नुकताच जागतिक मातृभाषा दिन झाला. आजमितीला जागतिक पातळीवर सात हजारांहून अधिक मातृभाषा आहेत तर केवळ भारतात 22 प्रमुख भाषांसह सुमारे 1300 मातृभाषा आहेत. झपाट्याने होणारे जागतिकीकरण, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि अन्य भाषांनी मातृभाषेवर केलेली कुरघोडी यांमुळे अनेक मातृभाषा लोप पावत चालल्या आहेत. मातृभाषेचे संवर्धन व्हावे आणि त्या भाषेची संस्कृती टिकून राहावी यासाठी 1999 पासून 21 फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला आहे. एकाच मातृभाषेतील लोकांनी एकत्र येऊन मातृभाषेतील शिक्षण, साहित्य आणि संस्कृती यांबाबत चर्चा करून तिच्या संवर्धनासाठी ठोस कार्यक्रम आखावेत हा यामागील प्रमुख उद्देश आहे. सर्वाधिक भाषा बोलले जाणारे भारत हे जगातील एकमेव राष्ट्र असून, भारतातही काही मातृभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, तर काहींचा व्यवहारात होत असलेला वापर कमी होत चालला आहे. या दिवशी समस्त मराठी भाषिक मंडळींकडून व्हाट्सअप वर मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा दिल्या जाता, मराठी भाषेचे गोडवे गाणार्या कविता, गाणी आणि सुविचार सामाजिक माध्यमांच्या स्टेटस आणि स्टोर्यांवर ठेवले जातात. काही मंडळी या दिवशी एकमेकांशी आवर्जून मराठीत संवाद साधतात. सामाजिक संस्था, मंडळे, राजकीय पक्ष विविध उपक्रम राबवतात आणि त्यानिमित्ताने मराठी भाषेचे महत्व सांगणारी व्याख्याने दिली जातात.
इंग्रजी भाषेने मातृभाषांवर केलेली घुसखोरी ही आज एक जटील समस्या बनली आहे. व्यवहारात पुढे जायचे असेल, तर इंग्रजीला पर्याय नाही हा मोठा गैसमज भारतीय जनतेत निर्माण झाल्यामुळे आज इंग्रजी आणि कॉन्व्हेंट शाळांमध्ये आपल्या पाल्यांना घालणार्यांचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. महाराष्ट्रात त्यातही राज्यातील प्रमुख शहरांमध्ये हे प्रमाण वर्षागणिक वाढू लागले आहे, पाल्यांना इंग्रजी भाषा शिकण्यासाठी आणि त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व निर्माण होण्यासाठी पालकांकडून अतिरिक्त शिकवण्या लावल्या जातात. इंग्रजी भाषेचा सराव व्हावा यासाठी घरातही मुलांना इंग्रजीत संवाद साधण्याची सक्ती केली जाते. परिणामी मातृभाषा मराठी असूनही अशा मुलांना मराठी भाषा परकीय वाटू लागते. मराठी भाषेचे सौंदर्य आणि त्यातील पैलू यांना कधी उमगतच नाहीत. लहानपणापासूनच परकीय भाषेचे कित्ते गिरवल्याने मातृभाषेतील परवलीचे शब्द वगळता अन्य शब्दांचे ज्ञान या पिढीकडे मुळातच नसते. मातृषेतील शब्दभांडार, त्यातील सौंदर्य आणि त्यातील लेखन संपदा यांपासून ही पिढी दुरावू लागली आहे. हे असेच चालू राहिले, तर येणार्या काही वर्षांत मराठी मातृभाषा औषधालाही शिल्लक राहील का, हा प्रश्नच आहे. मातृभाषेच्या संवर्धनासाठी व्यवहारिक पातळीवर इंग्रजीचे वाढलेले अवास्तव महत्व कमी करण्याची आवश्यकता असून राज्य पातळीवर मातृभाषेचाच अधिकाधिक वापर केला जायला हवा आणि त्यासाठी मातृभाषेविषयी पालकांमध्ये जागृती होणे अत्यंत महत्वाचे आहे.
मूळ मराठी भाषेवर देववाणी संस्कृतचा प्रभाव असल्याने ती अधिक समृध्द आणि प्रगल्भ आहे. तिच्या प्रत्येक शब्दामध्ये अर्थ दडलेला आहे. राज्यातील संस्कृतीवर आरंभी इस्लामी आणि नंतर इंग्रजी आक्रमकांनी हल्ले केल्यामुळे येथील सध्याच्या बोली भाषेवर उर्दू आणि इंग्रजी भाषेचा प्रभाव अधिक जाणवतो. आपल्या नेहमीच्या बोलण्यातही एका वाक्यात दोन ते तिन परकीय शब्द आपण सहजपणे उच्चारत असतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक केल्यानंतर, मराठी भाषाशुद्धीचे प्रयत्न युद्धपातळीवर केले. परकीय शब्दांना हद्दपार केले. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही मराठी भाषेला तिचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणि तिचे सौंदर्य खुलवण्यासाठी आपल्या कार्यकाळात अथक प्रयत्न केले. बोलीभाषेतील परकीय शब्द शोधून त्यांना पर्यायी मराठी शब्द शोधून काढले. त्यानंतरही अनेकांनी भाषाशुद्धीसाठी प्रयत्न केले आहेत. या सर्वांचे योगदान लक्षात घेऊन आपणही आपल्या मायमराठीला तिचे मूळ स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, जेणेकरून येणारी पिढी आपला वारसा पुढे चालवेल. भ्रमणध्वनीवर बोलताना ’हॅलो’ऐवजी ’नमस्कार’ बोलण्याची सवय स्वतःला लावून घ्या. ’गुड मॉर्निंग-गुड नाइट’ऐवजी सुप्रभात-शुभरात्री बोलण्याची सवय लावा. आपले सण पारंपारिक पद्धतीने साजरे करून मित्र मंडळींना, आप्तेष्टांना सणांच्या शुभेच्छा मराठीतून द्या, मुलांना इंग्रजीतील कार्टून दाखवण्याऐवजी मातृभूमीत होऊन गेलेले पराक्रमी राजे-महाराजे,अवतार, क्रांतिकारक, संत यांच्या गोष्टी सांगा. आपली स्वाक्षरी मराठीतून करा. आपल्या भाषेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. ते फेडायचे असतील तर तिचे संवर्धन करणे आणि तिचा दैनंदिन व्यवहारात अधिकाधिक वापर करणे काळाची गरज आहे.
– जगन घाणेकर, 9664559780
It is in our hands to enrich our mother tongue!