कांद्याची आवक घटली; दरात घसरण सुरूच

कांद्याची आवक घटली; दरात घसरण सुरूच

कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल

लासलगाव:  समीर पठाण

कांद्याचे भाव सतत कोसळत असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आले आहे.गेल्या महिन्याभरापासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कमी झाल्याने आवकही मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे.लासलगाव बाजार समितीत सोमवारी उन्हाळी
कांद्याची अंदाजे ५ हजार क्विंटल आवक झाली तर बाजारभाव कमीत कमी ५०० रु,जास्तीत जास्त १२५२ रू तर सरासरी ९७० रुपये प्रति क्विंटल भाव होता.दिवसेंदिवस उन्हाळी कांद्याची बाजार समितीतील आवक कमी होत चालली असताना भावही कमी मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.

सद्या नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.आधी साठवण केलेल्या कांद्याला अधिक भाव मिळेल,अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.दिवाळीनंतर मात्र बाजारात कांद्याचा भाव वाढला होता.२००० ते २९०० रुपयांपर्यंत कांदा विकला गेला.मात्र काही दिवसानंतर चित्र बदलले.भाव कमी होत गेला आणि त्या प्रमाणात आवकही घटली.दिवाळीनंतर तेजीत आलेल्या कांद्याच्या भावात गेल्या १५ दिवसांपासून हजार ते सतराशे रुपयांनी घसरण झाली आहे.

दिवाळीनंतर कांद्याला चांगला भाव मिळेल या आशेने साठवून ठेवलेला जुना कांदा शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणला.आता हा कांदा संपू लागला आहे.आता नवीन कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे.या महिनाभरातच कांद्याची सुमारे १७०० रुपये घसरण झाल्याने कांदा उत्पादक शेतकयांना मोठा फटका बसत आहे

 

कांद्याची आवक व भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांसमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे.एकतर हवामान साथ देत नाही.त्यात कधी अतिवृष्टी तर कधी अवकाळी पावसाने पीक मातीमोल होते.जेव्हा पीक येते,तेव्हा भाव नसतो.आता तर माल असूनही त्याला भाव नाही.त्यामुळे जगायचे तरी कसे ? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.
————————————————————

 

जुन्या कांद्याला मागणी कमी आहे आणि भावही कमी आहे.ग्राहक नवीन कांद्याला पसंती देतात.त्यामुळेच कांद्याचे भाव व विक्री मंदावली गेली आहे.आता नवीन लाल कांदा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे
भविष्यात परिस्थिती सुधारेल.

नरेंद्र वाढवणे,सचिव
लासलगाव बाजार समिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *