तपोवन बचावासाठी खा. वाजेंची संसदेत बॅटिंग

झाडे तोडून नाशिकचा श्वास संपवला जातोय

नाशिक : प्रतिनिधी
नाशिकच्या तपोवन परिसरातील अठराशे झाडांच्या कत्तलीच्या निर्णयामुळे निर्माण झालेल्या संतापाची दखल थेेट संसदेत घेण्यात आली आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी शुक्रवारी (दि.5) लोकसभेत शून्य प्रहरात तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा जोरदारपणे मांडला. याआधी त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना पत्र लिहून वृक्षतोड तत्काळ थांबवण्याची मागणी केली होती. बुधवारी (दि. 3) त्यांनी तपोवन परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला होता.

लोकसभेत बोलताना खासदार वाजे म्हणाले की, तपोवन परिसर केवळ हिरवाईचा पट्टा नसून प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेला धार्मिक वारसा, जैवविविधतेचे केंद्र आणि नाशिकचे फुफ्फुस आहे. हिंदू धर्म निसर्गपूजनाची शिकवण देतो. अशा पवित्र भूमीत हजारो झाडे तोडणे म्हणजे श्रद्धा, पर्यावरण आणि सांस्कृतिक वारसा तिन्हीवर कुर्‍हाड, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. तपोवनात अनेक पक्षी, प्राणी व दुर्मिळ जैववैविध आढळत असून, या परिसंस्थेचा विनाश नाशिककरांच्या भावनांना वेदना देणारा असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, खा. वाजे यांच्या मजबूत, ठाम आणि भावनिक मांडणीमुळे तपोवन प्रश्न राज्याबाहेर जाऊन देशाच्या सभागृहातही प्रतिध्वनित झाला आहे. नाशिककरांचा संताप आणि आंदोलनाची ऊर्मी केंद्र सरकारने लक्षात घेतली पाहिजे, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. संसदेतल्या प्रभावी भाषणाने स्पष्ट संकेत मिळाले की, तपोवन बचावासाठीचा लढा आता निर्णायक टप्प्यात आहे. नाशिककरांचा वैताग, जनभावना, धार्मिक महत्त्व आणि पर्यावरणीय धोका या सर्वांचा संगम असलेला हा मुद्दा आता सरकारकडून निर्णायक प्रतिसादाची वाट पाहत आहे.

…तर तपोवनात काय उरेल?

तपोवन भेटीदरम्यान खासदार वाजे यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिक, तपोवन बचाव समिती व पर्यावरण तज्ज्ञांकडून माहिती घेतल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावेळी ते म्हणाले की, तपोवन या नावातच सर्वकाही आहे. वन नाहीसे झाले तर तपोवन फक्त सिमेंटचे जंगल उरेल. नाशिकचे फुफ्फुस कायमचे हरवेल. एक्झिबिशन सेंटरसाठीही त्याच परिसरात निविदा निघाल्याने नाशिककरांचा संशय अधिकच वाढल्याचे त्यांनी सांगितले.

पर्यायी जागा, पण तपोवनच का?

खासदार वाजे यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. नाशिकमध्ये साधुग्रामसाठी पर्यायी जागा उपलब्ध असताना तपोवनच का निवडण्यात आले? पर्यावरण परिणाम अहवाल, तज्ज्ञांचे मत, सार्वजनिक चर्चा या सर्वांना पूर्णपणे बायपास करून निर्णय रेटण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी सांगितले. तपोवनाचा नाश करून हरितकुंभ कसा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

गोदावरी प्रदूषणावर चुप्पी मात्र, वृक्षतोडीस उत्सुकता?

तपोवन भेटीप्रसंगी वृक्षतोडीच्या मुद्द्यासोबतच वाजे यांनी गोदावरी प्रदूषणाचाही विषय उपस्थित केला. झाडे तोडण्यासाठी प्रशासन एवढे सज्ज असते, पण गोदावरी प्रदूषण थांबविण्यासाठी जी गती हवी ती कुठे आहे, असा त्यांनी सवाल केला. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी एसटीपी प्रकल्प पूर्ण होईल की नाही, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *