पुरामुळे शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली
नाशिक: प्रतिनिधी
संततधार पावसामुळे गोदावरी नदीला आलेल्या पूरामुळे निफाड तालुक्यातील गोदाकाठचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. करंजगावसह परिसरातील शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. करंजगाव येथील ऐतिहासिक शिवकालीन जिजामाता गढीलाही गोदावरीच्या पुराच्या पाण्याच्या वेढा पडला आहे. तसेच करंजगावचे अतिप्राचीन सिद्धेश्वर मंदिर, खंडेराव महाराज मंदिर, पाणीपुरवठा करणारी विहीर व मुस्लिम कब्रस्थान पूर्णतः पाण्याखाली गेले आहे.
करंजगाव-कोठुरे पुलाला अडकलेल्या पानवेलीमुळे प्रचंड प्रमाणात पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने पिके पाण्याखाली गेली आहे. करंजगावसह कोठुरे, शिंगवे, चापडगाव, भुसे, मांजरगाव, कुरडगाव, काथरगाव, चाटोरी, सायखेडा येथील गोदातीरी असणारी सोयाबीन, ऊस, भाजीपाला ही पिके पुराच्या पाण्यात गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. करंजगाव-कोठुरे पुलावर पाणी असल्याने गोदाकाठच्या वीस गावांचा निफाडशी संपर्क तुटला आहे. माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांनी पाटबंधारे विभागाशी संपर्क केल्यानंतर करंजगाव पुलाला अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचे काम प्रशासनाने सुरू केले, त्यामुळे काही प्रमाणात पाण्याचा फुगवटा कमी झाला. लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे वारंवार पानवेली काढण्याची मागणी करूनही दुर्लक्ष केल्यानेच शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्याचा आरोप खंडू बोडके-पाटील यांनी केला आहे.
निफाड तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवणार आहे. लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पानवेली वेळीच न काढल्याने गोदावरीच्या पुरामुळेही गोदाकाठची शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे शासनाने याची त्वरित दखल घेऊन सर्वच शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी बी-बियाणे मोफत उपलब्ध करून देऊन दिलासा द्यावा.
.खंडू बोडके-पाटील
सदस्य : महाराष्ट्र राज्य बियाणे उपसमिती, मुंबई
निफाड तालुक्यामधील करंजगाव चापडगाव मांजरगाव कोरडगाव शेकडो हेक्टर जमीन पाण्याखाली गेलेली आहे लोकांनी सोयाबीन मग का उस जनावरांचा चारा हे सगळं पुरामध्ये वाहून गेलेले आहे याची शासनाने दखल घेऊन सर्व शेतकऱ्यांना बियाणे द्यावे