जिल्ह्यात आठ लाख शिधापत्रिकाधारकांचे ई-केवायसी बाकी
नाशिक : प्रतिनिधी
शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. शासनानेे 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी करण्यासाठी अंतिम मुदत दिली होती. मात्र, मुदत संपल्यानंतरही राज्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने अखेर शासनाकडून ई-केवायसीसाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, ज्या शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी आहे, त्यांनी 30 जूनपर्यंत प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण 38 लाख 73 हजार 305 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे पुरवठा विभागासमोर लक्ष्य होते. त्यांपैकी 30 लाख 42 हजार 101 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. आठ लाख 31 हजार 204 शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप बाकी आहे. जिल्ह्यात एकूण 78 टक्केशिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
नवीन शिधापत्रिकांंधारकांची वाढ
गेल्या 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसी प्रक्रियेसाठी अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, मुदतीनंतरही अनेकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी होती. नवीन शिधापत्रिकाधारकांची वाढ झाल्याने त्यांचीदेखील ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया बंधनकारक आहे.
शिधापत्रिकांनी मेरा-केवायसी अॅप वापरावे
ई-केवायसी करण्यासाठी धान्य दुकानात गर्दी होत असल्याने शासनाने मेरा-केवायसी अॅप विकसित केले आहे. या अॅपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती भरून ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
ई-केवायसी करण्यासाठी 30 जूनपर्यंत अंतिम मुदत आहे. ज्यांची ई-केवायसी प्र्रक्रिया बाकी आहे त्या शिधापत्रिकाधारकांनी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी.
– कैलास पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी (प्रभारी)