वसंतोत्सवाने फुलले इस्कॉन मंदिर

नाशिक ः प्रतिनिधी
वसंत पंचमी अर्थात, माघ शुक्ल पंचमीच्या दिवशी वसंत ऋतूच्या आगमनानिमित्त नाशिकमधील श्री श्री राधा मदन गोपाल (इस्कॉन) मंदिरात शुक्रवारी (दि. 23) वसंतोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने मंदिरातील विग्रहांची नानाविध फुलांनी विशेष सजावट करण्यात आली होती.
या सजावटीसाठी सुमारे पाचशे किलो झेंडू, शेवंती, सूर्यफूल, ऑर्किड, अ‍ॅस्टर, जरबेरा तसेच डच गुलाब आदी विविध फुलांचा वापर करण्यात आला. विशेष बाब म्हणजे, भगवतांचा संपूर्ण पोशाख हा फुलांपासून साकारण्यात आला असून, मंदिरातील महिला भक्तांनी आपल्या हस्ते ही पुष्पवस्त्रे तयार केली होती. उत्सवासाठी प्रामुख्याने पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आला होता. सजावटीसाठीची फुले मुंबई व नाशिक येथून मागविण्यात आली होती.
या विशेष शृंगारामुळे मंदिरात भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. नयनरम्य दर्शनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी सकाळपासून मंदिरात उपस्थिती लावली होती.
वसंत पंचमीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे पाच वाजता मंगल आरतीने कार्यक्रमांची सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्राचा जप व भागवत प्रवचन झाले. सकाळी नऊ वाजता विशेष शृंगार आरती, तर संध्याकाळी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमांना भाविकांनी गर्दी केली होती.

ISKCON temple blooms with spring festival

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *