नाशिक : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी कार्यालयात कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी भूसंपादन अधिकारी रवींद्र भारदे यांची या कक्षाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली असून, सध्या त्यांच्याच कार्यालयातून या कक्षाचे कामकाज पाहिले जात आहे. कक्षाची स्थापना झाली असली तरी कामासाठी लागणारे मनुष्यबळ मात्र मिळालेले नाही.
चार कर्मचार्यांची नियुक्ती झाली पण त्यांनी पदभारच न स्वीकारल्यामुळे कक्षाच्या कामकाजाचा सर्व भार भारदेंच्याच खांद्यावर असल्याचे दिसत आहे. कुंभमेळ्यासाठी प्रशासकीय स्तरावर जोरदार तयारी सुरू आहे. स्वत: विभागीय आयुक्त दर आठवड्याला आढावा घेत आहेत. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त स्तरावरही नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच नाशिक दौरा करत कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पाहणी केली. सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामसह अन्य पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे. विविध यंत्रणांच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहे. त्यामुळे या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय राखण्यासाठी जिल्हास्तरीय स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. राज्य शासनाने कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची घोषणा केली आहे. लवकरच प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार आहे, परंतु तोपर्यंत कुंभमेळा अनुषंगिक बाबींच्या समन्वयासाठी शासन आदेशानुसार जिल्हाधिकार्यांनी जिल्हास्तरावर कुंभमेळा कक्षाची स्थापना करण्याचे आदेश काढले. त्यानुसार कक्षाची जबाबदारी भूसंपादन उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. तसेच याव्यतिरिक्त चार कर्मचार्यांच्या नियुक्तीचेही आदेश काढण्यात आले आहेत. यात मेरी कार्यालयाचे लघुलेखक उमेश सावकारे, सुरगाणा तहसील कार्यालयातील सहायक महसूल अधिकारी मोहिनी पगारे, बागलाण तहसील कार्यालयातील महसूल सहायक आनंद लगरे, कळवण तहसील कार्यालयातील महसूल सहायक शरद राऊत यांची या कक्षात नियुक्ती करण्यात आली आहे.
मात्र तीन महिने उलटूनही या कर्मचार्यांनी कुंभमेळा कक्षाचा पदभार स्वीकारलेला नाही. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विभागप्रमुखांकडूनच मनुष्यबळाचे कारण देत थेट जिल्हाधिकार्यांच्या आदेशालाच केराची टोपली दाखवण्यात आली आहे. एकीकडे स्वत: मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी झटत असताना कळवण, दिंडोरी तहसीलदारांकडून मात्र याबाबत उदासीनता दिसून येते. सध्या उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे हे एकटेच संपूर्ण कुंभमेळा कक्षाचा गाडा हाकत असून, जिल्हा प्रशासनाने तातडीने या कर्मचार्यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश काढण्याची आवश्यकता आहे.