हिवाळी हंगामात भाजीपाला पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर हवामानावर अवलंबून असते. विशेषतः थंडीच्या काळात दिवस व रात्रीच्या तापमानातील मोठा फरक असतो. अचानक येणारी थंडीची लाट, पहाटे पडणारे दव तसेच काही वेळा अचानक वाढणारे तापमान यामुळे भाजीपाला पिकांवर ताण निर्माण होतो. या बदलत्या परिस्थितीचा थेट परिणाम पिकांच्या वाढीवर, फुलधारणेवर आणि शेवटी उत्पादनावर दिसून येतो. अशा परिस्थितीत कमी खर्चाचे, पर्यावरणपूरक आणि टिकाऊ उपाय म्हणून जिवामृत हे शेतकर्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
थंडीच्या दिवसांत जमिनीचे तापमान कमी झाल्याने पिकांच्या मुळांची कार्यक्षमता घटते. अन्नद्रव्यांचे शोषण मंदावते आणि झाडांची वाढ खुंटते. टोमॅटो, मिरची, वांगी यांसारख्या पिकांमध्ये फुलगळ वाढते, तर कोबी व फ्लॉवरमध्ये गड्ड्याची वाढ अपेक्षित होत नाही. पालेभाज्यांमध्ये पानांचा रंग फिका पडतो, पाने वाळतात ,वाढ मंदावते आणि उत्पादनात घट येते. काही ठिकाणी थंडी व दव यामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.
जिवामृत म्हणजे काय?
जिवामृत हे देशी गायीच्या शेण व मूत्रावर आधारित सेंद्रिय द्रावण आहे ज्यामध्ये कोट्यवधी उपयुक्त सूक्ष्मजीव असतात. गूळ व डाळीच्या पिठामुळे या सूक्ष्मजीवांना ऊर्जा मिळते आणि ते जमिनीत वेगाने वाढतात. हे सूक्ष्मजीव मातीतील सेंद्रिय घटकांचे विघटन करून पिकांना आवश्यक अन्नद्रव्ये सहज उपलब्ध करून देतात. त्यामुळे माती जिवंत राहते आणि पिकांची वाढ नैसर्गिक पद्धतीने होते.
थंडीमध्ये जिवामृत महत्त्वाचे
थंडीच्या काळात जिवामृत वापरल्यामुळे मातीतील जैविक क्रिया सुरू राहते. जिवामृतातील सूक्ष्मजीव मुळांच्या आजूबाजूला सक्रिय राहून पिकांची थंडी सहन करण्याची क्षमता वाढवतात. माती भुसभुशीत राहते, पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि मुळांना हवा व पाणी सहज मिळते. परिणामी पिकांवरील ताण कमी होऊन झाडे ताजीतवानी राहतात.
भाजीपाला पिकांना होणारे फायदे
जिवामृताचा नियमित वापर केल्यास भाजीपाला पिकांमध्ये अनेक सकारात्मक बदल दिसून येतात. टोमॅटो, मिरची व वांगी पिकांमध्ये फुलधारणा सुधारते आणि फुलगळ कमी होते. कोबी, फ्लॉवर, ब्रोकली यांसारख्या पिकांमध्ये गड्ड्याचा आकार व वजन वाढते. पालक, मेथी, कोथिंबीरसारख्या पालेभाज्यांमध्ये पानांचा रंग गडद हिरवा राहतो आणि वाढ जलद होते. वेलवर्गीय भाज्यांमध्ये वेलांची ताकद वाढून उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून येते.
जिवामृत तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे अगदी कुणीही नवखा शेतकरीदेखील कमीत कमी वेळात हे बनवून वापरू शकतो.
जिवामृत तयार करण्यासाठी दहा किलो देशी गायीचे शेण, दहा लिटर गायीचे मूत्र, दोन किलो गूळ, दोन किलो डाळीचे पीठ, एक मूठ शेतमाती आणि 200 लिटर पाणी वापरावे. हे सर्व साहित्य सावलीत एका ड्रममध्ये मिसळून सकाळ-संध्याकाळ काठीने एकाच दिशेने ढवळावे. साधारण 48 तासांत जिवामृत वापरण्यास तयार होते.
जिवामृत वापरण्यासाठी योग्य
पद्धतींचा वापर करावा
जिवामृत 200 लिटर प्रति एकर या प्रमाणात जमिनीतून द्यावे. ठिबक सिंचन असल्यास 50 ते 100 लिटर प्रति एकर पुरेसे ठरते. जिवामृत देताना जमीन ओलसर असणे आवश्यक आहे. सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा देणे अधिक फायदेशीर ठरते. फार थंडी किंवा जास्त दव असताना जिवामृत देणे टाळावे. 12 ते 15 दिवसांच्या अंतराने जिवामृत देणे पिकांसाठी उपयुक्त ठरते.
बदलत्या तापमानात जिवामृत
कसे काम करते
अचानक तापमान घटल्यास जिवामृतासोबत सेंद्रिय किंवा प्लास्टिक मल्चिंग केल्यास जमिनीचे तापमान स्थिर राहते आणि पिकांवरील थंडीचा परिणाम कमी होतो. तर अचानक तापमान वाढल्यास जिवामृत मुळांची कार्यक्षमता वाढवून पिकांना लवकर सावरण्यास मदत करते
थंडीमध्ये बदलत्या तापमानामुळे भाजीपाला पिकांना येणारा ताण कमी करण्यासाठी जिवामृत हा अत्यंत प्रभावी, कमी खर्चाचा आणि पर्यावरणपूरक उपाय आहे. मातीचे आरोग्य सुधारून, पिकांना संतुलित पोषण देत उत्पादन व दर्जा वाढवण्याचे सामर्थ्य जिवामृतामध्ये आहे. त्यामुळे हिवाळी भाजीपाला पिकांसाठी जिवामृत हे शेतकर्यांसाठी खर्या अर्थाने नैसर्गिक वरदान ठरणार आहे.सोबतच मानवी आणि जमीनीचे आरोग्य जपण्यासाठी देखील हातभार लागणार आहे. – सोनाली कदम