मनमाडला प्रभागरचनेबाबत कहीं खुशी कहीं गम

नगरपालिकेच्या 17 प्रभागांची रचना जाहीर; 31 ऑगस्टपर्यंत हरकती

मनमाड : प्रतिनिधी
गेल्या अनेक वर्षांपासून डोळे लावून बसलेल्या माजी नगरसेवकांसह भावी नगरसेवकांच्या स्वप्नपूर्तीकडे वाटचाल सुरू झाली असून, राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे आज मनमाड नगरपालिकेतर्फे एकूण 17 प्रभागांची प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली आहे. या प्रारूप प्रभागरचनेवर 31 ऑगस्टपर्यंत हरकती घेण्याची मुदत देण्यात आली आहे. प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभाग रचनेनुसार अनेक नगरसेवकांचे चेहरे खुले आहेत, तर अनेक भावी नगरसेवकांचा हिरमोड झाल्याचे बघावयास मिळाले. यामुळे काही खुशी तो काही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे
मनमाड नगरपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. त्यांनतर ओबीसी आरक्षण आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे निवडणूक स्थगित केल्या होत्या तेव्हापासून माजी नगरसेवक तसेच भावी नगरसेवकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे डोळे लावले होते. आज तब्बल चार वर्षांनंतर त्यांचे स्वप्न पूर्णत्वास येताना दिसत आहे. जून महिन्यात सुप्रीम कोर्टाने येत्या चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला काढले होते. या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मनमाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक शेषराव चौधरी यांनी मनमाड नगरपालिकेच्या प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केल्या असून, या प्रभागरचनेत थोड्याफार प्रमाणात बदल केल्याचे त्यांनी सांगितले. सदस्यसंख्या वाढल्याने हा बदल करावा लागला असून, पूर्वी मनमाड नगरपालिकेची सदस्यसंख्या ही 31 होती, आता यात दोन सदस्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यानुसार आता 17 प्रभागांत 33 नगरसेवक निवडून देण्याचे आहे. सर्वात शेवटचा प्रभाग हा 3 चा असेल, बाकी सर्व प्रभाग हे 2 सदस्यांचे असतील, असेही चौधरी यांनी सांगितले नगररचना विभागाचे अजहर शेख व त्यांच्या टीमने सर्व प्रभागरचना तयार केल्या आहेत.

भावी नगरसेवक लागले तयारीला…?

गेल्या चार ते पाच वर्षांपासून निवडणूक लागतील या आशेवर असलेले अनेक भावी नगरसेवक माजी नगरसेवक कार्यक्रमावर व कार्यकर्त्यांवर मोठ्या प्रमाणात खर्च करत होते. मात्र निवडणूक काही लागत नसल्याने खर्च करून करून पार कंबरडे मोडले असेही ते बोलून दाखवत होते. आजच्या या प्रभागरचनेच्या निमित्ताने सर्वच भावी नगरसेवक कामाला लागले आहेत. आता आगामी काळात येणार्‍या गणेशोत्सव, नवरात्र यासह दिवाळीच्या निमित्ताने आता खर्च करण्याची तयारी सुरू केली असून, एकप्रकारे भावी नगरसेवक तयारीला लागले आहेत.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *