देवयानी सोनार, नाशिक
अंकुश शिंदे
नाशिक पोलिस आयुक्त
शहरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी युवांना शांतता कमिटीत नाव नोंदवावे, महिलांच्या सुरक्षेबाबतीत निर्भया पथकाची पुनर्बांधणी दामिनीपथक,सोशल मीडियाद्वारे होणार्या फसवणुकीपासून सावध करण्यासाठी सायबरदूत, गल्ली बोळातप्रमाणे रेकॉर्डवरील व नसलेले पण गुंडगिरी करणार्यांची माहिती गोळा करुन त्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच गुन्ह्यांवर विविध माध्यमाद्वारे अंकुश ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे नाशिकचे पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दै.गांवकरीशी बोलतांना सांगितले. आपल्याकडे येणार्या लोकांचे प्रश्न आणि अडचणी तत्परतेने सोडविण्याबरोबरच गुन्हेगारीवर जरब बसविण्याचा आपला प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.
- मूळ गाव कोणते?
बीड जिल्हातील अंबेेजोगाई होळ
- शिक्षण?
एम एस्सी ऍग्रीकल्चर
- कौटुंबिक पार्श्वभूमी काय?
कुटुंबात कोणी या क्षेत्रात नव्हते. शेतकरी कुटुंबात जन्म
- व्यस्त दिनचर्येत स्वतःला फिट कसे ठेवता?
दिनचर्या पहाटे पाच वाजता उठून योगा, मार्निंग वॉक, वाचन, चांगली पुस्तके वाचणे,माणसे जोडणे
- ताणतणाव कसा सांभाळता.?
ऑफिसच्या कामाचा ताण घरी घेऊन जात नाही समतोल राखायला जमते.
- या क्षेत्राकडे कसे आलात?
शेतकर्याचा मुलगा असल्याने नोकरीची गरज वाटली. नोकरीची आवड असल्याने आवडत्या क्षेत्रात आलो.
- कुटुंबात कोणाचा पांठिंबा ?
वडील व पत्नी मोठी स्ट्रॉंग सपोर्टर आहे.
- आवडते फूड कोणते?
साध्या पद्धतीचे जेवण आवडते. दुध भाकरी आवडीची आहे.
- आवडता रंग
पांढरा, सौम्य आकाशी
- आतापर्यंतचा एक चांगला अनुभव ?
गडचिरोलीत असतांना दोन वर्षे तेथील अनुभव समृद्ध करून गेला.मानवी गुण उन्नत केल्यास कुठल्याही अडचणींवर मात करता येऊ शकते.
- एक वाईट अनुभव
लोकांना वाटत असते. गुन्हेगारी वाढत आहे. परंतु आपण सोशल मीडियाकडे व त्याच्या वापराकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे. साधे उदाहरण. इतके खुनी गेम्स सोशल मीडियावर आहेत. हाणामारीची व्हर्चुअल़ हत्यारे उपलब्ध आहेत. जसे ड्रायव्हिंग व्हर्चुअली शिकवता येऊ शकते.तसे व्यक्ती सहजच प्रत्यक्षात हाणामारी करु शकते. जसे गाडीला कट मारला म्हणून लोक भांडतात. हाणामारी करतात. इथे गाडीला काहीच झालेले नसते. अहंकाराला इजा झाल्याचा समज होतो. - घरातही यामुळे तरुणाई बोलताना कोणते शब्द वापरत आहे. ते बघा फरक जाणवेल. म्हणून भविष्यात घरातील जबाबदार व्यक्तीने घरातील सदस्यांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. साध्या साध्या गोष्टींमुळे विवाह मोडत आहे. मला तसा वैयक्तिक वाईट अनुभव नाही.परंतु गुन्हेगारी घटनांमुळे मानवी मन कसे कोणाला घडविते, बिघडविते याबद्दल वाईट वाटते.शहरात अनेक कुटुंबे उन्नत होण्यासाठी आलेले असतात. काही कुटुंबे मोठ्या घरात रहातात. तर अनेकजण मोलमजुरीसाठी घराबाहेर पडतात. मुले एकटी पडतात.ही मुले सोशल मीडियासह गुन्हेगारीकडे वळण्याचे प्रमाणही वाढते आहे. अशा मुलांसाठी पुण्यात दिशा नावाचा उपक्रम राबविण्यात आला होता.टप्याटप्याने नाशिकमध्येही राबविणार आहे.
- कोरोना काळात काय अनुभवले, काय शिकले?
सर्व लोकांनी आपआपल्या परीने काम केले आहे. तसेच मीच चांगले काम केले असे म्हणणे योग्य नाही. स्वत:चे अवडंबर माजवणे योग्य नाही. तरीही माहिती म्हणून सांगतो कोरोना काळात मानवी स्वभावाचे रंग पाहायला मिळाले.सोलापुरातील सात पोलिस शहीद झाले. अनेकदा गैरसमजामुळे लोक लपून राहीले, अनेक डॉक्टरांचे समुपदेशन केले.
- कामाच्या ठिकाणी येणार्या अडचणींबद्दल काय वाटते?
अनेकदा अडचणींवर मात करावीच लागते.तुमच्याकडे निगोशिएबल स्किल असायला हवे. समजूतदारपणाची भूमिका आवश्यक आहे.
- पॉझिटिव्ह कसे ठेवता?
चांगले विचार, चांगली पुस्तके,माणसे वाचायला शिकणे,नातेवाईकांशिवाय इतर विविध लोकंाना जाणून घेतल्यास समृद्ध अनुभव मिळतो.सकारात्मक राहाण्यासाठी मदत होते. - अपडेट राहण्यासाठी कोणते माध्यम उपयुक्त वाटते?
वर्तमानपत्र हेच आवडते माध्यम
- वाचकांना संदेश
तुम्ही या पृथ्वीवर एकदाच असणार आहात. मिळालेला वेळ, सत्कार्य, सतत नवनवीन शिकणे,वेळेचा अपव्यय न करता काम करुन वाचन करून ज्ञानात भर पाडून स्वत:चे जीवन उन्नत करायचे की नाही हे ठरवावे, असे माझे मत आहे. उन्नत करा, त्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागले तर ते घ्या. पोलीस अधिकारी म्हणून माझे आवाहन आहे. गुन्हा करु नका. केल्यास जसे कराल तसे भराल. या न्यायाने कायदा त्याचे काम करील, सावध असावे.
क्या से क्या हो गया!
गुन्हेगारी जगताकडे वळण्यासाठी मानवी मन कारणीभूत आहे.
मानवी मन गुन्हेगारीकडे का कसे वळते, मानवी स्वभाव, सोशल मीडिया,शिघ्रकोपी स्वभाव (शॉर्टटेंपर) कुटुंबीसोबत वाद, ग्लॅमरच्या दुनियेतील आकर्षण, व्हर्च्युअल जगातील गुन्हेगारीचे आकर्षण. गेम्सच्या माध्यमातून हवे ते हत्यार सहज वापरण्याची सवय, खर्या दुनियेतही खरोखरचे हत्यार धरण्यास आणि त्याचा इतरांवर वार करण्यासाठी सहज होणारा वापर धोकेदायक आहे. याबाबतीत पालकांनी मुलांशी संवाद,मानसोपचार तज्ज्ञांची भूमिका महत्वाची वाटते.
- मुलांना दिशा देणार
मोलमजुरीसाठी शहरात आलेल्या अनेकांची मुले अल्पवयातच गुन्हेगारीकडे वळतात. घरी कुणाचा धाक नसल्याने मोबाइल अथवा इतर व्यसन, कुसंगतीत राहून गुन्हेगारी कारवाया करु लागतात. त्यामुळे पिढी वाया जाण्याची भीती आहे. अशा मुलांना दिशा देण्यासाठी पुण्यात दिशा नावाचा एक उपक्रम आपण राबविला होता. तसाच उपक्रम नाशिकमध्येही टप्याटप्याने राबविण्याचा आपला मानस असल्याचे अंकुश शिंदे यांनी सांगितले.