अपहृत हेमंत पारख सुखरूप; सुरतमध्ये झाली सुटका

अपहृत हेमंत पारख सुखरूप; सुरतमध्ये झाली सुटका

– कुटुंबीयांसह पोलिसांनी सोडला सुटकेचा निःश्वास

नाशिक – विशेष प्रतिनिधी
इंदिरानगरमधून शनिवारी रात्री अपहरण करण्यात आलेले प्रख्यात बांधकाम व्यावसायिक तसेच गजरा ग्रुपचे चेअरमन हेमंत पारख हे सुखरूप आहेत. अपहरण केल्यानंतर अपहरणकर्ते त्यांना जव्हारमार्गे गुजरातला घेऊन गेले होते. त्यांना
सुरत सोडण्यात आले. अपहृत हेमंत पारख सुखरूप असल्याचे वृत्त समजताच कुटुंबीयच नव्हे तर पोलीस आणि आप्तस्वकीयांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रविवारी नाशिक बंदची हाक दिलेली असल्याने बंदोबस्ताच्या पूर्वतयारीसाठी पोलिसांची धावपळ सुरू असतानाच पारख यांच्या अपहरणाच्या वृत्ताने शहरातील कायदा व सुव्यवस्थेला धक्का बसला होता. हे वृत्त समजताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे तसेच पोलीस अधिकारी निवासस्थानी पोहचले. त्यानंतर तपासाची सुत्रे हलवण्यात आली.
हाती आलेल्या माहितीनुसार, अपहरणकर्ते राजस्थानमधील असून आठ दिवसांपासून पारख यांच्या निवासस्थानाची रेकी करत होते. शनिवारी सावज टप्प्यात आल्यानंतर त्यांनी पारख यांच्यावर झडप घातली. यासाठी एक दुचाकी व दोन चारचाकी वाहनांचा वापर करण्यात आला.
दरम्यान, अपहरणकर्त्यांनी पारख यांना सुरतला सोडल्यानंतर त्यांनी कुटुंबियांशी संपर्क साधला. तेव्हा सर्वांना हायसे वाटले. गुन्हे शाखेच्या युनिट एकचे पथक सुरत येथे पोहचले असून अपहृत हेमंत यांना घेऊन नाशिकला निघाले आहेत. पारख यांचे अपहरण व त्यांना सुखरूप सोडणे याची सांगड घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *