कोल्हापूरमध्ये जयश्री जाधवांची विजयश्री

भाजपाच्या उमेदवाराचा दारूण पराभव
कोल्हापूर : कॉंग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी अठरा हजाराहून अधिक मतांनी दणदणीत विजय प्राप्त केला. भाजपाने या निवडणुकीसाठी मोठी ताकद पणाला लावली होती. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले अशा दिग्गजांनी येथे जोरदार प्रचार मोहीम राबवूनही शेवटी कॉंग्रेसचीच सरशी झाली. महाविकास आघाडीच्या नेत्यांमागे लागलेल्या शुक्लकाष्ठामुळे भाजपाचे हौसले बुलंद झाले होते. ही निवडणूक चंद्रकांतदादा पाटील कोल्हापूरचेच असल्याने त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती. कॉंग्रेसने माजी आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री यांना तर भाजपाने पालिकेतीलच सत्यजित कदम यांना उमेदवारी दिली होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ऑनलाइन सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांना जाधव यांच्या विजयासाठी आवाहन केले होते. काल मतमोजणीला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच जाधव या आघाडीवर होत्या. अठरा हजार मतांची आघाडी शेवटपर्यंत राखत त्यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या निवडणुकीमुळे कॉंग्रेसला नवसंजिवनी मिळाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *