समस्यांच्या ट्रॅकवर जॉगिंग!
नाशिक ः देवयानी सोनार
हिवाळा सुरू झाल्यानंतर व्यायामप्रेमी नागरिकांची जॉगिंग ट्रॅकवर गर्दी वाढू लागली आहे. महापालिकेने नागरिकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी ट्रॅक बनविले असले तरी हे जॉगिंग ट्रॅक समस्यांग्रस्त झाले आहेत. ठिकठिकाणी साचलेला पालापाचोळा आणि उडणारी धूळ यामुळे आरोग्यासाठी धावणार्या नागरिकांना अनारोग्याचा सामना करावा लागत आहे.
गुलाबी थंडीचा आनंद घेत रोजच्या धावपळीत शरीरही तंदुरुस्त ठेवण्यासाठी नाशिककर ट्रॅकवर येत आहेत. शहर आणि उपनगरांतील विविध ठिकाणच्या जॉगिंग ट्रॅकवर नागरिक व्यायाम, चालणे, पळणे आदी प्रकारांना पसंती देत आहेत. मात्र, जॉगिंग ट्रॅकवर वाढती गर्दी आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे यामुळे हिरमोड होत असल्याचे चित्र आहे. चालताना खड्ड्यांमुळे उंच, सखल भागामुळे चालण्याचा वेग आणि वारंवार गती आणि मार्ग बदलत अडथळ्यांची शर्यत पार करावी लागत असल्याचे परिसरातील नागरिकांनी सांगितले.
शहर आणि उपनगरांत एकूण 37 जॉगिंग ट्रॅक आहेत. जॉगिंग ट्रॅकवर अनेक ठिकाणी खड्डेे, धुळीचे साम्राज्य, पालापाचोळा, प्लास्टिक कचरा आदी आढळून येतात. त्यामुळे नागरिकांना सकाळ आणि सायंकाळच्या वेळी जॉगिंग ट्रॅकवरून चालण्यास अडचणी येतात.सहाही विभागातील जॉगिंग ट्रॅकवर पावसामुळे खड्डेे पडले असल्याचे नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे.
दररोज मारले जाते पाणी
जॉगिंग ट्रॅकवर सकाळी पाणी मारणे, कचरा साङ्ग करणे आदी देखभालीची कामे नियमित होत असल्याचे उद्यान विभागाचे उद्यान निरीक्षक विजयकुमार मुंढे यांनी सांगितले.
तंदुरुस्तीसाठी धडपड
सकाळच्या प्रसन्न वातावरणात व्यायाम करून शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामप्रेमी जॉगिंग ट्रॅक किंवा उद्यानांमध्ये हजेरी लावतात. धावणे, चालणे, प्राणायाम, शारीरिक व्यायामप्रकार करून सकाळची शुद्ध हवा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कोरोना काळात निर्बंध असल्याने नागरिकांना घराबाहेर पडता येत नव्हते. जॉगिंग ट्रॅकही ओस पडले असल्याने धुळीचे साम्राज्य, कचरा, झाडांचा पालापाचोळा, प्लास्टिक कचरा, वाढलेले गवत, दुर्गंधीयुक्त वातावरण यामुळे जॉगिंग ट्रॅकची दुरवस्था झाली होती.
टवाळखोरांचा उपद्रव!
जॉगिंग ट्रॅकवर प्रेमीयुगुलांचा तसेच घोळका करून टवाळखोरांचा वावरही वाढला आहे. जॉगिंग ट्रॅकच्या मार्गात अथळला निर्माण होईल असे उभे राहणे, मुलींना छेडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसह व्यायामप्रेमींनाही अनेकदा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.