आदरणीय संस्थापिका प्राचार्या, आद्य मराठी विभागप्रमुख आदरणीय स्व. डॉ. सौ. सुनंदा गोसावी यांचा आज प्रथम स्मृतिदिन. त्यांच्या विविध पैलूंचे दर्शन घडविणारा कस्तूरी स्मरणिकास्वरूप ग्रंथ आज प्रकाशित होतो आहे.
आई माझा गुरू । आई कल्पतरू
सौख्याचा सागरू । आई माझी
या ओळी ओठांवर आल्याशिवाय राहत नाहीत, कारण त्या केवळ संस्थापक प्राचार्या नव्हत्या किंवा केवळ संस्थेच्या पदाधिकाऱ्याची पत्नी नव्हत्या तर अनेकांच्या गुरू, माउली होत्या. आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी त्या काळाच्या पडद्याआड गेल्या. प्रथम त्यांच्या स्मृतींना मी शतशः नमन करते. डॉ. सौ. सुनंदा गोसावी या लौकिकार्थाने या जगात नसल्या तरी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने त्या चिरकाल स्मरणात राहतील इतकं प्रचंड काम त्यांनी करून ठेवलं आहे. म्हणूनच त्यांनी लावलेल्या, मायेने जोपासलेल्या या लहानश्या रोपट्याचे रूपांतर आज विशाल वृक्षात झालेले आहे, ज्याची मधुर फळे पुढील अनेक पिढ्या चाखत आहेत.
५ ऑक्टोबर १९३७ रोजी बारामती येथील मध्यमवर्गीय उंडे कुटुंबात शरयूचा जन्म झाला. तर २८ जून १९५९ रोजी फलटण येथील एकनाथवंशीय गोसावी कुटुंबातील श्री. मोरेश्वर यांचेशी तिचा विवाह संपन्न झाला आणि ती सौ. सुनंदा गोसावी नावाने गोसावी कुटुंबात वावरू लागली. सुरुवातीची काही वर्षे तिने मुलांचे पालनपोषण करण्यावर, कुटुंबातील माणसांना हवं नको ते पाहण्यावर भर दिला. परंतु तिच्यातील अभ्यासक तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे हळूहळू तिने स्वतःचे राहिलेले शिक्षण पूर्ण केले. मराठी विषयात बी.ए., एम.ए. पीएच.डी, संगीत विशारद असे अनेक टप्पे अवघ्या १० वर्षातच पार केले. संत साहित्याचे गाढे अभ्यासक ‘प्रा. गंगाधर बाळकृष्ण सरदार यांच्या वाङ्मयाचा चिकित्सक अभ्यास’ हा विषय घेऊन पुणे विद्यापीठातून विद्यावाचस्पती पदवी तिने घेतली. सौ. सुनंदा गोसावी आता डॉ. सौ. सुनंदा गोसावी म्हणून सर्वांना सुपरिचित झाल्या. पण इतकेच करून त्या थांबल्या नाहीत.
१९७५ पासून त्या जिज्ञासा महाविद्यालयात अध्यापन करू लागल्या. तो काळ स्त्रियांसाठी खडतर असा काळ होता. सर्व स्तरांतून शिक्षणाची निकड पोहोचली नसल्याने घरोघरी जाऊन, स्त्रियांशी संवाद साधून त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्याचे कामही त्यांनी केले. सुरुवातीची अनेक वर्षे त्यांनी विनामोबदला अध्यापनाचे काम केले. महिलांना आपल्या जबाबदाऱ्या सांभाळून शिक्षण घेता यावे यासाठी जिज्ञासाचे हे वर्ग सायंकाळी ६ ते ८ या वेळात घेतले जाऊ लागले. हळूहळू स्त्रीवर्ग शिक्षणाकडे वळू लागला. त्यांच्या मनात सुनंदाताईंविषयी आस्था निर्माण होऊ लागली. जिज्ञासाच्या मानद संचालकपदी असताना त्यांना स्त्रियांसाठी अजून काहीतरी भरीव करावे अशी इच्छा होती. त्यांच्या प्रत्यक्ष सहवासात राहिल्यावर त्यांना आत्मनिर्भर करण्याची गरज आहे हे त्यांनी ओळखले होते आणि म्हणूनच स्त्री सक्षमीकरणाचा वसा त्यांनी घेतला. नाशिकमध्ये महिलांसाठी स्वतंत्र महाविद्यालय असावे हा मानस त्यांनी आदरणीय सर डॉ. मो.स. गोसावी यांचेकडे अर्थात आपल्या पतीकडे बोलून दाखवला. त्यामुळे १९८५ साली एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाची पायाभरणी झाली. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठाशी संलग्न झालेल्या या महाविद्यालयाची प्राचार्या म्हणून २८ जून १९८५ रोजी डॉ. सौ. सुनंदा गोसावी यांची नियुक्ती झाली. आरंभीच्या काळात हे वर्ग बीवायके कॉलेजच्या मागील इमारतीत सुरू झाले. नंतर क्षत्रिय कुलकर्णी, बाबूभाई कपाडिया यांच्या दातृत्वामुळे आज आहे ती नवीन इमारत उभी राहिली. शिवाय कलाशाखेबरोबरच गृहविज्ञान, वाणिज्य, ललित कला यांचेही पदवी स्तरावरील वर्ग येथे सुरू झाले. उत्तम व्यवस्थापन ही सुगृहिणीची खरी ओळख असते, त्यामुळे या व्यवस्थापनाचा लाभ जेव्हा प्रशासकीय पातळीवर होतो तेव्हा ते सकुशल नेतृत्व ठरते. उत्तर महाराष्ट्रातील महिला शिक्षण व सबलीकरणाच्या या अपूर्व कामगिरीमुळे डॉ. सौ. सुनंदा गोसावी हे नाव उत्तम प्रशासक, उत्तम अनुशासक म्हणून सगळ्यांसमोर आले. मराठी भाषेवर त्यांचे अमाप प्रेम होते. एसएमआरके महिला महाविद्यालयात मराठी विभाग सुरू झाला तेव्हा पहिले विभागप्रमुखपद त्यांनी उत्तमरित्या भूषविले. ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत महन्मधूर ते ते’ या उक्तीला सार्थ ठरवत सदोदित उत्तमाचा ध्यास आणि त्यासाठीच श्वास घेत त्यांची मार्गक्रमणा सुरू राहिली. म्हणूनच १९८७ साली जेव्हा कुसुमाग्रजांना ज्ञानपीठ हा सर्वोच्च मानाचा पुरस्कार मिळाला तेव्हा त्यांना मानवंदना म्हणून मराठी विभागातर्फे त्यांच्या साहित्यावर आधारित प्रदर्शन भरवले गेले. विद्यार्थिनींना अशा मोठमोठ्या साहित्यिकांची ओळख व्हावी, त्यांनी वाचनाकडे वळावे हा हेतू त्यामागे होता.
१९८५ -८६ साली मराठी कथा आणि कविता या वाङ्मय प्रकारावर विस्तृतपणे प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन त्यांनी केले. स.गं. मालशे, भीमराव कुलकर्णी, शिरीष गोपाळ देशपांडे, अंजली सोमण अशी मराठी साहित्य प्रांतातली दिग्गज मंडळी या चर्चासत्रात हजर होती. या चर्चेतूनच आकारास आलेली मराठी कथा : रंग, तरंग, अंतरंग तसेच मराठी कविता : रंग, तरंग, अंतरंग (१९८६) ही दोन पुस्तके डॉ. सौ. सुनंदाताई यांच्या पुढाकाराने संपादित झाली. प्रत्येक मराठी भाषेच्या अभ्यासकाला साहित्याचा इतिहास, साहित्यप्रकार व त्यातील स्थित्यंतरे समजून घेण्यासाठी ही पुस्तके आजही दिशादर्शक ठरतात. तसेच त्यांनी आपल्या पीएच.डी प्रबंधावर आधारित ‘प्रबोधनाचे प्रवक्ते’ (१९८५) या ग्रंथाचे लेखन केले. त्या केवळ मराठी साहित्याच्या अभ्यासक होत्या असे नव्हे तर कुशल गृहिणी, उत्तम नेतृत्व, आदर्श संघटक, प्रशासक याशिवाय आध्यात्मिकतेला वैज्ञानिकतेची जोड देत आत्मानंद कसा मिळवता येईल, तणावावर मात कशी करता येईल यावर भर देणाऱ्याही होत्या. म्हणूनच ‘अनुबंध’ (१९७९), ‘स्वानंदप्रदीप’, ‘विवाहसंस्कार’, ‘माउलीचा प्रसाद’ असे वैविध्यपूर्ण ग्रंथांचे लेखनही त्यांनी केले. त्यांनी लिहिलेल्या ‘साहित्य आणि समाज’ (१९९३) या पुस्तकाकडे मराठी साहित्यातील एक मैलाचा दगड म्हणून पाहता येते. साध्या, सोप्या, रसाळ शैलीत लेखन, संपादन व समीक्षा ही त्यांची वैशिष्ट्ये होत. म्हणूनच त्यांच्या भरीव कामगिरीबद्दल दिल्ली येथील आय.बी.एस संस्थेकडून आदर्श महिला पुरस्कार, गोखले एज्युकेशन सोसायटीचा आदर्श प्राध्यापिका पुरस्कार, इंडिया इंटरनॅशनल सोसायटीचा शिक्षणरत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी त्यांना गौरवले गेले.
घर, महाविद्यालय, संस्था यापलीकडे जाऊन सामाजिक कार्यातही त्या सदैव अग्रेसर होत्या. महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांची दिनचर्या सांभाळून सायंकाळचे वर्ग घेत दरवर्षी ३०० महिलांना त्यांनी एस.एन.डी.टी. विद्यापीठामार्फत बहिस्थ शिक्षणाद्वारे मार्गदर्शन केले. महाविद्यालयात केवळ वाणिज्य, गृहविज्ञान, कलाशाखा सुरू करून त्या थांबल्या नाहीत तर संगीत आणि चित्र आदी कलांमुळे जगण्याला बहर येतो, यासाठी त्यांनी संगीत तसेच चित्रकला विभाग सुरू केला. विविध मान्यवरांना महाविद्यालयात आमंत्रित करून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी सातत्याने विविध प्रकारचे उपक्रम आयोजित करून त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून दिले. विषयांचे वैविध्य असेल तर विद्यार्थी शिकण्यातून अधिक आनंद घेतो या हेतूने तसेच काळाशी हातमिळवणी करण्यासाठी त्यांनी संगणक, आहारशास्त्र, मानवविकास, वस्त्रोद्योग, कुटुंबसंपदा व्यवस्थापन अशा विविध विषयांचे अध्यापन महाविद्यालयात सुरू केले. समाजातील ज्या महिलांच्या वाट्याला कौटुंबिक दुःखे, नैराश्य आहे अशांना त्यातून बाहेर काढण्यासाठी, वाट्याला आलेल्या प्रतिकूल परिस्थितीवर मात करता यावी यासाठी स्वानंद भजनी मंडळाची स्थापना केली. सातत्याने १० वर्षे सामूहिक सत्संगाचे आयोजन तसेच बालसंस्कार केंद्राद्वारे बालिकांना रूद्रपठण, गीतापाठ यांचे धडे द्यायला सुरुवात केली. उच्चार चांगले असले तर वाणीही कानाला गोड वाटते या हेतून भजनी मंडळातील महिलांच्या भजनगायनाकडे, स्तोत्रपठणाकडे, शब्दोच्चारासह प्रामुख्याने लक्ष दिले. चिन्मय मिशनच्या माध्यमातून १० वर्षे नियमित अभ्यासवर्ग घेत श्रीसूक्तपठण केंद्रात आपले योगदान दिले.
आधुनिक काळात मानवी जीवन हे अधिक नैराश्याने, तणावाने ग्रासलेले आहे. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून त्यांनी पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठानच्या वतीने ‘संस्काराचे विद्यापीठ’ या माध्यमातून सुमारे ३०० समाज सेवाव्रती दांपत्यांसाठी अनुबंधी परिवाराची निर्मिती केली, त्यांचा गुणगौरव केला. स्वास्थ्यपूर्ण जीवन व समाजप्रबोधन अशा आध्यात्मिक (सात्त्विक प्रकाशन) विषयाच्या लेखनात त्यांनी भरीव योगदान दिले. १९७५ साली स्वाध्याय परिवारातील योगदानासाठीही शास्त्रीजींकडून त्यांचा सन्मान झाला.
स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी जगणाऱ्या सेवाव्रतीचे जीवन सोपे नसते. आयुष्यातील काही मोजकेच क्षण त्यांच्या वाट्याला असे येतात की ज्यात वैयक्तिक सुख-दुःखे, पारिवारिक नाती, सहवास याकडे लक्ष देता येते. भ्रमंतीतूनही जगाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी प्राप्त होते. त्यामुळे भारतातील सर्व महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना, निसर्गरम्य स्थळांना भेटी देत त्यांनी परदेशप्रवासही केला. भारतातील नामांकित विद्यापीठात वार्षिक अधिवेशनात त्या हजर राहिल्या. तसेच परदेशात गेल्यावर सिडनी, मेलबर्न, न्यू. साऊथवेल्स इ. ऑस्ट्रेलियातील विद्यापीठांनाही त्यांनी भेट दिली. तेथे भेट दिल्यावर आपल्या महाविद्यालयातही कोणकोणत्या बाबी अद्ययावत करण्याची गरज आहे त्या ओळखून त्यांनी महाविद्यालयात त्यानुसार आवश्यक ते बदल केले. पीएच.डी करून आपल्या स्टाफने संशोधन क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे, यावर त्यांनी भर दिला.
पतीला कुटुंबाकडे पाहण्यासाठी अजिबात वेळ नसताना त्याला खंबीरपणे साथ देत, स्वतःचं अस्तित्व जपत ६२ वर्षांचे सुरेल सहजीवन, ८३ वर्षांचे आयुर्मान कुठल्याही मीपणाचे वर्चस्व न येऊ देता एखाद्या साध्वीसमान विरागी वृत्तीने जगणं ही निश्चितच सोपी गोष्ट नव्हती. म्हणूनच त्या रणरागिणी होत्या. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांना देवाज्ञा झाली. यशस्वीरित्या प्रशासकाची झूल उतरवून ती निवृत्तीनंतर जशा त्या संसाराकडे वळल्या तशाच संसारातही विरागी वृत्तीने राहून आध्यात्मिक कार्यात स्वतःसह समाजाला उन्नत करत गेल्या, त्यांच्या व्यक्तित्वाचे विविध पैलू ‘कस्तूरी’ या स्मरणिकारूपी ग्रंथात आपणास पहावयास मिळतीलच. एक आई म्हणून मा. डॉ. दीप्ती देशपांडे यांच्या श्रद्धेयमधून त्या दिसल्या मात्र एक उत्तम माणूस म्हणून, एक संन्यस्त सेवाव्रती, ज्ञानव्रती, सव्यसाची, गुणग्राहक, माउलीस्वरूप, प्रेरणादायी म्हणून त्यांच्या नाना पैलूंचं दर्शन त्यांच्या सहवासात आलेल्या अनेक समकालीन, आप्तजन, स्वकीयांसह स्नेहीजनांनी या विविध लेखांतून घडवलं आहे. कांचनमृगाला सातत्याने ज्या कस्तूरीचा गंध वेडावतो, म्हणून तो त्यापाठीमागे धावत सुटतो परंतु तो गंध दुसरीकडे कुठेही नसून त्याच्या नाभीस्थानीच आहे हे त्याला शेवटापर्यंत कळत नाही. त्याचे जीवन संपुष्टात आले तरी ती कस्तूरी चिरकाल जशी दरवळ मागे ठेवून जाते तशाच स्व. डॉ. सौ. सुनंदाताईंच्या स्मृती, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या खुणा, दरवळ चिरंतन राहतील व पुढच्या अनेक पिढ्यांना ज्ञानाचा लाभ देतील अशी खात्री वाटते. आपणास हा ग्रंथ त्यांच्या कार्याचा, त्यांच्या व्यक्तिमत्वाचा सखोल, सर्वांगाने परिचय करून देईल अशी खात्री आहे.
डॉ. सायली आचार्य
प्राध्यापिका, मराठी विभाग
एस.एम.आर.के. बी.के.ए.के. महिला महाविद्यालय, नाशिक