जर्मनीची जेनिना यात्रेत जिलेबी तळते तेव्हा…

नगरसूल : भाऊलाल कुडके
येवला तालुक्यातील नगरसूल येथील खंडेराव महाराज यात्रोत्सवात जर्मनीच्या जेनीनी या विदेशी पाहुणीने संपूर्ण गावाचे लक्ष वेधून घेतले. यात्रोत्सवात जिलेबी काढण्यापासून तर बासरी वादनापर्यंतचा अनुभव या विदेशी पाहुणीने घेतला.
राष्ट्रवादीचे युवानेते सुनील पैठणकर यांची मुलगी श्वेता मास्टर आर्ट करण्यासाठी केरळ येथे गेली होती. तेव्हा तिची जर्मनची जेनींना कॉक सोबत मैत्री झाली. तिने भारतीय संस्कृतीबरोबर महाराष्ट्रातील संस्कृती कशी असते याबाबत जेनिनासी बोलत असतांना तिला गावाकडील खेड्यांच्या संस्कृती कशी असते, शेतमळा, विहिर, बागायत,अन्नधान्य कसे मिळत? याविषयीचे कुतुहल जागे झाले. मात्र, मधल्या काळात कोरोना महामारीमुळे जेनिना जर्मनीला मायदेशी परतली. जेनिना व श्वेता यांच्या मैत्रीची नाळ घट्टच होती. जेनीना परत भारतात आल्यावर तिने श्वेता पैठणकर हीला संपर्क साधला. महाराष्ट्रात येण्याची तिने इच्छा व्यक्त केल्यानंतर खंडेराव महाराज यात्रेसाठी ती आली. नगरसूल येथील श्वेता पैठणकर या मैत्रिणीसोबत यात्रेत दाखल होऊन खंडोबा चरणी ती नतमस्तक झाली.लाखो यात्रेकरूंच्या उपस्थितीत होणारा बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम, पालखी व कावडी मिरवणूक, वाघ्या-मुरळींचे जागरण, आदिवासी नृत्य आदी पारंपरिक कार्यक्रमांना हजेरी लावून यात्रोत्सवाचा तिने मनसोक्त आनंद लुटला.

यात्रेकरूंसोबत ’येळकोट येळकोट जय मल्हार’चा गजर करून जेनिनाने भंडार्‍याचीही उधळण केली. यात्रोत्सवामधील परंपरा बघून खूप आनंद झाल्याची भावना जेनिनाने बोलून दाखविली. परदेशी पाहुणी यात्रेत दाखल झाल्यानंतर मंदिरातील पुजारी दत्तु भडके व नगरसूलकरांनी जेनिनाचे जल्लोषात स्वागत केले. यात्रेत विक्रीसाठी असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू, मिठाई, जिलेबी तयार करण्याच्या पद्धतीचे तिने बारकाईने निरीक्षण केले. वडापाव, जिलेबी, पाणीपुरी, उसाचा रस आदींचा आस्वाद घेतला. पाळण्यात बसण्याचा आनंदही मैत्रिणीसोबत या परदेशी पाहुणीने लुटला. दोन दिवसांच्या या यात्रोत्सवात परदेशी पाहुणी अवतरल्याने औत्सुक्याचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *