा करत आहे. सगळीकडे झाडे लावा- झाडे जगवा असा नारा दिला जात असताना नाशिकला मात्र कुंभमेळ्याचे कारण पुढे करून झाडांवर कुर्हाड चालविण्याचा निर्णय घेतला जात आहे. प्रदूषित हवा असलेल्या देशांतील टॉप- 25 शहरांत नाशिकचा समावेश आहे. त्यामुळे पर्यावरणीय समतोल ढासळणार आहे
या निर्णयाला अनेकांनी विरोध दर्शविला आहे. विशेष करून अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी वृक्षतोडीला कडाडून विरोध केला असून, झाडं म्हणजे आमचे आई-बाप आहेत. त्यांच्यावर कोणी हल्ला केला तर आम्ही गप्प बसणार नाही, असा दम वजा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात सरकार कोणता निर्णय घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
– राजू जाधव, मांगूर