आता मरेपर्यत हटणार नाही : मनोज जरांगे पाटील
मराठा समाजाची पहिली आणि शेवटची लढाई
नाशिक : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाची लढाई गेल्या अनेक वर्षापासून सुरु आहे. 29 ऑगस्टला अंतरवाली सराटीत आंदोलन सुरू झाले. तिसर्या दिवशी काय झाले माहिती नाही. शांततेत आंदोलन सुरू होते. मात्र लाठीहल्ला झाला.एकाच्या अंगात 35 छर्ये घुसले असून मुंबईत उपचार सुरु आहेत. आमचे असे काय चुकले? आमच्यावर असा प्राणघातक हल्ला केला. आरक्षण आता घेतल्याशिवाय शांत बसणार नसून मराठा समाजाच्या चेहर्यावर आरक्षण दिल्याचा आनंद पाहायचा आहे. त्यामुळे आता मरेपर्यंत हटणार नसल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले
मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्याच्या दौर्यावर निघालले मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (दि.8) रात्री उशिरा शहरातील सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे सकल मराठा समाजातर्फे सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट दिली. यावेळी उपस्थित समाजाला मार्गदर्शन करताना बोलत होते.
पुढे बोलताना म्हणाले, आम्ही आमच्या हक्काचे आरक्षण देण्याची मागणी केली म्हणून हल्ला केला का.? याचे उत्तर शासनाकडे नाही. हे आंदोलन आता इतके पेटले की देशात आता ते मोडायची हिम्मत कोणामध्ये नाही.
ते म्हणाले, आम्हाला धिंगाणा करायचा असता तर 29 लाच केला असता. पण मी व्यासपीठावरून एका शब्दात शांत बसा बोललो. तेव्हा पोर तिथे शांत बसले. मराठ्यांची औलाद कधी धिंगाणा करू शकत नाही. पण हला का केला हे आजपर्यंत सरकारने उत्तर दिले नाही. आंदोलन सुरु असताना एखादया कोपर्यात जाऊन चर्चा केली नाही तर सर्वांसमोर शासनाला भूमिका मांडायला लावली. जरांगे पाटील यांचे आगमन होताच त्यांचे पुष्पवृष्टी आणि टाळ-मृदूंगाच्या वादनाने जल्लोषात स्वागत करण्यात आले. जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या हस्ते मशाल प्रज्वलित केली. तसेच उपोषणकर्त्यांचा सत्कार केला. मराठा समाजाकडून यापूर्वी एक मराठा लाख मराठा अशी घोषणा दिली जात होती. त्याच्यासोबत आता जरांगे पाटील यांच्यासाठी एक मराठा ग्रेट मराठा अशी घोषणा देण्यात आली.
शासनाला मिळाले पाच हजार पुरावे
राज्य शासनाच्या समितीला आतापर्यंत पाच हजार पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे आता सरकारला कुणबी आरक्षण द्यावे लागेल. ही शेवटची आणि अंतिम लढाई असेल, असेही जरांगे पाटील म्हणाले.
जरांगे पाटलांना पाहण्यासाठी गर्दी
सायंकाळी सहा वाजता येणारे जरांगे पाटील दहाच्या सुमारास आले. मात्र तरीही मोठी गर्दी होती. रात्री सव्वा अकरापर्यंत त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. समाजातील बांधव महिला तसेच बालक जरांगे पाटील यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. यावेळी एक मराठा लाख मराठा, कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही, मी मराठा मी कुणबी अशा घोषणा मराठा बांधवांकडून देण्यात आल्या.
….
ना. भुजबळ यांचे नाव न घेता टीका
नाशिकमध्ये आल्यावर काहींना वाटेल याचा शहरात येताच खूप आवाज वाढला आहे. मराठा समाजाने प्रत्येक पक्षाला मोठे केले आहे. कधीही कुणाची जात पहिली नाही. मराठा समाजाला जो कोणी विरोध करेल तेव्हा इंचभरही मागे हटणार नसल्याचे सांगत जरांगे पाटील यांनी ना. छगन भुजबळ यांचे नाव न घेता टोला लगावला.