कांदा काढणीसह सुरक्षित ठिकाणी ठेवा : डॉ. डख

आगामी काही दिवसांत अवकाळी, 21 मेनंतर मॉन्सून सक्रिय

लासलगाव : वार्ताहर
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांत अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्‍यांनी थैमान घातले आहे. त्याचा मोठा फटका रब्बी पीक आणि फळबागांना बसला. अनेक शेतकर्‍यांचे लाखांंचे नुकसान झाले. दरम्यान, आगामी काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसाचा धोका असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकर्‍यांमध्ये विशेष विश्वास असलेले हवामानतज्ज्ञ डॉ. पंजाबराव डख यांनी शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचा संदेश दिला आहे. डॉ. डख यांच्या अंदाजानुसार, ज्या शेतकर्‍यांकडे कांदा किंवा हळद पीक आहे, त्यांनी काढणी करून सुरक्षित ठिकाणी ठेवावे. 20 मेच्या दरम्यान राज्यभरात टप्प्याटप्प्याने मॉन्सूनपूर्व पावसाचे आगमन होणार आहे. पावसाळ्यासारखा मुसळधार कोसळणार असल्याचेही डॉ. डख यांनी स्पष्ट केले. यंदाचा मॉन्सूनपूर्व विशेष सक्रिय होणार आहे. पिके झाकून ठेवणे, गोदामांची सुरक्षितता पाहणे, फळबागा व सेंद्रिय पिके विशेषतः धोक्यात येऊ शकतात. यंदा मॉन्सून साधारणतः 8 ते 10 दिवस लवकर दाखल होत आहे. 19 मेपर्यंत तो बेटांवर स्थिर राहील, 21 मेनंतर महाराष्ट्रात मॉन्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. यंदा उशीर न होता वेळेत मॉन्सूनची एन्ट्री होईल, असेही डॉ. डख यांनी म्हटले आहे. हवामान बदल लक्षात घेऊन पेरणीसाठी नियोजन करावे. स्थानिक हवामान खात्याचे अपडेट्स पाहावे.
डॉ. डख यांच्या अंदाजानुसार 21 मेनंतर मॉन्सून सक्रिय होणार आहे. महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी वेळेत योग्य पावले उचलून पिके, बियाणे आणि साधने सुरक्षित ठेवावीत. या सकारात्मक मॉन्सून अंदाजामुळे शेतकर्‍यांत आनंदाचे वातावरण निर्माण होईल. परंतु, त्याचबरोबर अवकाळीच्या तडाख्यापासून स्वतःचे संरक्षण करणेही गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *