ललीत पाटील कमावलेला काळा पैसा ठेवायचा मैत्रिणींकडे
दोघी मैत्रिणींना अटक: आज कोर्टात हजर करणार
नाशिक : प्रतिनिधी
ललित पाटील दोन आठवड्यांपूर्वी ससून रुग्णालयातून पलायन केलेल्या ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी बंगळुरु इथून अटक केल्यानंतर त्याला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नाशिक इथल्या अमली पदार्थ तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या ललितला मुंबईतल्या एका व्यक्तिकडून कच्चा माल मिळत होता, त्यालाही अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज प्रकरणात पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ड्रगमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले आहे तर दुसरे पथक नाशिकला पोहचले आणि ललित पाटीलच्या दोन मैत्रीणींना अटक केली आहे. या दोघींनी पोलिस आज न्यायालयात हजर करणार आहेत. प्रज्ञा कांबळे आणि अर्चना निकम अशी दोघींची नावं आहेत.
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या तसंच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनींच मदत केल्याचं समोर आलंय. ललित पाटील फरार असताना तो सातत्याने या दौन मैत्रिणींच्या संपर्कात होता तसंच त्याने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता. दोन्ही महिलांना पुण्यात आणण्यात आले असून दुपारी शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.