भावात घसरण झाल्याने लासलगावला लिलाव पाडला बंद

महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक

लासलगाव प्रतिनिधी

कांद्याच्या भावात सातत्याने घसरण होत असल्याच्या कारणावरून संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोमवारी सकाळी लासलगाव बाजार समितीतील अर्धा तास कांदा लिलाव बंद पाडले.कांद्याला तीस रुपये किलो भाव द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली असून मागणी मान्य न झाल्यास मंत्रालयावर मोर्चा काढून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी शेतकऱ्यांच्या वतीने दिला आहे.

सोमवारी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात कांदा लिलावास सुरुवात झाली होती मात्र कांद्याला दहा ते बारा रुपये किलो भाव मिळत असल्याने सतत कांद्याच्या भावात होणाऱ्या घसरणीमुळे
संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव अर्धा तास बंद पाडले.कांद्याला तीस रुपये किलो भाव द्यावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने या वेळी करण्यात आली.दिवाळीनंतर कांदा बाजारात लिलाव सुरू झाल्यावर भाव अपेक्षेप्रमाणे वाढले.१ नोव्हेंबर २२ रोजी कांद्याला सरासरी २९०० रुपये प्रतिक्विंटल तर किमान १००० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता.मात्र गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून कांद्याला किमान ५०० रुपये तर सरासरी १४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत असल्यामुळे सरासरी भावात १०७० रुपयांची घट झाली आहे.या भावात उत्पादन खर्चही भरून निघणार नसल्याने शेतकरी संतप्त झाले व त्यांनी लिलाव बंद पाडले.कमी भाव मिळत असल्याच्या निषेधार्थ घोषणाबाजीही या वेळी करण्यात आली.इतर राज्यांमध्ये स्थानिक कांदा मोठ्या प्रमाणात आल्याने कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने कांद्याचे भावात घसरण होत असल्याची माहिती कांदा व्यापारी यांनी दिली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *