आम आदमी पार्टीचे प्रमुख आणि दिल्लीचे समर्थ माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची अखेर न्यायालयाने मोठ्या प्रतीक्षेनंतर निर्दोष सुटका केली आहे. याबाबत कोणालाही काही आश्चर्य वाटलेले नाही. केजरीवाल यांच्या सरकारने जे काम केले ते सत्ताधार्यांना आवडले नाही. त्यामुळे त्यांच्यावर राज्यपालांकरवी आणि इतर सर्व उपलब्ध यंत्रणांच्या माध्यमातून असत्याचे एक जाळे विणण्यात आले होते. त्यातून शुक्रवारी (दि. 27) अखेर त्यांची व त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांची सुटका झाली आहे. सत्ताधारी सरकारी संस्थांचा कसा गैरवापर करतात, हे यातून दिसत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशाच प्रकारे एका जाळ्यात सध्या जागतिक कीर्तीचे संशोधक आणि पर्यावरणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनाही अटकेत ठेवण्यात आले आहे. त्यावरही असाच निकाल येईल, अशी अपेक्षा शुक्रवारी दिवसभर समाजमाध्यमांवरून व्यक्त केली जात आहे.
जगाच्या बाजारात सहसा अशिक्षित लोकांना सुशिक्षित आणि चांगल्या विचारांच्या लोकांबद्दल एक आकस असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला खाली खेचण्यासाठीचे प्रयत्न केले जातात. केजरीवाल आणि सत्ताधारी यांची लढाईही काहीशी अशाच प्रकारची होती. केजरीवाल हे माजी सनदी अधिकारी, सुशिक्षित, देशाच्या प्रश्नांची जाण असलेले व ते सोडवण्यासाठी ज्यांच्याकडे निश्चित अशी योजना आहे अशा प्रकारचे नेते होते. त्यामुळे नायब राज्यपालांसह इतर अनेकांना त्यांच्याविषयी आकस होता. त्यांच्याकडून काहीही करून दिल्लीची सत्ता काबीज करायची आणि आपल्या एखाद्या प्याद्याच्या हाती ती सोपवायची, ही त्यांची मनीषा होती. याची सुरुवात झाली ती एका आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रात दिल्लीचे शिक्षणमंत्री आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावरील एका लेखापासून. हा लेख छापून आल्यानंतर परदेशात दिल्लीच्या शाळांचे मॉडेल फार लोकप्रिय आहे, हे सत्ताधार्यांच्या लक्षात आले. परदेशात ज्या-ज्या भारतीयांना स्वतःची प्रतिष्ठा आहे, ज्यांना परदेशी लोक स्वतःहून कोणत्याही पदाशिवाय विचारतात, त्यांची वाहवा करतात त्यांच्यावर लेख लिहितात. हे काही त्यांना रुचले नाही. दिल्लीची रचना ही इतर राज्यांच्या पेक्षा काहीशी वेगळी आहे. तिथे पोलीस खाते हे केंद्र सरकारच्या अखत्यारित असते. दिल्लीला नायब राज्यपाल असतात व त्यांची निवड केंद्र सरकारच्या मर्जीतल्या व्यक्तींमधून होत असते. साहजिकच कोणत्याही पात्रतेशिवाय झालेल्या या निवडीमुळे त्यांना केंद्र सरकारचा अजेंडा हा राबवावा लागतो. त्यानुसार तत्कालीन नायब राज्यपालांनी दिल्ली राज्य सरकारच्या कामात आडकाठी आणायला सुरुवात केली. वास्तविक हे सारे योजनाबद्ध पद्धतीने होते. आधी आरोग्यसेवेच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या हाती मद्य करआकारणीचा मुद्दा सापडला. केजरीवाल व त्यांचे सरकार आणि मद्य या सार्यांचा व्यवस्थित संबंध जोडण्यासाठी तिथल्या मीडियाने रान उठवले. त्यात त्यांचाही फायदा होता. त्यात भले-भले व ज्यांना याआधी मोठे पत्रकार म्हटले जात असे अशा प्रकारचे काही मध्यस्थ होते. (नाइलाजाने मध्यस्थ हा सभ्य शब्द वापरावा लागत आहे, याची नोंद घ्यावी) या तथाकथित व खरेतर खोट्या मद्य घोटाळ्याची जबरदस्त चौकशी करण्यात आली. तसा आभास तयार करण्यात आला. त्यानंतर मनीष सिसोदिया यांना अटक करण्यात आली. त्यावर दिल्लीच्या पोलिसांना जणू काही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा कोणी गुन्हेगार पकडला आहे अशा प्रकारे आपली पाठ थोपटून घेतली. त्यानंतर एक-एक करून ’आप’चे आमदार आत घेण्यात आले. काही आमदार त्या काळात भाजपाच्या वळचणीला गेल्यामुळे ते लागलीच या घोटाळ्यातून बाहेर आले व शुद्ध झाले. त्यानंतर त्यांचे लक्ष केजरीवाल यांच्यावर गेले. त्यांच्या अवतीभवती मोठे जाळे विणण्यात आले. त्यात केजरीवाल यांच्याच आशीर्वादाने राज्यसभेवर गेलेल्या व फायदा करून घेतलेल्या खासदारही होत्या. आपला अधिक फायदा व्हावा, या हेतूने त्या केजरीवाल यांच्याविरोधात गेल्या. तिथल्या मीडियाने त्यांनाही मोठी सहानुभूती मिळवून दिली. अखेर केजरीवाल यांना अटक करण्यात आली. केजरीवालांना अटक केल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्याला नेमून दिलेले काम सुरू केले. त्यावरही केजरीवालांनी अनेकदा आक्षेप घेतले. मात्र, सगळेच जण विरोधात असल्याने त्यांचा नाइलाज झाला. यामध्ये पंजाबमध्ये चांगले काम करणार्या ’आप’च्या मुख्यमंत्र्यांनाही विविध मार्गाने आपल्याकडे ओढण्याचा किंवा त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते त्याला बधले नाहीत. दिल्लीच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर भाजपाने काहीही करून या निवडणुका जिंकण्याचा इरादा ठेवला. त्यांच्याकडे केजरीवाल यांना बदनाम करण्याचे काहीही मुद्दे मिळाले नाहीत. त्यावर केजरीवाल यांनी त्यांच्या घरात सोन्याचा कमोड लावला असल्याचा आरोप करण्यात आला. एकदा तर ’आप’च्या खासदारांनी थेट सर्व मीडियाला घेऊन मुख्यमंत्री निवासात धावा बोलला. चला तुम्हाला खरोखरच सोन्याचा कमोड दाखवतो, अशी भूमिका त्यांनी घेतली. तो नव्हता. त्यामुळे पोलसांनी त्यांना मुख्यमंत्री निवासात जाऊ दिले नाही. त्यानंतर अनेक खटपटी लटपटी व सर्वांचा वापर करत भाजपाने दिल्ली विधानसभेच्या निवडणुका कशाबशा जिंकल्या व एका महिला मुख्यमंत्र्यांना तिथे बसवले. त्या फार चांगले काम करत आहेत, हे लिहिण्यासाठी किमान लाखो तरी स्वयंसेवक तयार झाले. केजरीवाल सत्तेवरून पायउतार झाले. भाजपाचे काम संपले. त्यानंतर आज अनेक वर्षांनी या खटल्याचा निकाल लागला आहे. त्यांच्याविरोधात तपास यंत्रणेला एकही पुरावा देता आला नाही, असे सांगत न्यायालयाने त्यांची
निर्दोष मुक्तता केली. आपल्याकडे एक म्हण आहे, पावसाने झोडपले व राजाने मारले तर तक्रार कोणाकडे करायची? तशीच काहीशी गत ही केजरीवाल यांची झाली. शुक्रवारी (दि. 27) हा निकाल लागल्यानंतर ते भावुक झाले. ढसाढसा रडले. ते संवेदनशील राजकारणी आहेत. आपल्याविरोधात मीडियाने उठवलेल्या रानाचा त्यांना मानसिक त्रास झाला. ते एक माणूस आहेत. सुशिक्षित आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. अन्यथा काही लोकांच्या भोवती एपिस्टन फाइलच्या संशयाचे भूत जरी मानेवर बसलेले असले, तरी ते मान वर करून चालतात. ज्याच्या त्याच्या संस्काराचा हा प्रश्न असतो. केजरीवाल निर्दोष सुटल्यानंतर लोकांच्या मनात आता सोनम वांगचुग यांच्या सुटकेची अपेक्षा निर्माण झाली आहे. कदाचित त्यांनाही न्यायालय न्याय देईल. त्यांच्या भोवतीही अशाच प्रकारे देशविघातक कृत्य केल्याचे आरोप लावण्यात आले. त्यांचे अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या शांततामय आंदोलनात एक दिवसच अचानक हिंसा झाली व त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. सोनम वांगचुग हेही केजरीवाल यांच्याप्रमाणे सुशिक्षित आहेत. त्यांच्याकडे विचार आहेत. आपल्या देशाच्या लष्कराच्या नावाने मते मागणारे अनेक आहेत. मात्र, त्यांनी सैन्यासाठी उबदार असे तंबू तयार करून दिले आहेत. लडाखसारख्या भागात त्यांनी पर्यावरणासाठी केलेल्या कामाचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. आपल्या देशाला व काही भूभागाला चीनपासून धोका आहे हे त्यांनीच दाखवून दिले. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. अशा प्रकारचा व्यक्ती सरकारने तुरुंगात ठेवला आहे. परदेशात त्यामुळे आपली जाहीर छि-तू झालेली आहे. न्यायालय त्यांनाही न्याय देईल अशा अपेक्षेत आता सर्वसामान्य लोकही आंदोलन करत आहेत. त्यांचेही आंदोलन चिरडेल जाईल यात शंका नाही. मात्र, देशाची जनता नक्की कोणाच्या बाजूने आहे, हेही लक्षात येत आहे. भाजपा जेव्हा पहिल्यांदा सत्तेवर आले होते तेव्हा देशात काही चांगले होईल, अशी अपेक्षा होती. अनेकांचा आता भ्रमनिरास झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून राहुल गांधी यांना देशात जो प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रिज्जुजूसारखे जी हुजरी करणारेही त्यांना देशासाठी धोका म्हणत आहेत. या अशा प्रकारच्या कारभाराची लोकांना अपेक्षा नव्हती. वाजपेयी जेव्हा पंतप्रधान झाले होते तेव्हा एक सुसंस्कृत नेता देशाचा पंतप्रधान आहे, अशी विरोधकांचीही भूमिका होती.
सर्व राज्यांमध्ये विविध मार्गाने कशाही प्रकारे सत्ता मिळवण्याचे धोरण त्यांना यश वाटत असेल तर त्यात त्यांनी समाधान मानावे. मात्र, खर्या प्रतिष्ठेने मिळालेले यश हे नेहमीच मोठे असते. राज्यात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीवरून राजकारण सुरू आहे. आ. रोहित पवार जे अजित पवार यांचे पुतणे लागतात. त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. त्यावर भाजपाचे प्रवक्ते विरोध करत आहेत. किमान चौकशी करू असे जरी म्हटले असते, तरी त्याचा लोकांवर परिणाम झाला असता. हे जे काही चाललेले आहे त्यावर आताशा लोक व्यक्त होत आहेत. ज्याप्रमाणे केजरीवाल यांची काही लोकांना हाताशी धरून मोठी बदनामी केली गेली तो फॉर्म्युला सगळीकडे वापरला जात आहे. त्याला आता येणार्या काळात किती यश मिळेल, हे पाहावे लागणार आहे. अर्थात, निवडणुका जिंकण्याचे ज्ञानच त्यांच्याकडे असल्यामुळे असे प्रकार घडत जाणार. किमान देशासाठी काही केलेल्यांचाही तरी मान राखला जावा, अशी किमान अपेक्षा आता या देशातील जनता व्यक्त करत आहे.
Kejriwal innocent; Waiting for Wangchugs