अवघा तो शकुन

चित्त सुप्रसन्न जे वेळ।
तो पुण्यकाळ साधका॥

(एकनाथी भागवत अ. 19, ओवी 166)

आपण गृहप्रवेश, विवाह, नवीन व्यवसाय सुरू करणे आणि प्रवास याकरिता शुभ वेळ किंवा मुहूर्त पाहतो. ज्यावेळी मन आनंदी व भगवत चिंतनात असते तो सर्वच काळ शुभ असतो. आपलं मन भयभीत किंवा चिंतेत असेल तर तो काळ अशुभ असतो. म्हणून अमावास्या, ग्रहण किंवा पंचांग पाहून शुभाशुभ काळ ठरवू नये. ज्यावेळी मन आनंदी व भगवत चिंतनात असेल त्यावेळी कार्याची सुरुवात करावी.
सर्वसामान्य जन भगवंतावर श्रद्धा, त्याची आपल्यावर कृपादृष्टी राहून संसारी ऐश्वर्य कायम प्राप्त व्हावे, यासाठी श्रद्धा जास्त व भक्ती म्हणून कमी जोपासताना दिसतात.
श्रीसूक्तात एक शब्द येतो तो म्हणजे अनपगामिनी. या शब्दाचा अर्थ सुस्थिर, अन्यत्र न जाणारी अशी लक्ष्मी मला लाभो, असा आहे. सर्व जाणतात की, लक्ष्मी चंचल आहे आणि ती फक्त एका ठिकाणी स्थिर आहे ते स्थान म्हणजे नारायणाचे चरण. मग लक्ष्मी आपल्याकडे स्थिर व्हावी असे वाटत असेल तर हृदयी नारायणाला आणून बसवावे, अन्यथा लक्ष्मी चंचल आहे हे सर्वजण जाणतातच.
ज्योतिषशास्त्रात असा ठोकताळा (ढर्हीाल र्ठीश्रश) आहे की, सूर्योदयाला जी तिथी उदित असेल ती त्या सर्व दिवशी लागू पडते. अशावेळी काही सण, उत्सव हे सोयीनुसार साजरे केले जातात. सगळीच गंमत. हे सर्व घडते ते तिथी सुरुवात व तिथी समाप्ती काळाच्या घोळामुळे.
हे सर्व शास्त्र म्हणून ठीक आहे; परंतु साधं गणित असं आहे की, देवाची भक्ती, पूजा, शुभकार्य इत्यादीसाठी मुहूर्त पाहणे यांसारखा खुळेपणा नाही. कारण देवाची भक्ती करण्याची इच्छा होणे हाच शुभ मुहूर्त. शुभशकुन.
म्हणून जगद्गुरू तुकोबा म्हणतात…

अवघा तो शकुन।
हृदयीं देवाचे चिंतन॥
हृदयात देवाचे चिंतन किंवा नामस्मरण घडणे, हाच शुभशकुन.
या अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबा म्हणतात…
तुका म्हणे हरिच्या दासां।
शुभकाळ अवघ्या दिशा॥

एकदा हरीचे दास्यत्व म्हणजे मनापासून भक्ती करायचे अंगीकारले मग अवघ्या दिशा, काळ शुभच.
हरिचरणी अवघे अशुभ लय पावते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *