शेततळ्यात पडून ग्रामपंचायत महिला सदस्याचा मृत्यू
सिन्नर प्रतिनिधी
शेततळ्यामध्ये पाय घसरून पडल्याने मिठसागरे येथील विवाहिता व विद्यमान ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे…
सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील मीठसागरे येथील नंदा योगेश चतुर (32) या विवाहिता सकाळी त्यांच्या स्वतःच्या शेत तळ्यात गेल्या होत्या. त्यावेळी नंदा चतुर पाय घसरून त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत विवाहितेचे पती योगेश रावसाहेब चतुर यांनी वावी पोलिसांना घटनेची खबर दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढला. शवविच्छेदनासाठी मृतदेह सिन्नर ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
मयत नंदा चतुर यांच्या पश्चात पती व दोन मुले असा परिवार आहे. अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नंदा चतुर या ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या.
मीठसागरे ग्रामपंचायतमध्ये दरवर्षी रोटेशन पद्धतीने सरपंच उपसरपंचाची निवड होते. ग्रामपंचायतमध्ये सरपंचपदी महिला राखीव असल्याने पुढील वर्षी त्यांना सरपंच पदाची संधी मिळणार होती. परंतु त्या अगोदरच त्यांच्यावर काळाने घाला घातला. या घटनेने मीठसागरे ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.