लक्ष्यवेध : प्रभाग-4
भाविकांचे शहर समजल्या नाशिकची ओळख देशभरात ज्यामुळे झाली व 12 वर्षांनी होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा केंद्रबिंदू असणार्या परिसराचा समावेश असणार्या प्रभाग पाच मध्ये यंदा उमेदवारीसाठी अधिक चुरस असणार आहे. खरेतर जगभरातून या परिसरात भाविक व पर्यटक येत असतात मात्र सिमेंट-क्राँकिटचे रस्ते यापेक्षा परिसराचा व तीर्थस्थानाचा कायापालट अद्यापपावेतो होऊ शकलेला नाही. याच प्रभागात पूर्व मतदारसंघातील आमदार आहे. त्यामुळे तरी आगामी काळात आमदार व नगरसेवक यांच्या समन्वयातून गोदाघाटासह संपूर्ण प्रभागाचा कायापालट व्हावा अशी मतदारांची अपेक्षा गैर नाही.तसा विकासाचा दृष्टीकोन बाळगणारे नगरसेवक यंदा महापालिकेत जातात की पक्षीय बलानुसार संधी मिळते यासाठी मात्र थोडा काळ प्रतिक्षा करावी लागणार आहे !
अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. पंचवटीतील ‘प्रभाग पाच’ मध्ये भगवान श्री.कपालेश्वर तीर्थक्षेत्र रामकुंड, प्रसिद्ध श्री.काळाराम मंदिर व भोवतालचा धार्मिक परिसर आहे. तीर्थक्षेत्र रामकुंडावर
अमृतस्नान पार पडणार आहे. परंतु रामकुंड व इतर भागात असलेले अतिक्रमण, अस्वच्छता त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या प्रभागात अल्पवयीनांची गुंडगिरी, राजकीय पदाधिकार्यांनी पाळलेल्या गुंडांनी डोके वर काढल्याने नागरिक ‘हतबल’ आहेत.रामकुंड परिसरात राज्यासह देशभरातून रोज शेकडो भाविक दशक्रिया विधी, पिंडदान आदी धार्मिक विधी साठी येत असतात. परंतु त्यांना अनेक समस्यांचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे.खर तर याच रामकुंड परिसरात देशभरातून येणार्या भाविकांसाठी धर्मशाळा भक्तनिवास अन्नछत्र आदींची व्यवस्था केली असती तर आज नाशिकच्या पर्यटनात अजूनच भर पडली असती. राज्यातील इतर देवस्थानांच्या तुलनेत रामकुंड परिसरात येणार्या भाविकांसाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याने त्याचाही फटका पर्यटनासाठी बसला आहे. खरंतर याकडे प्रभागातील सर्वच लोकप्रतिनिधींनी लक्ष देखील देणे गरजेचे होते. परंतु त्यांना याच काही सोयरेसुतक नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
याच परिसरातील म्हसोबा पटांगण परिसरात बुधवारचा वर्षानुवर्ष भरत आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणात चोर्या मार्या, मोबाईल हिसकावणे आदी प्रकार होत असल्याने नागरिकही हतबल झाली आहे. त्यामुळे या भागात खर्या अर्थाने सीसीटीव्ही सारखी अद्ययावत यंत्रणा सुरू करण्याची गरज आहे. या प्रभागाने माजी उपमहापौर, माजी सभागृह नेता व अन्य महत्त्वाची पदे दिली असतानाही मात्र विकासाच्या समस्येचा डोंगर ‘जैसे थे च’ उभा राहिला आहे. प्रभागातील विविध ठिकाणी रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण, उद्यानाची दुरवस्था, नादुरुस्त ग्रीन जिम, रस्त्यावर भरणारा दैनंदिन भाजी बाजार, कुठे लोंबकळणार्या वीजतारा, जागोजागी कचरा, श्वान, डुक्कर व डास, मच्छरांचा वाढलेला उपद्रव, रस्त्यावरचे खड्डे, एमजीएनएलसह अन्य भूमिगत कामाच्या नंतर व्यवस्थित न बुजविलेले खड्डे, कुंभमेळा स्नान होणार्या रामकुंड परिसरात कायम अस्वच्छता यामुळे नागरिक त्रस्त आहेत. पेठरोड व अन्य भागांत काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही, याबाबत मनपाकडे पाठपुरावा करूनही पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. पेठरोडसह, मखमलाबाद रोडवर भाजीबाजार भरतो. यामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच समस्या बनली आहे. शिवाय अनेकदा किरकोळ अपघात घडतात. त्यामुळे भाजीबाजारासाठी मनपाने स्वतंत्र जागा उपलब्ध करून दिली पाहिजे. कुमावतनगर, मधुबन कॉलनी, जाणता राजा कॉलनी आदी भागांमध्ये रात्री उशिरापर्यंत टवाळखोर बसतात त्याचा नागरिकांना त्रास होतो त्यांचा बंदोबस्त करण्याची गरज आहे.
आगामी सिंहस्थाचा बराच भाग याच प्रभागात आहे. तरी देखील अद्यापही विकासकामे सुरु झालेली नाही. शिवाजी चौकात प्रसाधनगृह असून, त्या ठिकाणी केरकचरा असतो. नियमित स्वच्छता होत नसल्याने प्रसाधनगृहातील पाणी रस्त्यावर वाहते. पेठफाटा -एरंडवाडी परिसरात नियमित औषध फवारणी व दूरवर फवारणी होत नसल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. एरंडवाडीतून इंद्रकुंडाकडे जाणार्या ड्रेनेज लाईन, गटारी तुंबलेल्या, विद्युत पोलची दुरावस्था शौचालयाची नियमित साफसफाई होत नाही, शेजारीच अंगणवाडीची दयनीय अवस्था असून, पावसाळ्यात नेहमीच अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरते. तर राममंदिर परिसर, सीतागुंफा, पंचवटी कारंजा, पेठरोड आदी भागात मोठ्या प्रमाणावर मुख्य रस्त्यावर अनेकांनी अतिक्रमण केल्याने रस्त्याने ये-जा करण्यासाठी अडथळा निर्माण होतो अशी परिस्थिती आज दिसून येते.वास्तविक निवडणुकीच्या वेळी हात जोडणारे लोकप्रतिनिधी अन् इच्छुक उमेदवार सुद्धा निवडणुका संपताच दिसेनासे होतात असे नागरिकांनी सांगितले.
या आहेत समस्या
काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा, पाण्याची वेळही वेगवेगळी
उद्यानाची दुरवस्था, कॉलनी रस्त्यावर खड्डे,
पेठ फाटा रस्त्याचे काम अपूर्ण, पेठरोडला ठिकठिकाणी रस्त्यावर कचरा.
नियमितपणे औषध धुरफवारणी नाही
उद्यान देखभालीसाठी कर्मचारी येत नाहीत
मोकाट जनावरांचा त्रास
साफसफाई नियमित होत नसल्याने ठिकठिकाणी अस्वच्छता
श्री काळाराम मंदिराजवळ हातगाड्यांचे अतिक्रमण, धार्मिकस्थळाच्या ठिकाणी वाहन कोंडी
प्रभागचा परिसर
पंचवटी गावठाण, मखमलाबाद नाका, भक्तिधाम, दत्तनगर, कुमावतरगर, जाणता राजा ,कॉलनी, सुदर्शन कॉलनी, शिंदेनगर, नवनाथनगर, ड्रीम कॅसेल, जाधव कॉलनी, मधुवन कॉलनी, गजान कॉलनी, नवनिर्माण चौक, राजपाल कॉलनी, रोहिणीनगर, पेठ नाका परिसर, चित्रकूट सोसायटी, दिंडोरी रोड समिती मागील परिसर, एरंडवाडी, मखमलाबाद नाका परिसर, चिंचबन, इंद्रकुंड, जाजूवाडी, मालेगाव स्टँड, अशोक चित्रपटगृह परिसर, रामकुंड परिसर, पंचवटी सार्वजनिक वाचनालय, शनी चौक, सरदार चौक, काळाराम मंदिर सीतागुंफा परिसर, ढिकलेनगर, नाग चौक.
नागरिक म्हणतात…

कुंभमेळा तोंडावर तरी विकास नाही
या प्रभागात वर्षानुवर्ष ठराविक लोकप्रितिनिधीच प्रभागाचे नेतृत्व करत आहेत. नवनाथ नगर परिसर, एरंडवाडी परिसर, नागचौक परिसरातील समस्या आहे तशाच आहेत.
रामकुंड परिसराचा अजिबात विकास झालेला नाही.
पंचवटी कारंजावरील चिमणीघर विनाकारण बांधल तिथे गेल्या पाच वर्षात पाच चिमण्याही आलेल्या नाहीत.महत्त्वाच्या चौकात वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच आहे. दिंडोरी नाक्यावरील अतिक्रमण नगरसेवकांच्या वरदहस्त असल्यामुळे काढले जात नाही.पेठरोडचे सिमेंटचे काँक्रीटीकरण निकृष्ठ दर्जाचे झाले असून रस्ता अजून पुर्णही झालेला नाही तरी काही ठिकाणी काँक्रीटला तडे गेलेय. कुंभमेळा तोंडावर आला असला तरी रामकुंड परिसराचचा पाहिजे तसा विकास झालेला नाही.
– सचिन ढिकले

रामकुंड परिसरात सीसीटीव्ही आवश्यक
तीर्थक्षेत्र रामकुंडावर देश विदेशातून भाविक दर्शनासाठी, धार्मिक विधीसाठी येत असतात.याठिकाणी चोर्या मार्यांचे प्रमाण मोठा प्रमाणावर वाढले आहेत.त्यातच येऊ घातलेला सिंहस्थ कुंभमेळा यादृष्टीने रामकुंड आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा आवश्यक आहे .
– सौ स्वाती महेश वाघ

शौचालयांची दुरावस्था
पंचवटी परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविक देव दर्शनासाठी येत असतात.बाहेरून आलेल्या भाविकांना सुलभ शौचालयांची गरज भासते. परंतु शौचालयांची दुरावस्था वाईट असल्याने तेही अशा ठिकाणी जाण्यास करतात.चरणपादुका रोड तसेच वाघाडी तालीम येथील सुलभ शौचालयांची अवस्था खराब झाली आहे. त्यामुळे मनपाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– सचिन राजू भोजने, नागचौक पंचवटी नाशिक नागचौक , चरणपादुका रोड

पलुस्कर सभागृह कधी सुरू होणार
नाशिक महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात खर्च करून
इंद्रकुंड येथे पलुस्कर सभागृह बांधले आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे.इतका खर्च करूनही जर असे होत असेल तर कशासाठी खर्च करायचा.त्यामुळे हे पलुस्कर सभागृह लवकर सुरू करावे
– सौ मंगला कोठुळे

काळाराम मंदिर परिसरात पार्किंग झोन आवश्यक
प्रसिध्द असलेल्या श्री काळाराम मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यामुळे या भागात पार्किंग झोन करणे गरजेचे आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर काळामध्ये सीतागुंफा , रामकाल पथ मार्गावरील अतिक्रमण काढून तो परिसरातील अतिक्रमण मुक्त केला पाहिजे.
– दत्तू साळवे

मोकाट कुत्र्यांची भीती
या प्रभागात मोकाट कुत्रे वाढल्याने नागरिकांना रस्त्याने चालणे मुश्किल होते .नवनाथ नगर परिसरात नियमितपणे स्वच्छता होत नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणी नियमित येत नाही .ड्रेनेज लाईन तुंबलेल्या असतात त्याकडे स्वच्छता विभागाचे दुर्लक्ष होते. सुलभ शौचालय यांची देखील दुरावस्थाच आहे. प्रभागातील लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनाचे देखील दुर्लक्ष झाले आहे.
– निलेश पवार
प्रभागातील विकासकामे
♦ पेठ फाटा ते कॅनॉल पर्यंत पूर्ण रस्ता काँग्रेस
♦ पंचवटी कारंजा वर भव्य दिव्य असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा
♦ मनपाच्या जुन्या विभागीय कार्यालयाच्या पाठीमागे जलकुंभ
♦ मनपाच्या भांडार मागील दोन एकर जागेत 300 बेडच रुग्णालय प्रस्तावित
♦ नागरिकांच्या आरोग्यासाठी स्वर्गीय उत्तमराव ढिकले जॉगिंग ट्रॅकची निर्मिती
♦ कॉलनीतील सर्व रस्ते काँक्रीट करण
2011 नुसार लोकसंख्या
♦ प्रभागाची एकूण लोकसंख्या
♦ लोकसंख्या – 44605
♦ अनुसुचित जाती – 3151
♦ अनुसुचित जमाती – 2916
इच्छुक उमेदवार
उल्हास धनवटे, सचिन ढिकले, जयश्री धनवटे, मनीषा भाटे, प्रवीण भाटे, खंडू बोडके, नंदीनी बोडके, कमलेश बोडके, नीलम पाटील, दिगंबर धुमाळ, चंद्रकला धुमाळ, कविता आव्हाड, मनोज गायकवाड, कैलास शर्मा, संजय थोरवे, रंजना थोरवे, गौरी व निलेश मधुकर पवार , विशाल गोवर्धने, संजय पाटील, महेश महंकाळे ,
विद्यमान नगरसेवक

गुरुमीतसिंग बग्गा,

कमलेश बोडके,

नंदिनी बोडके

स्व.विमल पाटील