नाशिक : प्रतिनिधी
शहरातील ओडिशी नागरिकांच्या कलिंगा सांस्कृतिक समाज या सामाजिक व सांस्कृतिक संस्थेतर्फे शुक्रवारी (दि. 27) भगवान जगन्नाथ रथयात्रा आयोजित करण्यात आली आहे. दुपारी तीन वाजता ही रथयात्रा सुरू होईल. तीत 2,500 भाविक सहभागी होण्याची शक्यता आहे.
देवता स्थावर बसून सराफ लॉन्सच्या मागे इंदिरानगरमधील मंदिरातून मावशीच्या घरी म्हणजे मोदकेश्वर मंदिर, बापू बंगला येथे रथयात्रेद्वारे प्रस्थान करतील. भगवान जगन्नाथ तेथे 4 जुलैपर्यंत मुक्कामी असतील. 5 जुलैला ते रथावर विराजमान होऊन पुन्हा सराफ लॉन्समागील मंदिरात विराजमान होतील.
शहरात 2017 पासून या रथयात्रेस सुरुवात करण्यात आली. परंपरेनुसार जगन्नाथ मंदिरात भगवान बलभद्र, जगन्नाथ, सुभद्रा आणि सुदर्शन यांच्या जगन्नाथपुरी येथून आणून स्थापित केलेल्या मूर्तीना पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 11 जून रोजी शाहीस्नान घालण्यात आले. 16 दिवस देवता एकांतात व अन्सारगृहात राहतात आणि 17 व्या दिवशी तेथून निघून नवीन वस्त्र परिधान करून रथात विराजमान होतात. नंतर नगरपरिक्रमा करतात.
परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने रथयात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष कॅप्टन रत्नाकर बारीक, डी. पी. पात्रा, बी. के. दास, सौम्यकांत साहू, उमेश राऊत, मंदिराचे ज्येष्ठ सल्लागार देवानंद बिरारी यांनी केले आहे.
या रथयात्रेच्या निमित्ताने अशी माहिती मिळाली की, नागपूरच्या मुधोई सरकारचे पुरी येथे योगदान आहे. मुस्लिम सरदाराने आक्रमण करून जगन्नाथपुरी मंदिर ताब्यात घेतले होते. मुधोई सरकार म्हणून ओळखले जाणार्या नागपूरकर भोसले यांनी 1701 मध्ये मंदिर ताब्यात घेतले. त्यांनी 22 धर्मशाळा बांधल्या, रस्त्यांचे जाळे निर्माण केले. दहा पूल उभारले. कायमस्वरूपी अन्नछत्र सुरू केले. रोजगार निर्माण व्हावा यासाठी दरवर्षी रथ तयार करायचा आणि नंतर तो मोडायचा, अशी व्यवस्था लावून दिली.