नाशिक –
रागाच्या भरात संबलदेव यादव (वय ३०, रा. विश्वासनगर, सातपूर) याच्या डोक्यात बॅटने हल्ला चढवून त्यास जीवे ठार मारल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने पित्यासह दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सातपूरमध्ये १४ नोव्हेंबर २०२० मध्ये ही घटना घडली होती.
जिल्हा व सत्र न्यायालयाचे (क्रमांक ०१) न्यायाधीश व्ही एस कुलकर्णी यांनी आज (दि.१४) हा निकाल दिला. सरकारतर्फे सहायक अभियोक्ता सचिन गोरवाडकर यांनी पुरावा सादर करत युक्तीवाद केला.
अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, सातपूरमधील विश्वास नगर येथे असलेल्या हनुमान मंदिराजवळ १४ नोव्हेंबरला ही घटना घडली होती. यातील फिर्यादी संगिता संबलदेव यादव, त्यांचे दोन मुले व पती संबलदेव यादव हे
साला अमरजित यादव यास फटाके फोडल्याचे कारणावरून शिवीगाळ धक्कबुक्की केली म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी विशाल यादव याच्या घरी गेले होते. तेव्हा शेजारी रहाणारे आरोपी सुकट मोहोदर चौव्हाण (वय ५८), संदीप सुकट चौव्हाण (२२) संजय सुकट चौव्हाण (वय २५) यांनी आवाज का करतात, असे म्हणून वाद घातला. त्या वादातून रागाच्या भरात संदीप चौव्हाण याने घरात जाऊन बॅट आणली. तेव्हा सुकट चौव्हाण याने संबलदेव यादव यास पाठीमागून धरून ठेवले तर संदीपने डोक्यात बॅटने प्रहार केले. तसेच संजय चव्हाण याने दुसरी बॅट आणून मयताचे डाव्या डोळयावर मारली. त्यानंतर तो चक्कर येउन खाली पडला त्यावेळी आरोपी पळून गेले. जबर जखमी झालेल्या संबलदेव यादव यास उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता १८ नोव्हेंबरला त्याचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी भादंवि कलम ३०२, ३२६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन उप निरीक्षक, टी एम राठोड यांनी केला. न्यायालयीन सुनावणीत आरोपीविरूध्द् फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष व तपासी अधिकारी यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपीतांस सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये भादंवि कलम ३०२ (खून) मध्ये जन्मठेप व प्रत्येकी दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास ०३ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावलेली आहे