इंदिरानगर कलानगर चौकात बसथांबा नसल्याने विद्यार्थी, प्रवासी त्रस्त

नाशिक : प्रतिनिधी
वडाळा ते पाथर्डी रस्त्यावरील कलानगर चौकात बसथांब्याअभावी भरउन्हात विद्यार्थी व प्रवाशांना उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागत आहे. असुविधेमुळे विद्यार्थी, प्रवाशांची गैरसोय होत असून, तातडीने बसथांब्याची व्यवस्था करण्याची मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे.
कलानगर परिसरातून माध्यमिक व महाविद्यालय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मोठ्या संख्येने रोज ये-जा करतात. नोकरदारसुद्धा रोज शहरात ये-जा करतात. त्यासाठी सिटीलिंक बससेवेचा पर्याय परवडणारा असल्याने मोठ्या संख्येने सिटीलिंकला मागणी आहे. मात्र, कलानगर सिग्नललगत शहरात जाताना बसथांबा करण्यात आला होता. एक वर्षापूर्वी दुरवस्था झाल्याचे कारण दाखवून हा बसथांबा कोणातरी राजकीय नेत्याच्या आदेशाने बांधकामाचा शो जातो म्हणून काढण्यात आला आहे.
परंतु, अद्यापपर्यंत नवीन बसथांबा उभारण्यात आला नसल्याने प्रवाशांना भरउन्हात ताटकळत उभे राहावे लागत आहे.
शिवाय, बसथांबाच नसल्याने पाथर्डी गावाकडून येणार्‍या बसेस सुसाट निघून जातात आणि प्रवासी, विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याच्या प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *