एकीकडे करपा,दुसरीकडे परतीच्या पावसाचा तडाखा
भात शेतीचे नुकसान, शेतकरी चिंतेत
धामणगांव : सुनील गाढवे
पावसाचे माहेरघर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात या वर्षी समाधानकारक पाऊस झाला असून,भात पीकही दमदार आले आहे. मात्र, गेल्या दहा-बारा दिवसांपासून संततधारेसह मुसळधार पाऊस कोसळत असल्याने भात पिकावर जिवाणूजन्य व बुरशीजन्य या करपा रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अशातच शनिवारी सायंकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अडचणीत सापडली आहे.
इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेल्या भात शेतीबरोबरच सोयाबीन, उडिदाचे नुकसान झाले आहे.ऐन मोसमात पोषक आणि अनुकूल वातावरणात मुबलक प्रमाणात वेळच्यावेळी झालेल्या पर्जन्यवृष्टीमूळे यंदा भातशेती जोमात पिकली होती.शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.परंतु ऐन दिवाळी सणासुधीच्या मोसमात सोंगणीवर आलेल्या भात शेतीवर ढगाळ वातावरण,पावसामुळे इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव मोर, धामणी, बेलगाव, धामणगाव, टाकेद, अडसरे, गंभीरवाडी, सोनोशी, आंबेवाडी, खेड, इंदोरे, खडकेद, वासाळी, बारीशिंगवे, बांबळेवाडी या भागातील भातशेती नुकसान झालेआहे.या अवकाळी पावसामुळे या परिसरातील भातशेतीचे नुकसान झाल्याने शेतकर्यांचे तोंडचे पाणी पळाले आहे. या ढगाळ वातावरणामुळे आणि सततच्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झालेआहे. अनेक शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत आहे.
तसेच ढगाळ वातावरणामुळे भातशेतीच्या गरे, हाळे, इंद्रायणी, आर २४, वाय एस आर, १००८ , सोनम, रूपाली, पूनम,अक्षदा व सोनाली या भाताच्या वाणांच्या प्रजातीवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला असून भातासह,उडीद,सोयाबीन,वरई,खुरासनी,आदी पिके धोक्यात आली आहे.तरी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी अशी या परिसरातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे.नुकसान झालेल्या भात शेतीचे प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करावे अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे.
नुकसान भरपाईला निवडणुकीची आचारसंहिता नको
इगतपुरी तालुक्यात यंदा भात लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असून, २९ हजार २०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भाताची लागवड झाली आहे.अशातच जोमात असलेले भात पिकाचे उत्पन्न निसर्ग हिरावून घेत आहे.
*प्रतिक्रिया*
तापमानात अचानक वाढ व उन्हाची तीव्रता वाढल्याने करपा रोगांचा प्रादुर्भाव झाला असून यामुळे त्यात अवकाळी पावसाने भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी नाही तर निवडणुकीच्या आचारसंहितेत शेतकऱ्यांना नुकसानीला आचारसंहिचे निर्बंध नको.
*वसंत भोसले*
शेतकरी धामणी