नाशिक : आरोग्य विभागातील मुख्य प्रशासकीय अधिकारी उपसंचालक यांना वीस हजारांची लाच घेताना लाच लूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. गजानन मारोतराव लांजेवार असे या अधिकार्याचे नाव असून, तक्रारदार सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरचे रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी लांजेवार यांनी वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. कार्यालयातच वीस हजार रुपयांची लाच घेताना लांजेवार यांना रंगेहाथ पकडण्यात आले. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.