मालेगाव : प्रतिनिधी
मालेगाव महापालिकेच्या निवडणुकीत इस्लाम पक्ष आणि शिवसेना शिंदे गटाने दणदणीत विजय मिळवत शहराच्या राजकारणाची दिशा बदलली आहे. इस्लाम पक्षाने सर्वाधिक 35 जागांवर विजय मिळवला असून, शिवसेना शिंदे गटाने 24 पैकी 18 जागा जिंकत जोरदार मुसंडी मारली आहे. ‘एमआयएम’ला यावेळी पीछेहाट सहन करावी लागली असून, त्यांना केवळ 21 जागांवर समाधान मानावे लागले. भाजपला मोठा फटका बसला असून, 26 उमेदवारांपैकी तब्बल 24 जणांचा पराभव झाला आहे. समाजवादी पार्टीला 5, तर काँग्रेसला केवळ 3 जागा मिळाल्या आहेत.
महापालिकेच्या 84 पैकी 83 जागांसाठी गुरुवारी मतदान झाले होते. यावेळी मालेगावमध्ये मतदानाचा टक्का वाढून 64.08 इतका नोंदवला गेला. 2017 च्या निवडणुकीत हा टक्का 59.84 इतका होता. एक जागा बिनविरोध झाली होती. 83 जागांसाठी शुक्रवारी सकाळी चार ठिकाणी मतमोजणी सुरू झाली. सायंकाळपर्यंत सर्व 84 जागांचे निकाल जाहीर झाले. मतमोजणीदरम्यान अनेक धक्कादायक निकाल समोर आले.
भाजपच्या दिग्गज नेत्यांना या निवडणुकीत मोठा धक्का बसला. भाजपचे माजी गटनेते सुनील गायकवाड आणि महानगरप्रमुख देवा पाटील यांचा पराभव झाला. सलग चार वेळा नगरसेवक राहिलेले गायकवाड यांना शिवसेना शिंदे गटाच्या नवख्या विशाल पवार यांनी पराभूत केले. गायकवाड यांचे पुत्र दीपक यांनाही पराभव पत्करावा लागला. मात्र, त्यांचे बंधू मदन गायकवाड यांनी दणदणीत विजय मिळवला असून, त्यांनी युवासेनेचे जिल्हाप्रमुख विनोद वाघ यांना पराभूत केले. भाजपचे प्रवीण पाटील विजयी झाले, त्यांनी शिंदे गटाचे दिलीप बच्छाव यांचा पराभव केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवानेते दिनेश ठाकरे यांनी ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश करून उमेदवारी मिळवली आणि भाजपचे देवा पाटील यांना पराभूत करत सर्वांना धक्का दिला.
Islam Party wins Malegaon, Shiv Sena Shinde group wins