केवळ चर्चा, बोलणी कधी?
शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येऊन राजकारण करतील काय? गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या या प्रश्नाला पुन्हा एकदा फोडणी दिली गेली ती एका मुलाखतीने. दोघांनी एकत्र यावे ही शिवसैनिक आणि मनसैनिक यांची गेल्या अनेक वर्षांपासून इच्छा आहे. ती काही फलद्रुप होऊ शकलेली नाही. दोन्ही नेत्याच्या विचारांत साम्य आहे. मराठी आणि हिंदुत्वावर दोघांचे एकमत असूनही दोघे एकत्र का येत नाहीत? हा प्रश्न दोघांच्याही सैनिकांना पडलेला आहे. अर्थात, यामागे राजकारण आहे. शिवसेनेचे संस्थापक प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतच म्हणजे ९ मार्च २००६ रोजी राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाच्या माध्यमातून आधी मराठीच्या मुद्द्यावर आणि नंतर त्याला हिंदुत्वाची जोड देऊन राज ठाकरे यांनी स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली. त्यांनी राज्यात कोणत्याच पक्षाशी युती केली नाही. भाजपाशी युती होण्याच्या शक्यता वर्तविण्यात येत होत्या. त्या शक्यताच ठरल्या. दोन वेळा (२०१४ व २०२४) लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपाला पाठिंबा दिला, तर एकदा (२०१९) त्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात भूमिका घेताना काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्यक्षात पाठिंबा दिला नाही. सन २००९ ची लोकसभा निवडणूक मनसेने स्वबळावर लढविली होती. त्यावेळी अपेक्षित यश आले नाही. नाशिक महापालिकेत २००७ साली सत्ता मिळाली. मुंबई आणि ठाणे महापालिकेत काही जागा मिळाल्या. सन २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला १३ जागा मिळाल्या. त्यानंतर २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत केवळ एक जागा मिळाली, तर २०२४ ला एकही आमदार होऊ शकला नाही. सध्याच्या परिस्थितीत मनसेची राजकीय ताकद कमालीची घसरली आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा जपत उध्दव ठाकरे यांनी शिवसेना पुढे नेली. तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उभी फूट पाडूनही लोकसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला चांगले यश मिळाले. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांच्या शिवसेनेचा पालापाचोळा झाला. थोडक्यात, मनसे आणि शिवसेना (ठाकरे) हे दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या कमजोर झाले आहेत. अशा परिस्थितीत प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी त्यांच्या यूट्युब चॅनेलवर घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे अजूनही एकत्र येऊ शकतात का? असा थेट सवाल राज ठाकरे यांना केला. यावर राज ठाकरे म्हणाले की, “कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडणे किरकोळ आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी या गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. एकत्र येणे, एकत्र राहणे यात फार कठीण गोष्ट वाटत नाही. विषय फक्त इच्छेचा आहे, कारण हा माझ्या एकट्याचा विषय नाही. सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा, हे माझे म्हणणे आहे.” येथे त्यांनी महाराष्ट्र हिताची भाषा केली. “मी शिवसेना सोडल्यानंतर बाळासाहेब सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही, हा माझा विचार होता. पण, मी शिवसेनेत होतो तेव्हा उद्धवबरोबर काम करायला मला काहीच हरकत नव्हती. पण समोरच्या माणसाच्या मनात आहे का, मी त्यांच्याबरोबर काम करावं? महाराष्ट्राची इच्छा असेल तर महाराष्ट्राने जाऊन सांगावे. अशा लहान-मोठ्या गोष्टींत मी माझा इगो आणत नाही,” असेही म्हणत राज ठाकरे त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत युती करण्याचे संकेत दिले. यावर उध्दव ठाकरे यांनीही भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यात बोलताना लागलीच सकारात्मक प्रतिसाद दिला. महाराष्ट्र हितासाठी किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची माझीही तयारी असल्याचे सांगत उध्दवजींनी युतीसाठी एक हात पुढे केला आहे. “महाराष्ट्र व मराठी माणसाच्या हितासाठी माझीसुद्धा आपसातील किरकोळ वाद बाजूला ठेवण्याची तयारी आहे. पण माझी अट एक आहे. महाराष्ट्राच्या हिताआड जो कुणी येईल, त्याचे स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, मी त्याच्या घरी जाणार नाही हे प्रथम ठरवा. त्यानंतर महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यात माझ्याकडून कोणतीही भांडणे नव्हतीच. होती, तर मी आजच ती मिटवून टाकली, असे ते म्हणाले. यावरुन राजसाहेब आणि उध्दवजी एकत्र येण्याची शक्यता बळावली आहे. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते जी चर्चा गेल्या काही वर्षांपासून करत आहेत ती आणखी वाढली आहे. राज आणि उध्दव हस्तांदोलन करतानाचा एक जुना फोटो शिवसेनेने सोशल मीडियावर पोस्टही केला आहे. त्यातून उध्दव ठाकरे हेही तितकेच सकारात्मक असल्याचा संदेश दिला गेला आहे. दोन्ही पक्ष राजकीय पटलावर हतबल झाल्यासारखे दिसत असल्याने त्यांना एकमेकांची गरज वाटतही असेल. दोन्ही नेते एकत्र येण्याची चर्चा केवळ मीडियात सुरू आहे. अशा चर्चा यापूर्वी अनेकदा होऊनही दोघे एकत्र आले नाहीत आणि येऊ शकले नाहीत. एकत्र येण्यासाठी बोलणी होणे तितकेच आवश्यक आहे. जोपर्यंत बोलणी होत नाही किंवा दोन्ही बाजूंकडून याच विषयांवर प्रतिनिधींमार्फत संवाद होत नाही तोपर्यंत ही चर्चाच राहणार आहे. दोन्ही बाजूंच्या काही अटी आणि शर्तीही असू शकतात. राज ठाकरे यांनी नंतर भाजपा, शिंदेंच्या शिवसेनेशी ऊठबैस करू नये, अशी उध्दव ठाकरे यांची अपेक्षा असेल तर उध्दव ठाकरे यांनीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी उठबैस करू नये, अशी अपेक्षा राज ठाकरे यांची असू शकते. दोन्ही नेते एकत्र येण्याच्या शक्यतेवर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ते दोघे एकत्र आले, तर त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काय ते ठरवावे, असे भाजपा, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या नेत्याकडून सांगण्यात आले. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ते दोघे एकत्र आले, तर सर्वांत मोठा धोका आपल्याला आणि आपल्या पक्षाला पोहचू शकतो, याची जाणीव एकनाथ शिंदे यांना असल्याने त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले. दोन नेते एकत्र आले, तर महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलू शकते. चर्चा होत राहणार, पण बोलणी कधी होणार? हाच महत्वाचा प्रश्न आहे.