स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेले नाशिक शहर या आठवड्यात चर्चेत आले ते खुनांच्या घटनांनी आणि लाचखोरीने! 72 तासांत एक- दोन नव्हे तर तब्बल पाच खून झाले. कायदा-सुव्यवस्थेला एज्ञीकडे असे आव्हान मिळत असतानाच, दुसरीकडे हे सर्व पाहण्याची… सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ती खाकी लाचखोरीने डागाळली. या दोन्ही गोष्टी परस्परांना पूरक अशाच आहेत. कायदा-सुव्यवस्था चोख राखायचे सोडून जनतेच्या रक्षणाचा विडा घेतलेली ही मंडळी जर लाचखोरीत अशी मश्गूल होत असेल तर कायद्याचे तीन तेरा वाजणारच ना!
पंचवटीत वाद मिटविण्यासाठी गेलेल्या यश गांगुर्डे याला हकनाक जीव गमवावा लागला. टोळीयुद्धातील वर्चस्ववादातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. तर पंचवटीतच मुलगा हट्टीपणा करतो, घरात नीट वागत नाही, त्यामुळे वैतागलेल्या जगदीश जाधव या पित्याने आपल्या पोटच्या पोराचा गळा दाबला आणि नंतर स्वत:ही मृत्यूला सामोरे गेला. तर माडसांगवीत पत्नीशी किरकोळ वाद होऊन ज्याच्या सोबत सात फेरे घेतले त्या पतीनेच फावडे डोक्यात टाकून पत्नीचा जीव घेतला. महादेवपूर या नाशिक तालुक्यात झालेला खून हा अनैतिक संबंधांचा बळी आहे. गंगापूररोडवरील आनंदवली शिवारात फार्मसीच्या विद्यार्थ्याचा खून हा केवळ चुगली करतो इतक्या फुटकळ कारणातून झाला आहे. पौर्णिमा स्टॉप भागात झालेला खून हा मद्यपींशी झालेल्या तत्कालीक कारणातून घडला आहे. या सर्व गुन्ह्यांचा तसे पाहू जाता एकमेकांशी दुरान्वयानेही संबंध नसला तरी गुन्हे घडले हे सत्य नाकारून चालणार नाही. कौटुंबिक, प्रेमप्रकरण आणि टोळीचे वर्चस्ववाद ही कारणे असली तरी मुळात गुन्हेगारी टोळ्यांचा उच्छांद गेल्या काही वर्षांत पोलीस खात्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.
नाशिक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असताना दीपककुमार पांडेय यांनी गुन्हेगारांच्या कारवाया मोडीत काढण्यासाठी मोक्कासारखी कारवाईवर भर दिला होता. तरीही त्यांच्या काळात गुन्हेगारी नव्हतीच असे नाही. तेव्हाही खुनाच्या, चोर्या, दरोडे यासारख्या घटना घडतच होत्या. पांडेय गेले आणि नाशिक पोलीस आयुक्तपदाची सूत्रे जयंत नाईकनवरे यांनी हाती घेतली. सध्या ते आढावा घेत आहेत. पण त्यांना लवकरच याबाबत काही तरी ठोस उपाययोजना करण्यासाठी पाऊले उचलावी लागणार आहेत. गेल्या काही दिवसांत तर शहरात गुन्हेगारीने कळस गाठला आहे. चेन स्नॅचर करणार्यांची मोठी टोळी सध्या शहरात कार्यरत झाली आहे. डोळ्याचे पाते लवते न लवते तोच चोर सौभाग्याचे लेणे ओरबाडून नेत आहेत.
नाशिक आयुक्तालय हद्दीत दररोज किमान पाच-सात घटना तरी चेन स्नॅचिंगच्या घडत आहेत. दुचाकींच्या बाबतीतही काहीशी अशीच स्थिती आहे. दुकानाबाहेर, मॉलबाहेर अथवा मंगल कार्यालयाबाहेर लावलेली तुमची दुचाकी परत येईपर्यंत सुरक्षित राहिली तर तुम्ही नशीबवान. अशी सगळी परिस्थिती आहे. नाशिकरोडला पोलीस ठाण्याच्या समोरून आतापर्यंत चार ते पाच दुचाकी चोरीला गेल्या आहेत. चोरट्यांची एवढी हिमत वाढली आहे की, भरदिवसा डोळ्यादेखत चोर्या करीत असतानाही कायद्याचा धाक जराही त्यांना जाणवत नाही. खुनासारख्या घटना तर अगदी क्षुल्लक वाटाव्यात अशा पद्धतीने एखाद्याचा जीव घेत आहेत.
पंचवटीत वर्चस्ववादातून यापूर्वीही अनेकदा खुनाच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, याच गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यापासून तर थेट एन्काऊंटर करण्यापर्यंतचा लौकिक यापूर्वी नाशिकमध्ये असलेल्या पोलीस अधिकार्यांनी मिळविलेला आहे. त्यातून गुन्हेगारीला काही प्रमाणात किमान आळा तरी बसला होता. अवैधधंदे, रोलेट जुगार आणि वर्चस्ववाद यातून गुन्हेगारांची पिलावळ वळवळ करीत असते. त्याला लगाम घालण्याचे काम पोलीस यंत्रणेला करण्याची गरज असताना पोलीस यंत्रणा मात्र गुन्हे दाबण्यासाठी लाचखोरीचा अवलंब करत असल्याचेही याच आठवड्यात उघड झाले. आडगाव पोलीस ठाण्याचा थेटे नामक कर्मचारी आणि भद्रकाली पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक पवार यांना लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने एकीकडे गुन्हेगारांच्या वाढत्या कारवाया रोखण्यात पोलिसांना अपयश असताना टीका होत असताना, दुसरीकडे पोलीस पैसे खाण्यात गुंग असल्याचा संदेश जनतेत गेला. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी आडगाव पोलीस निरीक्षकांची तातडीने उचलबांगडी केली. मात्र, तोच न्याय भद्रकालीच्या बाबतीत का लावला नाही? यामागचे कोडे उलगडत नाही.
शहरातील या वाढत्या कारवाया रोखण्यास पोलीस कमी पडत आहे की काय? अशी शंका आता सामान्य नागरिकांच्या मनात घर करू पाहत आहेत. गुन्हेगारांना आवर घालण्याऐवजी गुन्हेगारच पोलिसांना कायद्याचे बोला, असे म्हणत लाच पुढे करीत आहेत. आणि बरबटलेली यंत्रणाही ही लाच स्वीकारत असेल तर खाकीची प्रतिमा कशी उजळणार? शंभर कोटींच्या वसुली प्रकरणामुळे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना तुरुंगात जावे लागले.
पंचवटीत पुत्राची हत्या करून पित्याने केलेली आत्महत्या ही जरी कौटुंबिक कारणातून झालेली असली तरी कुटुंबातील नात्यातील वीण भुसभुशीत झाल्याचेच हे द्योतक मानावे लागेल. मुलगा हट्टीपणा करतो म्हणून संतापलेल्या पित्याने हे टोकाचे पाऊल उचलले. ज्या मुलाची हत्या झाली त्याचे वय अवघे सतरा. या वयात मुले हट्टीपणा करतात. घरातील मंडळींचे ऐकत नाही. ही सार्वत्रिक तक्रार आहे. या वयातील मुलांची बुद्धी अल्लड असते. चांगल्या-वाईटाची पारख नसते. अशा मुलांशी प्रेमानेच संवाद साधून त्याच्यावर योग्य संस्कार करावे लागतात. मात्र, जाधव यांनी यापलीकडे जाऊन टोकाचा निर्णय घेतला. कदाचित आज ना उद्या तो सुधारला असता. एवढी परिस्थिती हाताबाहेर जाऊ न देता घरातील मंडळींनीच कुटुंबातील स्नेहभावना जोपासणे गरजेचे आहे. आनंदवलीतील युवकाचा खून हा पण मित्रांनीच केला. त्याचे कारणही तसे फुटकळच. पण हल्लीचे तरुण किती गरम डोक्याचे असतात. हाणामार्या, खून यागोष्टी अतिशय किरकोळ वाटतात.
चाकू, सूरे चालविणे म्हणजे बाए हात का खेल असाच सारा हा मामला होऊन बसला आहे. गुन्हेगारांच्या वाढलेल्या टोळ्या आणि वर्चस्वातून एकमेकांचे मुडदे पाडण्यापर्यंत गेलेली मजल पाहता नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी आता ऍक्शनमोडवर येणे गरजेचे झाले आहे. सद्ररक्षणाय खल निग्रहणाय असे पोलिसांचे ब्रिद आहे. हे ब्रिद सार्थ ठरवण्याबरोबरच सामान्य जनतेचे रक्षण करणे आणि खलांचा बंदोबस्त करण्याचे काम आगामी काळात करावे तर लागणार आहेच. पण पोलिसांतील वाढलेली लाचखोरीवरही त्यांना नजर ठेवावी लागणार आहे.
भागवत उदावंत
कसबे सुकेणे येथील तिडके वस्तीवर जेरबंद झाला बिबट्या कसबेसुकेणे: येथील दशरथ पोपट तिडके यांच्या शेत…
सातपूर: प्रतिनिधी सातपूर एमआयडीसीतील ज्योतीस्ट्रक्चर कंपनीला आज दुपारच्या सुमारास आग लागली . या आगीचे कारण…
लासलगावी कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक ; कांद्याचे लिलाव पाडले बंद लासलगाव:-समीर पठाण केंद्र सरकारने कांद्यावरील…
मनमाड : प्रतिनिधी मराठीत एक म्हण आहे साधु संत येता दारी तोच दसरा दिवाळी ती…
ऑनर किलींग रोखण्यासाठी आता हेल्पलाईन तर गेस्ट हाऊस होणार सेफ होम ! निर्णयाचे अंनिस कडून…
पारा ५.७ अंशावर स्थिर ,द्राक्षबागायतदार अस्थिर! निफाड : प्रतिनिधी शहरासह तालुक्यात थंडीने मुक्काम. वाढविला आहे…