इगतपुरी : प्रतिनिधी
तालुक्यातील मुंढेगाव परिसरातील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला तीन दिवसांपूर्वी लागलेली आग अखेर 56 तासांनंतर शुक्रवारी (दि. 23) आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आलेे. तीन दिवस जवळपास 25 अग्निशमन दलांचे शंभरच्या वर बंब आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत होते.
गुरुवारी (दि. 22) कंपनीच्या परिसरातील असलेल्या मुंढेगाव, शेणवड खुर्द, बळवंतनगर, मुकणे, पाडळी आदी गावांतील नागरिकांना गाव खाली करण्याचा आदेश प्रशासनाने दिला होता. शुक्रवारी (दि. 23) काही प्रमाणात आग आटोक्यात आल्यानंतर व धोका कमी झाल्यानंतर गाव सोडून गेलेले नागरिक हळूहळू पुन्हा गावात परतताना दिसून आले.
शालेश शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी जिंदाल कंपनीस भेट देऊन परिसरात पाहणी केली. आग आटोक्यात आली असली, तरी ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे दोन दिवस धूर बघायला मिळेल, असे त्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी लागलेली आग आणि आत्ता लागलेल्या आगीमागील नक्की कारण काय? त्याचा तपास केला जाईल. मंत्रालय नोडल अधिकारी, रिलायन्स आणि इतर अनेक विभागांचे उच्चपदस्थ अधिकारी येथे उपस्थित आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व खबरदारी घेण्यात आली होती का? आग कशामुळे लागली? याचा तज्ज्ञ शोध घेतील आणि अहवाल करून तपास केला जाईल. टेक्निकल ऑडिटबाबत माहिती घेतली असता ऑडिट केले अशी मला माहिती कंपनीकडून मिळाली. मात्र, चौकशीत सर्व माहिती समोर येईल. कंपनीकडून ऑडिट केले असेल किंवा नसेल. केले गेले होते का? नेमकी काय चूक होती त्याबाबत वरिष्ठ पातळीवर चौकशी होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहेत. तीन दिवसांपासून धूर बाहेर पडतोय. आजूबाजूच्या शेतकर्यांचे नुकसान झाले असेल तर सर्वेक्षण केले जाईल. फायर ऑडिट झाले असेल तर ही दुर्घटना का झाली? दोषी कोण? कायद्यात राहून पुढील सर्व कारवाई होईल, असे भुसे म्हणाले.
कंपनीतील मेटालायझर युनिट 1,2,3 आणि पोलिस्टर लाइन पूर्णपणे जळून खाक .
अशा कंपन्यांनी फायर ऑडिट केले पाहिजे. त्यांनी डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रिअल सेफ्टी यांच्याकडून इंडस्ट्रिअल सेफ्टी ऑडिट केले असेल, पण मी सूचना देणार आहे की, फायर सेफ्टी ऑडिटपण केले पाहिजे. इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटही करायला हवे. त्यात त्यांचे अभियंतेही असतात.
– किरण हत्याल, सहाय्यक संचालक, महाराष्ट्र फायर सर्व्हिसेस.